Thursday, May 2, 2024
Homeनगरअहमदनगर जिल्हा परिषद गटांचे 'असे' आहे आरक्षण

अहमदनगर जिल्हा परिषद गटांचे ‘असे’ आहे आरक्षण

अहमदनगर | प्रतिनिधी | Ahmednagar

जिल्हा परिषदेच्या 85 गटांचे राजकीय आरक्षण गुरूवारी जिल्हाधिकारी कार्यालयात काढण्यात आले. यात सुरूवातीच्या काही गटाचे लोकसंख्येवर आधारीत थेट आरक्षण काढण्यात आले तर 22 गटांचे आरक्षण ईश्वरी चिठ्ठीने काढण्यात आले. काढण्यात आलेल्या आरक्षणावर 2 ऑगस्टपर्यंत हरकती घेण्यात येणार असून 5 ऑगस्टला आरक्षण अंतिम होवू ते राजपत्रात प्रसिध्द करण्यात येणार आहे. दरम्यान, झेडपीच्या नवीन आरक्षणामुळे अनेकांची जिल्हा परिषद सदस्य होण्याची संधी गेली असून काही ठिकाणी लोकसंख्येमुळे गट खुल्या प्रवर्गासाठी राहिल्याने संबंधीतांना झेडपीत येण्याची संधी मिळणार आहे.

- Advertisement -

आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी इच्छुक गुडघ्याला बाशिंग बांधून बसले आहेत. जिल्हा परिषद व पंचायत समिती गट व गणांच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम गुरूवार, 28 रोजी प्रशासनाने जाहीर केला होता. दुपारी 12 वाजेच्या दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा परिषदेच्या गटांची तर संबंधित तहसील कार्यालयात पंचायत समितीच्या गणांची आरक्षण सोडत काढण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित, उपजिल्हाधिकारी उर्मिला पाटील, तहसीलदार माधुरी आंधळे आणि ईश्वरी चिठ्ठी काढण्यासाठी गौतमी सरोदे यांच्यासह जिल्ह्याच्या विविध भागातील माजी जिल्हा परिषद सदस्य, कार्यकर्ते आणि नेत्यांचे स्वीय सहाय्यक हजर होते.

सुरूवातील संवर्गनिहाय काढण्यात येणार्‍या आरक्षणाची माहिती उपजिल्हाधिकारी पाटील यांनी दिली. यात 85 गटांपैकी 22 जागा ओबीसींसाठी यात 11 महिला, अनुसूचित जातीच्या 8 आणि त्यात 4 महिला, अनुसूचित जमातीच्या 11 यात 6 महिला, खुल्या प्रवर्गाच्या 44 जागा यात 22 महिलांच्या जागांसाठी आरक्षण काढण्यात आले. दरम्यान, झेडपीत 50 टक्के आरक्षण असल्याने 43 जागा या महिलांसाठी राखीव आहेत. आरक्षण काढल्यानंतर आज प्रारूप अधिसुचना प्रसिध्द करण्यात येणार असल्याची माहिती पाटील यांनी दिली. 2011 च्या लोकसंख्येनूसार 27 टक्क्यांच्या पुढे ओबीसींचे राजकीय आरक्षण जाणार नाही, याची काळजी घेण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले.

तसेच अनेक गटात नवीन गावे आले असून काही गटांची रचना बदली असल्याने त्या-त्या परिस्थितीनुसार त्याठिकाणी आरक्षण काढण्यात आले असल्याचे सांगण्यात आले. तसेच हे आरक्षण सन 2002 च्या आरक्षणावर आधारीत असून त्यावेळी असणारे आरक्षणानूसार आताचे आरक्षण काढण्यात आले असल्याचे सभागृहात सांगण्यात आले. काढण्यात आलेल्या आरक्षणावर त्याठिकाणी काहींनी आक्षेप घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, हे आरक्षण चक्रीय पध्दतीने नियमानुसार काढण्यात आल्याचे उपजिल्हाधिकारी पाटील यांनी सांगितले. सुरूवातीला अनुसूचित जातीसाठी, त्यानंतर जमातीसाठी, त्यानंतर ओबीसी, मग अनुसूचित जाती महिला, जमाती महिला, ओबीसी महिला आणि खुल्या प्रवर्गातील महिलांचे आरक्षण काढण्यात आले. 2008 ला महिलांसाठी राखीव असणार्‍या महिलांचे गटांचा समावेश खुल्या प्रवर्गात थेट करण्यात आला.

तालुकानिहाय गटांचे आरक्षण

अकोले – समशेरपूर (सर्वसाधारण), देवठाण (सर्वसाधारण महिला), धुमाळवाडी (अनुसूचित जमाती महिला), राजूर, पाडाळणे (इतर मागास वर्ग), कोतूळ (सर्वसाधारण महिला).

अकोलेत ‘कही खुशी कही गम’

संगमनेर – समनापूर (सर्वसाधारण महिला), तळेगाव (इतर मागास वर्ग), आश्वी बुद्रुक (अनुसूचित जमाती महिला), जोर्वे (सर्वसाधारण), संगमनेर खुर्द (सर्वसाधारण), घुलेवाडी (अनुसूचित जाती महिला), धांदरफळ बुद्रुक (सर्वसाधारण महिला), चंदनापुरी (सर्वसाधारण महिला), साकूर (सर्वसाधारण), बोटा (सर्वसाधारण).

संगमनेर : पंचायत समिती निवडणूकीसाठी आरक्षण जाहीर

कोपरगाव – सुरेगाव (अनुसूचित जमाती), शिंगणापूर (अनुसूचित जमाती महिला), करंजी बु. (इतर मागास वर्ग महिला), सवंत्सर (सर्वसाधारण महिला), कोळपेवाडी (सर्वसाधारण महिला), पोहेगाव बु. (सर्वसाधारण).

राहाता – पुणतांबा (सर्वसाधारण महिला), वाकडी (सर्वसाधारण महिला), बाभळेश्वर (सर्वसाधारण महिला), लोणी खुर्द (सर्वसाधारण महिला), साकुरी (सर्वसाधारण), कोल्हार बु. (इतर मागास वर्ग).

राहाता पंचायत समितीच्या गणांची सोडत जाहीर

श्रीरामपूर – उंदीरगाव (इतर मागास वर्ग), बेलापूर (इतर मागास वर्ग), टाकळीभान (सर्वसाधारण महिला), निपाणी वडगाव (सर्वसाधारण महिला), दत्तनगर (इतर मागास वर्ग महिला).

श्रीरामपुर पंचायत समितीच्या गणांची सोडत; असे आहेत आरक्षण

नेवासा – सलाबतपूर (सर्वसाधारण महिला), भेंडा बुद्रुक (सर्वसाधारण महिला), शनिशिंगणापूर (सर्वसाधारण महिला), सोनई, भानसहिवरे (इतर मागास वर्ग महिला), बेलपिंपळगाव (अनुसूचित जमाती महिला), पाचेगाव (अनुसूचित जमाती), चांदा (अनुसूचित जाती महिला).

नेवासा तालुक्यातील पंचायत समिती गणांची आरक्षण सोडत जाहीर

शेवगाव – दहिगाव ने (इतर मागास वर्ग), बोधेगाव (इतर मागास वर्ग), मुंंगी (इतर मागास वर्ग महिला), भातकुडगाव (इतर मागास वर्ग महिला), अमरापूर (अनुसूचित जाती).

पाथर्डी- कासार पिंपळगाव (सर्वसाधारण महिला), भालगाव (सर्वसाधारण), माळी बाभुळगाव (सर्वसाधारण), मिरी (सर्वसाधारण), टाकळी मानूर (सर्वसाधारण).

राहुरी- सात्रळ (इतर मागास वर्ग), उंबरे (इतर मागास वर्ग), टाकळीमिया (सर्वसाधारण महिला), गुहा (सर्वसाधारण), वांबोरी (सर्वसाधारण), बारगाव नांदूर (अनुसूचित जमाती).

राहुरी पंचायत समितीचे आरक्षण जाहीर

श्रीगोंदा – पिंपळगाव पिसा (सर्वसाधारण महिला), कोळगाव (अनुसूचित जाती महिला), मांडवगण (अनुसूचित जाती महिला), आढळगाव (अनुसूचित जाती), बेलवंडी (अनुसूचित जाती), लिंपणगाव (सर्वसाधारण), काष्टी (सर्वसाधारण).

कर्जत – मिरजगाव (अनुसूचित जाती महिला), चापडगाव (अनुसूचित जाती), कोरेगाव (अनुसूचित जाती), कुळधरण (सर्वसाधारण), राशीन (इतर मागास वर्ग महिला).

जामखेड – साकत (इतर मागास वर्ग महिला), खर्डा (इतर मागास वर्ग महिला), जवळा (इतर मागास वर्ग).

पारनेर – ढवळपुरी (अनुसुचित जमाती), कान्हुर पठार (नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला), टाकळी ढोकेश्वर (सर्वसाधारण), निघोज (सर्वसाधारण), सुपा (सर्वसाधारण), जवळा (सर्वसाधारण).

नगर तालुका – वडगाव गुप्ता (सर्वसाधारण महिला), जेऊर (सर्वसाधारण महिला), चिचोंडी पाटील (सर्वसाधारण महिला), नागरदेवळे (इतर मागास वर्ग महिला), नवनागापूर (अनुसुचित जाती महिला), दरेवाडी (सर्वसाधारण). वाळकी (सर्वसाधारण).

मोठ्या प्रमाणात हरकतींची शक्यता

गुरूवारी जिल्हा परिषद गटांच्या काढण्यात आलेल्या आरक्षणावर अनेक तालुक्यातून नाराजी व्यक्त होते. 2017 असणारे आरक्षण पुन्हा काढण्यात आले. गट आणि गणांची नव्याने रचना झालेली असल्याने त्यानूसार आरक्षण निघालेले नाही, यासह अन्य आक्षेप काढण्यात आलेल्या आरक्षणावर घेण्यात येत आहे. येत्या 2 ऑगस्टपर्यंत आरक्षणावर हरकती घेण्यासाठी कालावधी असल्याने मोठ्या प्रमाणात हरकती दाखल होण्याची शक्यता आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या