अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
राज्यात करोनाचा वाढता प्रकोप लक्षात घेता विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्यादृष्टीने शालेय शिक्षण विभागाने दहावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
अंतर्गत मूल्यमापन करून विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेश मिळणार असून नगर जिल्ह्यातील 73 हजार विद्यार्थी या मूल्यमापनातून उत्तीर्ण होणार आहेत. यात 30 हजार 534 विद्यार्थिनींचा समावेश आहे.
राज्यासह देशभरात करोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची सुरक्षा लक्षात घेता सर्वात प्रथम सीबीएससी बोर्डाने दहावीच्या परीक्षा रद्द केल्या. त्यानंतर लागलीच आयसीएसई बोर्डानेही दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. या केंद्रीय आणि आंतरराष्ट्रीय मंडळांनी परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतल्याने गुणांचे समानीकरण या मुद्द्यावर
राज्य शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारने मंत्रिमंडळ बैठकीत मंगळवारी घेतला. तर बारावीची परीक्षा होणार असून ती पुढे ढकलण्यात आली आहे. यापूर्वी राज्य सरकारने पहिली ते नववी आणि अकरावीच्या परीक्षा रद्द करून या विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेशित केले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हे निर्णय घेण्यात आले आहेत.
त्यामुळे केवळ दहावी आणि बारावी या विद्यार्थ्यांच्या परीक्षाबाबतचा निर्णय प्रलंबित होता. त्यावर आता शिक्कामोर्तब झाले आहे. दहावीची परीक्षा रद्द होणार असली तरी विद्यार्थ्यांचे अंतर्गत मूल्यमापन केले जाणार आहे. ते कोणत्या आधारे आणि कोणत्या निकषावर करायचे याबाबतच्या सूचना शालेय शिक्षण विभाग येत्या काही दिवसात देईल. मात्र या अंतर्गत मूल्यमापनातून कोणीही विद्यार्थी अनुत्तीर्ण होणार नाही याची काळजी शासन घेणार असल्याचे समजते.
ज्या विद्यार्थ्यांना आपली गुणवत्ता सिद्ध करायचे आहे त्यांनाही वेगळी संधी दिली जाईल असे शासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान, जिल्ह्यातून दहावीसाठी एकूण 70 हजार 139 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यात 42 हजार 597 विद्यार्थी, तर 30 हजार 534 विद्यार्थिनींचा समावेश होता. 29 एप्रिलपासून या विद्यार्थ्यांची परीक्षाही सुरू होणार होती. करोनाच्या पार्श्वभूमीवर जूनपासून शाळा बंद होत्या. नोव्हेंबरपासून दहावी, बारावीचे वर्ग सुरू झाले, मात्र त्यालाही फारशी उपस्थिती नव्हती. बहुतांश अभ्यासक्रम ऑनलाईनच शिकवला गेला. ग्रामीण भागात मात्र तंत्रज्ञानाची सुविधा नसल्याने विद्यार्थ्यांची मोठी अडचण होत होती. परीक्षा रद्दच्या निर्णयामुळे या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. दहावीला प्रविष्ट झालेले विद्यार्थी- विद्यार्थी – 42 हजार 597- विद्यार्थिनी – 30 हजार 534, एकूण – 73 हजार 139