अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागात (उत्तर विभाग) 58 लाख 20 हजार 586 रूपयांचा अपहार केल्याच्या आरोपावरून दोघा कनिष्ठ सहायक कर्मचार्यांविरूध्द कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंदर्भात सहायक लेखाधिकारी रावसाहेब शंकर फुगारे यांनी फिर्याद दिली आहे. कनिष्ठ सहायक (लेखा) अशोक अंबादास पंडित (42) व कनिष्ठ सहायक रोहित शशिकांत रणशूर (38) अशी गुन्हा दाखल झालेल्या दोघा कर्मचार्यांची नावे आहेत.
12 जानेवारी 2024 ते 21 ऑगस्ट 2024 दरम्यान हा अपहार घडला. अशोक पंडित याने जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागामार्फत राबवण्यात येणार्या विविध योजनांच्या देयकातून कपात केलेल्या आयकर, जीएसटी, विमा, कामगार कल्याण निधी, सुरक्षा, अनामत दंड आदी शासकीय कपातींचा भरणा संबंधित खात्यावर न भरता रोहित रणशूर याच्या कॅशबुकमध्ये सह्या घेऊन वैयक्तिक एचडीएफसी व स्टेट बँकेत तसेच वैयक्तिक पॅन क्रमांकावरील खात्यात, पदाचा व अधिकाराचा गैरवापर करून भरल्या व अपहर केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. ही बाब नोव्हेंबर 2024 दरम्यान निदर्शनास आल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी 3 डिसेंबर 2024 रोजी उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी राजू तुकाराम लाकूडझोडे, लेखा अधिकारी महेश पांडुरंग कावरे, सहायक लेखाधिकारी राजेंद्र मधुकर डोंगरे, कनिष्ठ प्रशासनाधिकारी प्रमोद पुंडलिक राऊत, वरिष्ठ सहायक लेखा जगदीश अशोक आढाव व वरिष्ठ सहायक (लेखा) सुदाम रामदास बोंदर्डे यांची चौकशी समिती नियुक्त केली होती.
या समितीने 3 जानेवारी 2025 रोजी मुख्य कार्यकारी अधिकार्यांना अहवाल सादर केला. मुख्य कार्यकारी अधिकारी येरेकर यांनी दोघांविरूध्द फौजदारी कारवाई करण्याचे आदेश देऊन फिर्याद देण्यासाठी सहायक लेखाधिकारी फुगारे यांना प्राधिकृत केले. त्यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात मंगळवारी (18 फेब्रुवारी) रात्री फिर्याद दिली. पोलीस अधिक तपास करत आहेत.