Thursday, May 2, 2024
Homeनगरनगर जिल्ह्यात 100 टक्के पाऊस

नगर जिल्ह्यात 100 टक्के पाऊस

पुणे |प्रतिनिधी| Pune

जून ते सप्टेंबर या मान्सूनच्या कालावधीत महाराष्ट्रात सरासरीच्या 101 टक्के तर नगर जिल्ह्यात 100. 3 टक्के पावसाचा अंदाज ज्येष्ठ कृषी हवामानतज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत वर्तविला. महाराष्ट्रात एकूण 33 टक्के दुष्काळी भाग आहे. दुष्काळी भागात यंदा चांगला पाऊस पडेल. त्यामुळे दुष्काळी भागासाठी यावेळेसचा पावसाळा चांगला आहे, असेही डॉ. साबळे यांनी यावेळी स्पष्ट केले.

- Advertisement -

डॉ. साबळे म्हणाले, महाराष्ट्रात सरासरीच्या 101 टक्के पाऊस होईल. हा अंदाज कमाल तापमान, सकाळ व दुपारची सापेक्ष आर्द्रता, वा़र्‍याचा ताशी वेग आणि सूर्यप्रकाशाचा कालावधी या निकषावर आधारित आहे. यावर्षी वार्‍याचा वेग कमी आढळल्याने जून महिन्यात पावसात खंड राहण्याची शक्यता आहे. जुलैच्या दुसर्‍या पंधरवड्यापासून ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात पावसाचे प्रमाण चांगले राहणार आहे. कमी दिवसात अधिक पाऊस आणि काही काळ पावसात मोठे खंड असे हवामान राहणार आहे.

जून ते सप्टेंबर या कालावधीत पश्चिम विदर्भ विभागातील अकोला येथे 100 टक्के पाऊस असणार आहे. मध्य विदर्भ विभागातील नागपूर 100 टक्के, यवतमाळ 102 टक्के पावसाचा अंदाज आहे. पूर्व विदभातील शिंदेवाही (चंद्रपूर) येथे 103 टक्के पाऊस होईल. मराठवाडा विभागातील परभणी, जालनाला 100 टक्के, कोकण विभागातील दापोलीला 100 टक्के, उत्तर महाराष्ट्रातील निफाड 100 टक्के, धुळे 102 टक्के, जळगाव 100 टक्के, पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर 102 टक्के, तर कोल्हापूर, कराड, पाडेगाव, राहुरी, पुणे मिळून 100.3 टक्के पाऊस होईल, असेही डॉ. साबळे यांनी यावेळी नमूद केले.

शेतकर्‍यांनी पेरणीची घाई करू नये

जून महिन्यात तापमान, हवेच्या दाबामुळे पाऊस कमी होणार आहे. त्यामुळे शेतकर्‍यांनी पेरण्या करण्याची घाई करू नये. पेरण्या करण्याची घाई केली तर दुबार पेरण्या करण्याची वेळ येऊ शकते. कोकणातही दोन टप्प्यांमध्ये रोपवाटिका लावाव्यात. हवामानानुसार शेतकर्‍यांनी शेतीचे नियोजन करावे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

दुष्काळी भागात चांगला पाऊस

महाराष्ट्रात एकूण 33 टक्के दुष्काळी भाग आहे. दुष्काळी भागात यंदा चांगला पाऊस पडेल. त्यामुळे दुष्काळी भागासाठी यावेळेसचा पावसाळा चांगला आहे. 2012, 2015 आणि 2018 च्या दुष्काळानंतर पिक पद्धती, पिकांच्या उत्पन्नावर परिणाम झाला आहे. त्यामुळे हवामानानुसार शेतीचे नियोजन करावे, असेही डॉ. साबळे यांनी यावेळी स्पष्ट केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या