Wednesday, April 29, 2026
HomeनगरCrime News : ६,५०० रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी जिल्हा परिषदेचा कनिष्ठ अभियंता एसीबीच्या...

Crime News : ६,५०० रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी जिल्हा परिषदेचा कनिष्ठ अभियंता एसीबीच्या जाळ्यात; पळून जाण्याचा प्रयत्न फसला

शासकीय ठेकेदाराकडे लाचेची मागणी || आरोपी भाजपाचे उत्तर जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर यांचा सख्खा भाऊ

अहिल्यानगर । प्रतिनिधी

जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम उपविभागातील कनिष्ठ अभियंता (अतिरिक्त पदभार उपअभियंता) सचिन सुरेश दिनकर (वय 41, हल्ली रा. केडगाव, अहिल्यानगर, मुळ रा. सदाशिवनगर, नेवासा) याला 6 हजार 500 रूपयांच्या लाचेची मागणी केल्याप्रकरणी येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेत अटक केली आहे. शासकीय कामाचे बिल मंजुरीसाठी पुढे पाठवण्याच्या मोबदल्यात ठेकेदाराकडे लाचेची मागणी करून ती स्वीकारण्याची तयारी दर्शवल्याने ही कारवाई करण्यात आली. सचिन दिनकर हा भाजपाचे उत्तर जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर यांचा सख्खा भाऊ आहे.

- Advertisement -

दरम्यान, याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील तक्रारदार हे नोंदणीकृत शासकीय ठेकेदार आहेत. त्यांना देहरे (ता. अहिल्यानगर) येथील ग्रामपंचायत हद्दीत स्मशानभूमी सुशोभीकरणाचे काम मिळाले होते. या कामावर देखरेख करणे आणि पूर्ण झालेल्या कामाचे बिल मंजुरीसाठी वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवण्याची जबाबदारी सचिन दिनकर याच्याकडे होती. 11 मार्च 2026 रोजी तक्रारदाराने कामाचे बिल मंजूर करण्याबाबत विचारणा केली असता, दिनकर याने एकूण बिलाच्या 2 टक्के प्रमाणे 16 हजार 500 रूपये लाचेची मागणी केली होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी (23 मार्च) या तक्रारीची पडताळणी केली. पडताळणी दरम्यान दिनकर याने प्रत्यक्ष भेटीत आणि फोनवर तक्रारदाराकडे लाचेचा हिशोब मागितला.

यापूर्वी त्याने 10 हजार रूपये स्वीकारल्याचे मान्य करून उर्वरित 6 हजार 500 रूपयांच्या लाचेची मागणी केली व ती रक्कम स्वतः स्वीकारण्याचे मान्य केले. लाचेची रक्कम निश्चित झाल्यानंतर एसीबीच्या पथकाने सापळा रचला. सोमवारी सापळा कारवाई दरम्यान, तक्रारदार आणि दिनकर यांच्यात लाचेच्या रक्कमेबाबत पंचांसमक्ष चर्चा सुरू होती. तक्रारदाराने लाचेची रक्कम देण्याचा प्रयत्न केला असता, दिनकर याला तिथे उपस्थित असलेल्या पंचांचा संशय आला. संशय येताच त्याने आपल्या दुचाकीवरून घटनास्थळावरून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, सतर्क असलेल्या सापळा पथकाने पंचांच्या इशार्‍यावरून पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले. संशय आल्यामुळे त्याने प्रत्यक्ष रक्कम स्वीकारली नाही, तरीही लाचेची मागणी सिध्द झाल्याने त्याच्यावर कारवाई करण्यात आली. ही कारवाई पोलीस उपअधीक्षक अजित त्रिपुटे, पोलीस अंमलदार संतोष शिंदे, रवींद्र निमसे, बाबासाहेब कराड आणि हारून शेख यांच्या पथकाने केली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक छाया देवरे या करीत आहेत.

बांधकाम विभाग पून्हा रडारवर
जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या नगर तालुका उपविभागाचा नगर तालुक्याचा चार्ज दिनकर यांच्याकडे गेल्या सहा ते सात महिन्यांपासून होता. या ठिकाणी कोणाकडे चार्ज राहावा यावरून धूसफूस सुरू होती. शिवाय मार्चएण्डमुळे सध्या बांधकाम विभागातील वर्दळ अचानक वाढली असून लाचेच्या घटनेमुळे बांधकाम विभागासह जिल्हा परिषदेत एकच खळबळ उडाली आहे. जिल्हा परिषदेच वरिष्ठ अधिकार या विभागाच्या कामात कधी लक्ष घालणार असा प्रश्न या निमित्ताने पुन्हा उपस्थित करण्यात येत आहे.

ताज्या बातम्या

नांदुरमध्यमेश्वर अभयारण्यात ‘रोहित’ पाहुण्यांचे दिमाखदार आगमन

0
नाशिक | जिमाका वृत्तसंस्था Nashik निसर्गाच्या किमयेचा एक अद्भुत अविष्कार सध्या नाशिक जिल्ह्याचे भूषण असलेल्या आणि महाराष्ट्राची शान असलेल्या नांदुरमध्यमेश्वर अभयारण्यात पाहायला मिळत आहे. एप्रिलच्या...