Thursday, September 19, 2024
HomeनगरAhmednagar Fake Training Camp For Army Recruitment : शंभरहून अधिक युवकांना लष्करात...

Ahmednagar Fake Training Camp For Army Recruitment : शंभरहून अधिक युवकांना लष्करात भरतीचे आमिष; बनावट ट्रेनिंग कॅम्प उभारले

अहमदनगर | प्रतिनिधी

- Advertisement -

महाराष्ट्र, तेलंगणा, कर्नाटक, उत्तर प्रदेश, बिहार, पंजाब, हरीयाणा व नवी दिल्ली येथील शंभरहून अधिक युवकांना लष्करात भरतीचे आमिष दाखवून व देहरादून, नगर जिल्ह्यात बनावट ट्रेनिंग कॅम्प उभारून बनावट भरती करणारे मोठे रॅकेट उघडकीस आले आहे.

येथील भिंगार कॅम्प पोलीस व पुण्याच्या मिलीटरी इंटेलिजन्स दक्षिण कमानने संयुक्त कारवाई करत एकास जेरबंद केले. सत्यजित भरत कांबळे (रा. श्रीगोंदा) असे त्याचे नाव आहे. प्रत्येक युवकाकडून सुमारे सात ते आठ लाख रूपये उकळण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे.

आर्मी कॅम्प, मुठी चौक, जामखेड रस्ता, नगर येथे 6 फेब्रुवारी 2022 ते 28 मे 2022 या काळात सत्यजित भरत कांबळे, बापू छबु आव्हाड (रा. आंबेगाव, पो. पाचोरा, ता. येवला, जि. नाशिक), राहुल सुमंत गुरव (रा. चौसाळा, जि. बीड) यांनी संगणमत करून भगवान काशिनाथ घुगे (रा. पास्ते, ता. सिन्नर, जि. नाशिक) यांच्यासह इतर शेकडो युवकांना आम्ही आर्मीमध्ये मेजर पदावर नोकरीस असल्याचे भासवून नोकरी देण्याचे आमिष दाखविले.

महाराष्ट्र, तेलंगणा, कर्नाटक, उत्तर प्रदेश, बिहार, पंजाब, हरियाणा व नवी दिल्ली येथील युवकांना संपर्क करून त्यांना विविध ठिकाणी बनावट ट्रेनिंग सेंटर येथे बोलवून त्यांना ट्रेनिंग दिले. त्यांच्याकडून वेळोवेळी रोख रक्कम व आरटीजीएस, ऑनलाईन स्वरूपात रक्कम घेऊन फसवणूक केल्याची तक्रार भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याचे पथक व मिलिटरी इंटेलिजन्सच्या पुण्याच्या दक्षिण कमानच्या पथकाने तपास करत सत्यजित भरत कांबळे हा दिल्ली येथे रहात असल्याची माहिती मिळवली. पथक दिल्लीत शोध घेत असल्याचे सुगावा लागताच कांबळे हा महाराष्ट्रात पळून गेल्याचे समोर आले. पथकाने त्याचा शोध घेत बेलापुर (ता. श्रीरामपुर) येथे सापळा रचून त्याला शिताफीने ताब्यात घेतले. त्याने इतर साथीदारांसह गुन्हा केल्याची कबुली दिली. यामध्ये एक महिला दलालही सामिल असल्याचा संशय आहे.

पोलीस अधीक्षक राकेश ओला, अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, शहर विभागाचे उपअधीक्षक अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक जगदीश मुलगीर, उपनिरीक्षक उमेश पतंगे, अंमलदार संदीप घोडके, दीपक शिंदे, रवी टकले, प्रमोद लहारे, समीर शेख, नितीन शिंदे, राहुल गुंड्डू व दक्षिणी कमान इंटेलिजन्स पुणे यांनी संयुक्त कारवाई केली आहे.

प्रशिक्षण केंद्रातील युवकांवर डोळा

संशयित आरोपी हे महाराष्ट्र, तेलंगणा, कर्नाटक, उत्तर प्रदेश, बिहार, पंजाब, हरीयाणा व नवी दिल्ली येथील भरतीपूर्व प्रशिक्षण सेंटरमध्ये संपर्क करून युवकांना देहरादून व नगर येथील आर्मी परीसरात बोलावायचे. युवकांना प्रशिक्षण देऊन व पैसे देण्यार्‍या उमेदवारांना सेना दलातील मुख्या अभियंता अधिकारी आणि सेवानिवृत्त दक्षिणी कमान मुख्यअधिकारी यांच्या नावाने बनावट नियुक्ती पत्र द्यायचे. त्यांनी जंगल परिसरात बनावट ट्रेनिंग कॅम्प उभारले होते, असे तपासात समोर आले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या