Sunday, November 17, 2024
HomeनगरAhmednagar District Bank : सर्वसाधारण सभेवर सभासदांची नजर!

Ahmednagar District Bank : सर्वसाधारण सभेवर सभासदांची नजर!

हिशेब पत्रक, ताळेबंद, नफावाटणीसह अंदाजपत्रक अजेंड्यावर

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

गेल्या काही महिन्यांपासून जिल्हा बँक प्रशासन आणि संचालक मंडळ वेगवेगळ्या कारणामुळे ‘प्रकाश झोतात’ असताना येत्या शुक्रवारी (दि. 27) जिल्हा बँकेची सर्वसाधारण सभा होत आहे. या सभेत काय होणार, बँकेच्या कारभाराबाबत उपस्थित झालेल्या प्रश्नांंबाबत बँकेच्या भूमिकेला ‘जाहीर प्रगटनातून सहमती देणारे संचालक मंडळ प्रत्यक्ष बैठकीत धरून ठेवलेली गुळणी सोडतील का, असा प्रश्न असून यंदाची जिल्हा बँकेची सभा संचालकांनी मुद्दे मांडले तरी आणि तोंडावर बोट ठेवले तरी चर्चित ठरण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

जिल्हा बँकेची सर्वसाधारण सभा अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले यांच्या अध्यक्षतेखाली होणार असून यात विषय पत्रिकेवर मागील दिनांक 16 सप्टेंबर 2023 रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त कायम करणे, संचालक मंडळाने सादर केलेल्या 2023-24 अखेरच्या सालाचा बँकेच्या कामकाजाचा वार्षिक अहवाल, ताळेबंद, नफातोटा पत्रक आदी हिशोबाची पत्रके व नफावाटणी, तसेच 2024-25 च्या उत्पन्न व खर्चाचे अंदाजपत्रक मंजूर करणे, 2022-23 च्या वैधानिक लेखापरीक्षक यांचा वैधानिक अहवाल त्यावरील दोष दुरूस्ती अहवालात नमुद करणे, तसेच 2023-24 च्या वैधानिक तपासणी अहवालाची नोंद घेणे, 2024-25 या आर्थिक वर्षाच्या लेखापरीक्षणासाठी वैधानिक लेखापरीक्षकाची नियुक्ती करणे, संचालक मंडळाने शिफारस केल्यानूसार 2024-25 या आर्थिक वर्षासाठी वैधानिक लेखापरीक्षकाची नियुक्ती करणे यासह अन्य ऐनवेळी येणार्‍या विषयांवर चर्चा करण्यात येणार आहे.

सभेत संचालक मंडळाच्यावतीने सादर करण्यात येणार्‍या अहवालात बँकेच्या आर्थिक परिस्थितीची ताजी आकडेवारी समोर येणार आहे. यात बँकेला झालेला नफा, कर्ज वाटप, त्याची वसूली, भागभांडवल, स्थावर मालमत्ता, एनपीएची स्थिती, बँकेचा सीडी रेशा यांचा समावेश राहणार आहे. यासह मागील आर्थिक वर्षात बँकेचा विविध विषयांवर झालेला खर्च याचा तपाशील देखील राहणार आहे. दरम्यान, या बैठकीत जिल्हा बँकेच्या सहकार विभागाकडून सुरू असणार्‍या चौकशी आणि उपस्थित करण्यात आलेले आर्थिक मुद्दे यावर संचालक मंडळ आणि अध्यक्ष काय भुमिका घेणार, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. बँकेने चौकशीच्या धुक्यावर वर्तमानपत्रांतून ‘जाहीर प्रगटन’ प्रसिध्द करून सभासदांसमोर सर्व काही आलबेल असल्याचे चित्र उभे करण्याचा प्रयत्न केला.

तरिही अनेक प्रश्न अनुत्तरीत आहेत. अनेक सभासद यावर अभ्यास करत आहेत. त्यामुळे जागृत सभासद पक्षीय राजकारण सोडून बँकेच्या हितासाठी काय भुमिका घेणार? जिल्ह्यातील सहकारी सोसायट्याचे प्रश्न, गट सचिवांचे म्हणणे यावेळी मांडण्यात येणार असल्याची शक्यता व्यक्त होत आहे. मागील सभेत संचालक मंडळाने थकीत कर्जाच्या वुसलीसाठी काही निर्णय घेतल्याने जिल्ह्यातील 400 सहकारी सोसायट्यांना त्याचा फायदा असल्याचे सांगण्यात आले. त्यानूसार यंदा काही निर्णय होणार का, याकडे जिल्ह्याचे लक्ष राहणार आहे.

चौकशीवर बोलू काही !
जिल्हा बँकेच्या भरतीसह सहकार खात्याकडून सुरू असणार्‍या चौकशीवर सर्वसाधारण सभेत संचालक मंडळ काय भूमिका घेणार, हा कळीचा मुद्दा ठरू शकतो. खासगीत बोलणारे काही संचालक कारभारावर जाहीरपणे बोलत नसले तरी सभेत काही मुद्दे मांडणार की नाही? की प्रगटनाच्या निमित्ताने बँकेतील कारभाराला दिलेली मुकसंमती कायम ठेवणार, अशा प्रश्नांच्या उत्तराकडे सभासदांचे लक्ष आहे. बँकेच्या विद्यमान परिस्थितीकडे ‘डोळेझाक’ करणारे जिल्ह्यातील मातब्बरे नेते काही सुधारणेचा कानमंत्र देणार की ‘जे सुरू आहे त्यास’ रेटत राहणार, याचेही उत्तर सभासद शोधत आहेत.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या