Friday, May 1, 2026
HomeराजकीयRaj Thackeray : संयुक्त महाराष्ट्राचा लढा आणि हुतात्मा स्मारक विसरू नका; मनसेचे...

Raj Thackeray : संयुक्त महाराष्ट्राचा लढा आणि हुतात्मा स्मारक विसरू नका; मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे मराठी माणसाला आवाहन

मुंबई । Mumbai

संयुक्त महाराष्ट्रचा लढा विसरू नका, आपलं हुतात्मा स्मारक विसरू नका. या हुतात्मा स्मारकाच्या आसपासची जी गगनचुंबी मुंबई दिसते ती हे शहर या राज्याचा भाग होतं म्हणून झाली आहे, हे विसरू नका. याची जाणीव इतरांना देखील जास्तीत जास्त करून द्या आणि याचा अभिमान बाळगा, असे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शुक्रवारी मराठी माणसाला केले.

- Advertisement -

राज ठाकरे यांनी आज महाराष्ट्र स्थापना दिनाच्या निमित्ताने मुंबईतील हुतात्मा स्मारकाला जाऊन या लढ्यातील हुतात्म्यांना आदरांजली वाहिली. त्यावेळी त्यांना महाराष्ट्र दिनाबद्दल जी सरकारी अनास्था आणि अनुत्साह दिसला यावर ठाकरे यांनी आज एक्स या समाज माध्यमातून आपला संताप व्यक्त केला.सरकारला आणि त्यांच्या विभागांना आपल्या महाराष्ट्र दिनाबद्दलची नक्की अनास्था कशातून आली आहे? असा सवाल त्यांनी यानिमित्ताने केला आहे.

महाराष्ट्र दिन हा दिवस हुतात्म्यांच्या स्मरणाचा जसा आहे, तसा तो मुंबईसारखं शहर जे घडवण्यात मराठी माणसांनी स्वतःचा घाम, रक्त ओतलं आणि हे शहर आपल्याला मिळवण्यासाठी काय संघर्ष करावा लागला याचं स्मरण करण्याचा दिवस आहे. पण मला गेली अनेक वर्ष एक गोष्ट प्रकर्षाने जाणवत आहे ती म्हणजे, सरकार जसे औपचारिकता म्हणून अनेक दिवस साजरे करतं, तसा हा अजून एक सरकारी दिवस म्हणून साजरा करण्यात येतो आहे, अशी खंत ठाकरे यांनी व्यक्त केली आहे.

या स्मारकाला नीट सजावट नव्हती, सगळा सरकारी अनुत्साह जाणवत होता. सरकारला आणि त्यांच्या विभागांना आपल्या महाराष्ट्र दिनाबद्दलची नक्की अनास्था कशातून आली आहे? वरती बसलेले वरिष्ठ ज्या राज्यातून येतात त्या राज्याच्या मनात मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झाला याची सल आहे. त्यामुळे इथे गाजावाजा करत आनंद व्यक्त केला आणि वरिष्ठांची खप्पामर्जी ओढवली तर काय होईल असा काही भाव सरकारच्या मनात आहे का? हाच दिवस जैन समूहाचा किंवा तत्सम समूहाचा असता तर सरकाने सर्वत्र गालिचे अंथरले असते, रोषणाई केली असती. तिथे कधीही हात आखडता घेतला नसता. पण महाराष्ट्र राज्यासाठी, मुंबईसाठी, इथल्या माणसांसाठी जो आनंदाचा आणि अभिमानाचा दिवस आहे, तिथे मात्र अगदी सुतकी पद्धतीने हा दिवस साजरा केला जातोय, असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे.

मुंबईतील हुतात्मा स्मारक हे फक्त मुंबईतील नाही तर राज्यातील तमाम मराठी जनांसाठी अभिमानाचे प्रतीक असायला हवे. खरंतर या स्मारकाला एखाद्या तीर्थक्षेत्रासारखी गर्दी व्हायला हवी. इथे मराठी माणसांच्या झुंडीच्या झुंडी फक्त मुंबई आणि आसपासच्या परिसरातून नाही तर राज्यभरातून धडकायला हव्यात. मिरवणुका निघायला हव्या. पण सरकार इतकीच अनास्था मराठी माणसाच्या मनात उत्पन्न का झाली आहे ? मुंबई हा आपल्या अस्मितेचा, स्वाभिमानाचा कणा आहे. हे शहर आपण मराठी माणसांनी घडवलं, याला आकार आपण दिला आणि आपण ते लढून मिळवलं. पण हे सगळं आपण विसरलो आहोत, असे ठाकरे यांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केले आहे. मुंबई आणि आसपासच्या शहरांमधल्या मराठी माणसांनी पुढच्या वर्षी आवर्जून १ मे रोजी इथे येऊन हुतात्म्यांना वंदन करावे. तसेच राज्यातून मुंबईत येणाऱ्या मराठी माणसांनी देखील जरूर भेट द्यावी, असे आवाहन राज ठाकरे यांनी केले आहे.

ताज्या बातम्या

Rohit Pawar : उन्हात होरपळ, विजेचा खेळखंडोबा; आ. रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली...

0
जामखेड । तालुका प्रतिनिधी कर्जत-जामखेड तालुक्यातील तीव्र वीजटंचाई आणि अनियमित वीजपुरवठ्याच्या प्रश्नावर आज आ. रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली कर्जत येथील महावितरण कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात...