अहमदनगर । प्रतिनिधी
नालेगाव येथील एका प्लॉटवर दिवाणी कोर्टाचा मनाई हुकुम असतानाही काही व्यक्तींनी रात्रीतून ताबा मारला. सदरची घटना 6 ऑगस्ट रोजी रात्री साडे अकरा ते 7 ऑगस्ट रोजी दुपारी तीनच्या दरम्यान घडली आहे.
या प्रकरणी रामेश्वर बालुराम कलवार (वय 62 रा. चैतन्यनगर, सावेडी, सध्या रा. विमाननगर, पुणे) यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी यांचा नालेगावामधील सर्व्हे नंबर 17/4 वरील 1584 चौ. मीचा प्लॉटवर दिवाणी कोर्टाचा मनाई हुकुम आहे. तसा बोर्ड त्या ठिकाणी लावण्यात आला आहे.
हे ही वाचा : ‘मोक्का’,‘एमपीडीए’च्या प्रस्तावांना गती द्या
दरम्यान, सदर ठिकाणी अक्षय सतिष डाके, शाहिद सैद शेख (दोघे रा. नगर), स्वाती शरद मोहोळ (रा. पुणे) यांच्या सांगण्यावरून त्यांच्या इतर चार ते पाच साथीदारांनी अनाधिकृतपणे मनाई हुकुम असलेल्या मिळकतीत शिरकावा करून तार कंपाऊंड व लोखंडी गेट तोडून प्रवेश केला.
सदर ठिकाणी नवीन पत्रे उभे करून ताबा मारला. तेथे लावण्यात आलेला बोर्ड तोडून तेथील सीसीटीव्हीची तोडफोड केली. सदर ठिकाणी फिर्यादी यांचा मॅनेजर जितेंद्र साधु हे गेले असता त्यांना मारहाण करण्यात आली. ‘तुझ्या मालकाला सांग तो येथे आल्यास मी गोळ्या घालून कापून पार्सल करून देईल’ अशी धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास पोलीस करत आहेत.
हे ही वाचा : दारू पिण्यासाठी पैसे नसल्याने तो दुचाकींची चोरी करायचा