Wednesday, October 23, 2024
Homeनगरनगर, श्रीगोंद्याच्या उमेदवारीचा घोळ कायम

नगर, श्रीगोंद्याच्या उमेदवारीचा घोळ कायम

नागवडे यांचा आज मुंबईत ठाकरे सेनेत प्रवेश || बदलणार्‍या राजकीय समिकरणाकडे लक्ष

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

नगर जिल्ह्यातील काही मतदारसंघातील महायुती आणि महाविकास आघाडीच्या लढती जवळपास स्पष्ट झालेल्या असल्या तरी नगर दक्षिणेतील नगर शहर आणि श्रीगोंद्यातील महाविकास आघाडीतील उमेदवारांचा पेच मंगळवारी सायंकाळपर्यंत कायम होता. दरम्यान, नाट्यपूर्ण घडमोडीनंतर महायुतीच्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देणारे श्रीगोंद्यातील नागवडे कुटुंब आज (बुधवारी) मुंबईत उध्दव बाळासाहेब ठाकरे (उबाठा) गटात प्रवेश करणार आहे. मात्र, या प्रवेशानंतर विधानसभेसाठी त्यांची उमेदवार फायनल होणार की नाही, याबाबत राजकीय पुष्टी मिळू शकली नाही.

- Advertisement -

दरम्यान, काल सायंकाळी नगर शहर मतदारसंघातून निवडणुकीची जोरदार तयारी करत असलेले आणि पक्ष कोणताही असो उमेदवारी करणार अशी घोषणा केलेले केडगावच्या संदीप कोतकर आणि कुटुंबाने देखील निवडणुकीतून माघार घेतल्याची चर्चा सुरू झाली. मात्र, याबाबत संदीप कोतकर अथवा त्यांच्या समर्थक यांच्याकडे वारंवार विचारणा केल्यानंतर याबाबत अधिकृत माहिती नसल्याचे सांगण्यात आले. यामुळे नगर शहरात संभ्रमाचे वातावरण होते. विधानसभा निवडणुकीसाठी कालपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरूवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यासह मुंबईच्या राजकीय वर्तुळात वेगवान घडामोडी घडतांना दिसत आहे.

जिल्ह्यात पाच मतदारसंघात महाविकास आघाडीतील भाजप, उर्वरित ठिकाणी अजित पवार गटाच्या उमदेवारांची घोषणा जवळपास झालेली आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीच्या काही जागांची घोषणा झाल्याचे सांगण्यात येत असले तरी काही जागांवर चर्चा सुरुच असल्याचे दिसत आहे. विशेषकरून नगर दक्षिण जिल्ह्यात महाविकास आघाडीच्या उमेदवारीवरून गुंत आहे. मंगळवारी दुपारी मिळालेल्या माहितीनूसार नगर शहर मतदारसंघावर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीपाठोपाठ काँग्रेस आणि उबाठा पक्षाने दावा केला. नगर जिल्ह्यात सर्वाधिक जागा या शरद पवार गटाला मिळालेल्या आहेत. विशेष करून नगर दक्षिण जिल्ह्यात काँग्रेसचे मोठे जाळे असतांना ही दक्षिणेत काँग्रेसच्या वाट्याला एकही जागा नसल्यास त्याचा परिणाम पक्षावर होणार असल्याचे जिल्ह्यातील नेत्यांनी काँग्रेसच्या वरिष्ठांना सांगितले.

दरम्यान, जागा वाटपाची चर्चा अद्याप सुरू असून अजून नगर शहराबाबत आशा संपलेल्या नाहीत, असा निरोप मुंबईवरून जिल्ह्यातील काँग्रेस नेत्यांना देण्यात आला. मात्र, त्यानंतर सांयकाळी नगरची जागा उबाठाच्या वाट्याला जाणार असल्याची चर्चा सुरु झाली. मात, अखेरपर्यंत याला अधिकृत दजोरा मिळाला नाही. दरम्यान, श्रीगोंद्यातील जागवेरून महाविकास आघाडीत तानाताणी सुरू होती. ही जागा सुरूवातीला शरद पवार गटाच्या वाट्याला असल्याचे सांगण्यात येत असतांना काल दुपारी स्वत: राजेंद्र नागवडे यांनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनुराधा नागवडे या आज ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती सोशल मीडियाद्वारे दिली. त्यानंतर ही जागा ठाकरे सेनेला जाणार असल्याची चर्चा सुरू झाली. मात्र, कोणत्याही परिस्थितीत ही जागा शरद पवार यांची असून त्याठिकाणी तुतारीचा उमेदवार रिंगणात राहणार असल्याचा दावा करण्यात आला. यामुळे राजकीय गाेंंधळला मोठी भर पडली. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील राजकीय समिकरण बदल असून महायुतीच्या मुंबईच्या बैठकीत नगर शहर आणि श्रीगोंद्याचा निर्णय होणार असल्याचे सांगण्यात आले.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या