Saturday, September 14, 2024
Homeनगरनगर : भिंगारमध्ये ‘महाविकास’ला तिलांजली…!

नगर : भिंगारमध्ये ‘महाविकास’ला तिलांजली…!

शिवसेनेची स्वतंत्र तयारी । लवकरच बैठक

- Advertisement -

अहमदनगर (प्रतिनिधी) – राज्यात महाविकास आघाडीच्या प्रयोगातून शिवसेना-काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र आली तरी त्याचा परिणाम भिंगारमध्ये होऊ घातलेल्या कॅन्टोमेंट निवडणुकीवर होणार नाही. शिवसेना स्वतंत्र लढण्याची तयारी करत असल्याने ‘महाविकास आघाडी’ला तिलांजली मिळण्याचे संकेत भिंगारमधून मिळत आहेत. भिंगार शिवसेना प्रमुख सुनील लालबोंद्रे, महिला आघाडी प्रमुख कांता बोठे यांनी ‘उपनेते अनिल भैय्या सांगतील ते’ असे म्हणत सस्पेन्स कायम ठेवला.

भिंगार कॅन्टोमेंट बोर्डाची निवडणूक कोणत्याही क्षणी जाहीर होण्याची शक्यता आहे. सात जागेसाठी ही निवडणूक होणार आहे. शिवसेनेचे तीन विद्यमान सदस्य आहेत. गतवेळी भाजपसोबत युती होती. एका जागेवर मैत्रीपूर्ण लढत झाली होती. यंदा मात्र राज्यात भाजप-सेनेची युती तुटल्याने भिंगारमध्येही भाजप-सेनेची युती होणार नाही, हे स्पष्ट झाले आहे. स्थानिक पातळीवर राष्ट्रवादी हा शिवसेनेचा राजकीय विरोधक आहे. त्यामुळे राष्ट्रवादीसोबत आघाडी करू नये असा सूर भिंगार शिवसैनिकांनी आळवला आहे. स्थानिक भिंगारकर महाविकास आघाडीच्या विरोधात असले तरी प्रदेश पातळीवरून आलेला निर्णय सगळ्यानांच मान्य करावा लागणार आहे.

प्रदेशने आदेश दिला तरी उपनेते अनिल राठोड तो नगरमध्ये पाळतील का? हा खरा प्रश्‍न आहे. संजय छजलानी यांचा वार्ड जैसे थे राहिला असून रवी लालबोंद्रे आणि प्रकाश फुलारी यांचे वार्ड महिला आरक्षित झाले आहेत. त्यामुळे येथे नव्याने महिला उमेदवार शिवसेनेला शोधावे लागतील. उमेदवारांची चाचपणी आणि आगामी राजकीय रणनितीसाठी पुढील आठवड्यात भिंगार शिवसेनेचे बैठक होत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

भिंगार… शिवसेनेचा बालेकिल्ला
भिंगारमधील 4 ते 7 असे चार वार्ड हे शिवसेनेचे बालेकिल्ला म्हणून ओळखले जातात. अनिल राठोड यांच्या 25 वर्षाच्या आमदारकीच्या काळातही ते सिध्द झाले आहेच. यंदाच्या विधानसभेत मात्र राष्ट्रवादीनेही तेथे मुसंडी मारली. कॅन्टोमेंटच्या निवडणूक निमित्ताने शिवसेनेला भिंगार बालेकिल्ला असल्याचे सिध्द करण्याची ‘हिच ती वेळ’ दाखवून देण्याची नामी संधी आली आहे.

महाविकास आघाडीची बिलकुल शक्यता नाही. उपनेते अनिल राठोड ठरवतील तो निर्णय भिंगार शिवसेनेला मान्य असणार आहे. निवडणूक जाहीर झाल्यानंतरच राजकीय हालचाली गतीमान होतील.
– सुनील लालबोंद्रे, शहर प्रमुख, शिवसेना, भिंगार.

शिवसेनेचे वर्चस्व असलेले दोन वार्ड महिलांसाठी राखीव झाले आहेत. शिवसेनेकडे अनेक उमेदवार आहेत. महाविकास आघाडी झाली तर शिवसेनेतील इच्छुकांवर अन्याय होईल. त्यामुळे शिवसेना स्वतंत्र लढण्याची तयारी करत आहे.
– कांता बोठे, महिला आघाडी प्रमुख, शिवसेना, भिंगार.

- Advertisment -

ताज्या बातम्या