अहमदनगर|Ahmednagar
जिल्ह्यातील करोनाचा संसर्ग आता चांगलाच व्यापक होण्यास सुरूवात झाली आहे. दररोज सरकारी आणि खासगी प्रयोग शाळेतून मोठ्या संख्याने पॉझिटिव्ह रुग्णांचे अहवाल समोर येत आहे. मंगळवारी देखील दिवसभरात करोनाचे 41 नव्याने रुग्ण समोर आले आहेत.
यामुळे जिल्ह्यातील बाधितांचा आकडा 1 हजार 76 झाला असून यात अक्टिव्ह केसेसची संख्या 384 झाली आहे. दरम्यान, भगवतीपूर येथील करोना पॉझिटिव्ह वृध्दाचा नगरमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. काल दुपारी ही घटना घडली असून त्यास आरोग्य यंत्रणेने दुजोरा दिला आहे.
मंगळवारी जिल्हा रुग्णालयाच्या करोना चाचणी प्रयोग सायंकाळी 19 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले, तर खाजगी प्रयोगशाळेत बाधित आढळून आलेल्या 22 रुग्णांची नोंद जिल्ह्याच्या एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली. त्यामुळे उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या आता 384 इतकी झाली आहे.
जिल्हा रुग्णालयाच्या अहवालानुसार नगर शहरातील 12, नगर ग्रामीण 3, श्रीगोंदा 2, राहुरी तालुक्यातील वांबोरी येथील 1 आणि भिंगार येथील एका रुग्णाचा समावेश आहे. यात नगर महापालिका क्षेत्रात मुकुंदनगर, गवळीवाडा, दिल्ली गेट, आंबेडकर चौक, मंगल गेट, सम्राट नगर, समतानगर, पाइपलाईन रोड, सिद्धार्थनगर, स्वास्थ्य हॉस्पिटल, आदी ठिकाणी बाधित रुग्ण आढळून आले. याशिवाय नागापूर येथे 1, हिंगणगाव 1 आणि रुईछत्तीशी येथे 1, भिंगार येथील एका रुग्णाचा अहवाल पॉझिटिव आला. श्रीगोंदा तालुक्यातील चिंबळा आणि मांडवगण येथील प्रत्येकी एक रुग्ण बाधित आढळून आला. काल दिवसभरात 280 हून अधिक जणांचे अहवाल निगेटिव्ह आले होते.
आणखी 17 रुग्णांची करोनावर मात
मंगळवारी आणखी 17 रुग्णांनी करोनावर मात केली. यात महानगरपालिका क्षेत्रातील 15 आणि पारनेर तालुक्यातील 2 रुग्णांना मिळाला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला. यामुळे आतापर्यंत करोना मुक्त झालेल्यांखी संख्या 666 झाली आहे. तर 27 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
सारांश
उपचार सुरू असलेले रुग्ण : 384
बरे झालेले रुग्ण : 666
मृत्यू: 27 (एकाची पोर्टलवर नोंद बाकी)
एकूण रुग्ण संख्या : 1076
जिल्ह्यात सोमवारी रात्री उशीरा आणखी 71 रुग्णांचे करोना अहवाल पॉझिटिव्ह आले. हे सर्व अहवाल खासगी प्रयोग शाळेतील आहेत. यात नगर शहरातील 66, शिर्डी 4 आणि कोपरगाव करंजी येथील एका रुग्णाचा समावेश आहे. या सर्व रुग्णांची नोंद करोना पोर्टलवर झाल्यावर त्यांची नोंद जिल्ह्याच्या एकूण रुग्ण संख्येत होणार असल्याचे सुत्रांनी सांगितले.