अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
जिल्हा बँकेच्या भरतीसाठी आज शुक्रवारपासून ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरूवात होणार आहे. बँकेच्या भरतीसाठी संचालक मंडळाने आग्रहाने यासाठी पुण्याच्या वर्कवेल इन्फोटेक कंपनीची निवड केलेली आहे. ही भरती पारदर्शकपणे करण्यासाठी त्रयस्थ कंपनीची निवड केल्यानंतरही भरतीच्या जाहीरातीलमध्ये अनेक अटीशर्ती टाकत एका प्रकारे बँकेच्या संचालक मंडळाचे नियंत्रण भरती प्रक्रियेवर ठेवण्याचा प्रयत्न केल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे भरतीसाठी अभ्यास करून ऑनलाईन परीक्षा दिल्यानंतर शेवटच्या टप्प्यात भरतीची सुत्रे ही संचालक मंडळाने गठीत केलेल्या समितीच्या हाती राहणार आहेत. यामुळे या भरतीमध्ये संचालक मंडळासह उमेदवारांमध्ये चढाओढ होणार असल्याची कुजबुज आहे.
गेल्या सहा महिन्यांपासून जिल्ह्यात नगर जिल्हा बँकेच्या भरतीचा विषय चर्चेत आहे. बँकेच्या 700 जागांसाठी ही भरती प्रक्रिया होणार असून यात अनेकांनी आपले उखळ पांढरे करून घेण्यासाठी तयारीही सुरू केल्याचे कानावर आले आहे. काही झाले तरी भरतीत आपलेच उमदवार फिट झाले पाहिजेसाठी नियोजन करण्यात आले असून यात बँक प्रशासनातील मंडळींसह काही संचालकांचा समावेश असल्याचे बोलले जात आहे. यामुळे दमदमसे भरतीचा विषय हाताळण्यात येवून भरती प्रक्रिया राबवण्यात नवख्या वर्कवेल इन्फोटेक कंपनीची निवड करण्यात आल्याची माहिती काही संचालकांनी खासगीत दिली. वास्तवात संचालक मंडळाच्या बैठकीत अनेकांनी वर्कवेल कंपनीच्या नियुक्तीवर प्रश्न उपस्थित केल्यानंतरही काहींनी हा विषय रेटून नेत संबंधीत कंपनीकडे भरतीची जबाबदारी सोपवली. दरम्यान भरतीसह बँकेच्या अनेक निर्णयावर नाराज असणार्या काही संचालकांनी बँकेच्या मासिक बैठकीला दांडी मारण्यास सुरूवात केली आहे आणि उपस्थितीत असणार्यांनी अमान्य विषयांवर हरकती नोंदवलेल्या आहेत. मात्र, या हरकती इतिवृत्तापर्यंत पोहचलेल्या आहेत की याबद्दल खुद्द त्यांनाच शंका आहे.
दरम्यान, 2017 मध्ये मंजूर मिळून त्यानंतर पारपडलेल्या बैठकेच्या 450 जागांची भरती चांगलीच गाजली होती. या भरतीच्या प्रक्रियेत अनेक गंभीर प्रकार होवून अखेर सहकार आयुक्त यांच्यासह न्यायालयात प्रकरण गेल्यानंतर कशीतरी बँकेने ही भरती पूर्ण करून घेत पात्र असणार्यांना नेमणूका दिल्या होत्या. त्यावेळी भरती आणि ती राबवणार्या नायबर कंपनीबाबत अनेक आक्षेप नोंदवले गेले होते. बँकेच्या तात्कालीन संचालक मंडळासह अधिकार्यांनी आपल्या आपल्या नातेवाईकांना नोकरीत समावून घेतले असल्याचा आरोप झाला होता. यामुळे यंदा होणार्या भरतीकडे सुरूवातीपासून सर्वाचे लक्ष आहे. मात्र, बँकेने गेल्या भरतीचा अनुभव पाहता यंदा काही गोष्टी आधीच बांधून घेतल्याचे भरतीच्या अटींवरून दिसत आहे. भरतीमध्ये प्रयत्नांची पराकाष्टा केल्यानंतर शेवटचे मुलाखतीचे दहा गुण बँकेच्या हातात राहणार आहे. संचालक मंडळाने नियुक्त केलेली कमिटी कागदपत्रांना 5 तर तोंडी परीक्षेला 5 असे दहा गुण देणार असल्याने यात घोडेबाजार होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
संगणक विभागासाठी तीन मॅनेजर
687 लिपिक, चार वाहन चालक व पाच सुरक्षारक्षक यांच्यासह जनरल मॅनेजर संगणक, मॅनेजर संगणक, डेप्युटी मॅनेजर संगणक आणि इनचार्ज प्रथम श्रेणी संगणक अशा प्रत्येकी एक एकूण 700 पदासाठी बँकेच्यावतीने भरती करण्यात येणार आहे.
भरती प्रक्रियेत काही ठरावीकच पुढे
जिल्हा बँकेच्या होणार्या भरती आणि भरती प्रक्रियेसह नेमण्यात आलेल्या संस्था याबाबत अनेक संचालकांशी संपर्क साधला असता त्यांनी याबाबत कानावर हात ठेवत याबाबत तपशीलवार माहिती नसल्याचे सांगितले. तर बँकेच्या प्रशासनातील अधिकारी देखील या विषयावर गप्प राहणे पसंत करत असल्याने ही भरतीची प्रक्रिया काही ठरावीच संचालक पुढे हाकत असल्याची माहिती पुढे आली.