Sunday, May 4, 2025
HomeनगरAhilyanagar : जिल्हा परिषदेत बदल्यांची लगबग

Ahilyanagar : जिल्हा परिषदेत बदल्यांची लगबग

दोन दिवसात सेवा ज्येष्ठता यादी || दोन वर्षानंतर होणार सोय

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

जिल्हा परिषद कर्मचार्‍यांच्या बदल्यांसाठी सामान्य प्रशासन विभागाची धावपळ सुरू झाली आहे. येत्या दोन दिवसात बदलीसाठी पात्र असणार्‍या कर्मचार्‍यांची सेवा ज्येष्ठता यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यानंतर बदल्यांसाठी विभागनिहाय वेळापत्रक जाहीर करून येत्या 15 मेपर्यंत बदल्याची प्रक्रिया पारपाडण्यात येणार आहे. दरम्यान गेल्यावर्षी लोकसभा निवडणुकीमुळे जिल्हा परिषद कर्मचार्‍यांच्या बदल्या झाल्या नव्हते. यामुळे यंदा दरवर्षीपेक्षा दुप्पट विनंती आणि प्रशासकीय बदल्या होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली.

- Advertisement -

दरवर्षी ग्रामविकास विभागाच्या मान्यतेने 15 मे पर्यंत जिल्हा परिषद कर्मचार्‍यांच्या बदल्या पार पडतात. या बदल्यांची प्रक्रिया करण्यापूर्वी प्रत्येक विभागाच्या बदल्यांसाठी पात्र असणार्‍या कर्मचार्‍यांची सेवा ज्येष्ठता यादी तयार करून प्रसिद्ध करून त्यावर हरकती मागून बदलीसाठी पात्र असणार्‍या कर्मचार्‍यांची अंतिम यादी तयार करून ती जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येते. यानंतर ग्रामविकास विभागाच्या आदेशानूसार जिल्हा परिषद कर्मचार्‍यांच्या विनंती आणि प्रशासकीय बदल्या पारपाडण्यात येतात.

गेल्यावर्षी लोकसभा निवडणुकीमुळे जिल्हा परिषद कर्मचार्‍यांच्या बदल्या होऊ शकल्या नव्हत्या. यामुळे बदली पात्र असणार्‍या कर्मचार्‍यांनी नाराजी व्यक्त केली होती. मात्र, यंदा जिल्हा परिषद कर्मचार्‍यांच्या बदल्या करण्यात येणार असून त्या दृष्टीने सामान्य प्रशासन विभागाने नियोजन सुरू केले आहे. बदलीसाठी पात्र असणार्‍या कर्मचार्‍यांची विभागनिहाय सेवा ज्येष्ठता यादी प्रसिद्ध करण्यात आल्यानंतर बदलीसाठी विभागनिहाय वेळापत्रक तयार करून त्याला मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडून मान्यता घेण्यात येणार आहे. ही मान्यता मिळताच पुढील दहा दिवसात म्हणजेच 15 मे पर्यंत जिल्हा परिषद कर्मचार्‍यांच्या बदल्यांची प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार असल्याची सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शेळके यांनी दिली.

यंदा 500 हून अधिक बदल्या
मागीलवर्षी जिल्हा परिषद कर्मचार्‍यांच्या बदल्या होऊ शकल्या नव्हत्या. यामुळे यांना प्रशासकीय व विनंती अशा मिळून 500 हून अधिक कर्मचार्‍यांच्या बदल्या होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. यात दहा टक्के प्रशासकीय आणि दहा टक्के विनंती बदल्यांचा समावेश आहे.

बदल्यांवर अधिकारी राज
जिल्हा परिषदेत कर्मचार्‍यांचा बदल्या हा जिव्हाळ्याचा विषय असून सोयीची बदली करून घेण्यासाठी जिल्हा परिषद कर्मचारी काळजी घेतांना दिसतात. तर दुसरीकडे प्रशासन नियमावर बोट ठेवत बदल्यांची प्रक्रिया पूर्ण करत असते. यंदा जिल्हा परिषदेत सदस्य आणि पदाधिकारी नसल्याने बदल्यांवर पूर्णपणे ‘अधिकारी राज’ नियंत्रण राहणार असल्याचे दिसत आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Ahilyanagar : पाणीसाठा 30 टक्क्यांवर, जिल्ह्यात 120 टँकर सुरू

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्ह्यात उन्हाच्या तीव्रतेबरोबर पाणी टंचाईच्या झळा वाढू लागल्या आहेत. जिल्ह्यातील मोठ्या व मध्यम धरणात सरासरी पाणी साठा 30 टक्क्यांपर्यंत आला असून 105...