Wednesday, August 26, 2026
Homeनगरश्रीरामपूर, कोपरगावच्या गुन्हेगारांची टोळी गजाआड; दरोड्याचा कट उधळला

श्रीरामपूर, कोपरगावच्या गुन्हेगारांची टोळी गजाआड; दरोड्याचा कट उधळला

अहिल्यानगर (प्रतिनिधी)

येथील एमआयडीसी परिसरात दरोडा घालण्याच्या तयारीत असलेल्या पाच जणांच्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला. पोलिसांनी पाचही संशयितांना ताब्यात घेत त्यांच्या ताब्यातून दोन गावठी कट्टे, चार जिवंत काडतुसे, लोखंडी टॉमी, मिरची पूड, सहा मोबाईल फोन तसेच दोन महागड्या लक्झरी कार असा तब्बल ३२ लाख १९ हजार १०० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. यातील श्रीरामपूर व कोपरगाव येथील दोघे जण सराईत गुन्हेगार असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.

- Advertisement -

जिल्ह्यात दरोडा व जबरी चोरीच्या गुन्ह्यांना प्रतिबंध करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेला दरोडा प्रतिबंधक पेट्रोलिंग करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी दिल्या होत्या. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी पोलीस उपनिरीक्षक संदीप दरवडे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस अंमलदार विजय ठोंबरे, विजय पवार, सुनील पवार, बिरप्पा करमल, राहुल डोके, आजिनाथ पाखरे, प्रशांत राठोड, रमीजराजा आत्तार, भगवान धुळे व सोनल भागवत यांचे पथक तयार केले होते.

शुक्रवारी (२१ ऑगस्ट) हे पथक एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दरोडा प्रतिबंधक पेट्रोलिंग करीत असताना बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, पाच जण दोन विनाक्रमांकाच्या चारचाकी वाहनांसह एमआयडीसी ते शेंडी जाणाऱ्या बायपास रोडवरील कच्च्या रस्त्याच्या आडोशाला थांबले आहेत. ते दरोडा घालण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस पथकाने पंचांसह घटनास्थळी धाव घेतली.

अंधारात दोन वाहनांजवळ पाच जण संशयास्पदरीत्या उभे असल्याचे पोलिसांना दिसून आले. शाहरूख रज्जाक शेख (वय ३४, रा. निमगाव खैरी, ता. श्रीरामपूर), इम्रान अन्वर पठाण (वय २३, रा. टाकळी, ता. कोपरगाव), तन्जीम नदिम शेख (वय २६, रा. मिलननगर, नांदगाव रोड, येवला), फिरोज चाँद शेख (वय ३५, रा. दत्तमंदिराजवळ, नांदगाव रोड, येवला) आणि रेहान रौफ शेख (वय ३०, रा. वॉर्ड नं. २, श्रीरामपूर) अशी पकडलेल्या पाच जणांची नावे आहेत. त्यांच्याविरूध्द एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ताब्यातील शाहरूख शेख व इम्रान पठाण यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी जप्त केलेले गावठी कट्टे व जिवंत काडतुसे आसिफ उर्फ आश्यू पठाण (पूर्ण नाव माहिती नाही, रा. वॉर्ड नं. २, श्रीरामपूर) आणि राजेंद्र भाऊसाहेब गागुडे (रा. अशोकनगर फाटा, श्रीरामपूर) यांच्याकडून खरेदी केल्याचे पोलिसांना सांगितले. हे दोघे सध्या पसार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

दोघांवर यापूर्वीही श्रीरामपूर, शिर्डी, कोपरगावात गुन्हे दाखल शाहरूख शेख याच्याविरूध्द श्रीरामपूर शहर, नारायणगाव, लोणी, श्रीरामपूर तालुका, अहिल्यानगर तालुका, शिर्डी, भिंगार कॅम्प व कोपरगाव पोलीस ठाण्यांमध्ये दरोडा, जबरी चोरी, खुनाचा प्रयत्न व आर्म्स अॅक्टअंतर्गत गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले. तर इम्रान पठाण याच्याविरूध्द कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात विविध कलमांन्वये तीन गुन्हे दाखल आहेत.

ताज्या बातम्या

Nashik Onion News : “रॅकमध्ये सडका अन् खराब…”; लासलगाव स्थानकात ‘कांदा...

0
लासलगाव | वार्ताहर | Lasalgoan देशांतर्गत बाजारात कांद्याचे दर ६० ते ७० रुपये प्रति किलोवर पोहोचल्याने ग्राहकांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने (Central Government) बफर स्टॉकमधून...