भिंगार कॅन्टोन्मेंट । शिवसेना सदस्यांच्या वार्डात महिला आरक्षण
भिंगार (वार्ताहर) – आगामी कॅन्टोमेंट बोर्डाच्या निवडणुकीसाठी आज लेडीज आरक्षण सोडत काढण्यात आली. या सोडतीमध्ये शिवसेनेच्या दोन्ही विद्यमान नगरसेवकांचे वार्ड लेडीजसाठी राखीव झाले. त्यामुळे भिंगार शिवसेना शहर प्रमुख रवींद्र लालबोंद्रे आणि प्रकाश फुलारी या दोघाही शिवसेनेच्या विद्यमान नगरसेवकांना दुसर्या वार्डाचा शोधाशोध करावी लागेल अथवा उमेदवारीसाठी कुटुंबातील महिला पुढे करावी लागणार आहे.
सात वार्ड असलेल्या भिंगार छावणी मंडळाची निवडणूक नव्या वर्षात होणार आहे. दोन महिलेसाठी आणि एक जागा अनुसुचित जातीसाठी राखीव आहे. पूर्वी मीना मेहतानी यांचा 1 नंतर तर शुभांजी साठे यांचा पाच नंबर वार्ड लेडीजसाठी राखीव होता. आज नव्याने महिला राखीव वार्डासाठी सोडत काढण्यात आली. त्यात लालबोंद्रे यांचा 4 नंबर तर फुलारी यांचा 6 नंबर वार्ड महिलेसाठी राखीव निघाला. यामुळे या दोघांनाही आता कुटुंबातील सदस्याला उमेदवारीला पुढे करावे लागेल अथवा स्वत:साठी दुसरा ‘सेफ’ वार्ड शोधावा लागणार आहे.
पाच नंबर वार्डाचे प्रतिनिधीत्व करणार्या भाजप नगरसेविका शुभांगी साठे यांचा वार्ड आता खुला झाला आहे. त्या स्वत: पुन्हा निवडणूक लढणार की पती निवडणुकीच्या आखाड्यात उतरणार याकडे भिंगारकरांचे लक्ष लागून आहे. मीना मेहतानी यांचाही वार्ड आता खुला झाला आहे. एससीसाठी राखीव असलेला वार्ड नंबर सातमधील लोकसंख्या पाहता यंदाही या वार्डातील आरक्षण कायम राहिले आहे.
उपाध्यक्ष मुस्साभाई पुन्हा रिंगणात
राष्ट्रवादी च्या मीना मेहतानी, मुस्सा सय्यद आणि कलीम शेख या तिघाही विद्यमान नगरसेवकांचे वार्ड आहे तसेच राहिले आहेत. यातील उपाध्यक्ष मुस्सा सय्यद आणि कलीम शेख यांच्या वार्डात महिला आरक्षण पडते का? याकडे अनेकांचे लक्ष लागून होते. पण आरक्षण सोडतीत ते बालंबाल बचावले.