Tuesday, May 5, 2026
Homeब्रेकिंग न्यूजMaharashtra News : ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं ठिकाण ठरलं;...

Maharashtra News : ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं ठिकाण ठरलं; तब्बल ३२ वर्षांनी ‘या’ शहराला मिळाला मान

पुण्याच्या बैठकीत एकमताने निर्णय

पुणे | Pune

यंदाच्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे (Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan) ठिकाण निश्चित करण्यात आले आहे. त्यानुसार आता ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सातारा शहरात (Satara City) होणार आहे. सातारा येथील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शाहूपुरी शाखेला आणि मावळा फाउंडेशनला संमेलनाचे यजमानपद मिळाले आहे.

- Advertisement -

आज (रविवार) पुण्यात अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाची बैठक झाली. या बैठकीत हा निर्णय एकमताने घेण्यात आल्याची माहिती महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी (Milind Joshi) यांनी दिली. या बैठकीस उपाध्यक्ष गुरुय्या स्वामी, कार्यवाह सुनिताराजे पवार, कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी यांच्यासह सर्व घटक, समाविष्ट आणि संलग्न संस्थांचे प्रतिधिनी उपस्थित होते.

यावेळी प्रा. मिलिंद जोशी म्हणाले की, ३२ वर्षानंतर साताऱ्याला अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्याचा मान मिळाला आहे. यापूर्वी १९९३ साली विद्याधर गोखले यांच्या अध्यक्षतेखाली साताऱ्यात संमेलन झाले होते. गेल्या १२ वर्षांपासून महाराष्ट्र साहित्य परिषदेची शाहूपुरी शाखा साताऱ्याला (Satara) अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजनाची संधी मिळावी यासाठी पाठपुरावा करत होती. त्यानंतर अखेर हे संमेलन सातारा येथील छत्रपती शाहू स्टेडियमवर होणार आहे.

दरम्यान, ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी सदानंद साहित्य मंडळ, औदुंबर, महाराष्ट्र साहित्य परिषद, शाखा इचलकरंजी, दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा, कोल्हापूर आणि महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा शाहूपुरी सातारा या संस्थांकडून निमंत्रणे आली होती. या स्थळांना भेटी दिल्यानंतर साताऱ्याला अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन घेण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला.

ताज्या बातम्या

अनोळखी इसमाचा मृतदेह आढळला

0
पुनदखोरे | वार्ताहर कळवण शहरात एक धक्कादायक घटना समोर आली असून कळवण पोलीस ठाणे हद्दीत श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर, ओतूर रोड लगत एका अनोळखी...