अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
जिल्हा परिषदेच्या उत्तर जिल्ह्यातील एका पंचायत समितीमध्ये आणखी कोट्यावधी रुपयांचा घोटाळा झाला असून या घोटाळ्याची चौकशी अंतिम टप्प्यात आहेत. या घोटाळातील दोषी कर्मचार्यांच्या गफल्याच्या आकड्याची जुळवा-जुळव करण्यात जिल्हा परिषदेच्या अर्थ खात्याची चौकशी समिती सध्या व्यस्त आहे. दरम्यान, या पंचायत समितीप्रमाणे नगर जिल्ह्यातील प्रत्येक पंचायत समितीमध्ये असा प्रकार घडलेला आहे? याचा शोध घेण्याची वेळ आली आहे.
जिल्हा परिषदेत अंतर्गत येणार्या जिल्ह्यातील उत्तर भागातील एका पंचायत समितीमध्ये कर्मचार्यांच्या पगाराचे पैसे पाच ते सहा कर्मचार्यांनी स्वत:च्या खात्यावर वर्ग करून घेतलेले आहे. हा प्रकार सुमारे महिनाभरापूर्वी समोर आला. त्यानंतर या प्रकाराची चौकशी करण्यात येत असून यात सुमारे चार कोटी रुपयांचा पगाराच्या कोट्यावधी रुपयांची अफरातफर झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या प्रकरणात चौकशी समितीच्या हाती आलेल्या कागदपत्रानूसार घोटाळ्याचा आकडा चार कोटी रुपयांचा असून हाती न सापडलेल्या कागदपत्रे शोधून त्यानूसार तपास केल्यास घोटाळ्याचा आकडा वाढणार आहे.
दरम्यान, जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून बदलून आलेले आनंद भंडारी त्यांचे स्वागत घोटाळ्याने होतांना दिसत असल्याची चर्चा सध्या जिल्हा परिषद कर्मचार्यांमध्ये आहे. सध्या या घोटाळ्याची अर्थ विभागाच्या पथकामार्फत सुरू असून पुढील आठवड्यात घोटाळ्याची व्याप्ती समोर येणार असून यात कोणकोण दोषी आहेत. त्यांच्यावर काय कारवाई होणार याकडे जिल्हा परिषद कर्मचार्यांचे लक्ष लागले आहे. जिल्हा परिषदेत गेल्या तीन वर्षापासून प्रशासक राज आहे. या काळात काही ठराविक विभागातील योजनाबाबत सातत्याने आरोप होत असतांना त्याकडे सर्वांचे दुर्लक्ष झाल्याचे दिसत आहे. यामुळे जिल्हा परिषदेतील गेल्या तीन वर्षातील सर्व विभागातील योजनांचे ऑडिट व्हावे, अशी मागणी होत आहे.
मुख्यालयात काम अपूर्ण, लाखोंचे बिल अदा
जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने मुख्यालयातील शौचालयाचे कामे अपूर्ण असतांना लाखो रुपयांचे बिल अदा करण्यात आल्याची तक्रार आलेली आहे. याप्रकरणात चौकशी समिती नेमण्यात आली होती. मात्र, महिनाभरानंतर देखील चौकशी पूर्ण झालेली नाही. या प्रकरणात अनेकांचे हात गुंतलेले असून यामुळे हा प्रकार दडपला जातो की काय अशी शंका उपस्थित करण्यात येत आहे.




