Wednesday, August 19, 2026
Homeब्रेकिंग न्यूजMadhav Gadgil : ज्येष्ठ पर्यावरणशास्त्रज्ञ माधव गाडगीळ यांचे निधन; वयाच्या ८३ व्या...

Madhav Gadgil : ज्येष्ठ पर्यावरणशास्त्रज्ञ माधव गाडगीळ यांचे निधन; वयाच्या ८३ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

मुंबई | Mumbai

ज्येष्ठ पर्यावरण शास्त्रज्ञ आणि निसर्गप्रेमी डॉ. माधव गाडगीळ (Madhav Gadgil) यांचे अल्पशा आजाराने वयाच्या ८३ व्या वर्षी निधन झाले. त्यांनी पुण्यातील डॉ. शिरीष प्रयाग रुग्णालयात (Hospital) काल (दि.०७ जानेवारी) रोजी रात्री ११ वाजता अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे पर्यावरण, जैवविविधता आणि परिसंस्था संवर्धनासाठी आयुष्यभर झटणारा अभ्यासू मार्गदर्शक व शास्त्रज्ञ काळाच्या पडद्याआड गेला आहे.

- Advertisement -

डॉ. माधव गाडगीळ हे भारतातील (India) अग्रगण्य पर्यावरणशास्त्रज्ञ होते. जैवविविधता, पर्यावरणीय धोरणे आणि शाश्वत विकास या विषयांवर त्यांनी आयुष्यभर कार्य केले. भारतीय विज्ञान अकादमीसह विविध शैक्षणिक संस्थांशी ते दीर्घकाळ जोडलेले होते. पश्चिम घाटातील जैवविविधता, निसर्गसंपत्तीचे शाश्वत व्यवस्थापन आणि स्थानिक समुदायांच्या सहभागावर आधारित विकासाचा त्यांनी सातत्याने आग्रह धरला. पश्चिम घाट संवर्धनासाठी स्थापन करण्यात आलेल्या गाडगीळ समितीच्या अहवालामुळे देशभर चर्चा झाली होती.

हार्वर्ड विद्यापीठासारख्या नामांकित संस्थांपासून ते भारत सरकारच्या विविध उच्चस्तरीय समित्यांपर्यंत त्यांचा प्रवास प्रेरणादायी होता. मात्र, त्यांनी स्वतःला नेहमीच “लोकांचा शास्त्रज्ञ” म्हणून ओळखले. लोकसहभागाशिवाय पर्यावरण संरक्षण शक्य नाही, हा त्यांचा ठाम विश्वास होता. पर्यावरणीय निर्णयांमध्ये स्थानिक समुदायांचा सहभाग असावा, यासाठी त्यांनी सातत्याने आग्रह धरला. संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रमाने (UNEP) 2024 मध्ये त्यांना ‘चॅम्पियन्स ऑफ द अर्थ’ या सर्वोच्च पर्यावरण सन्मानाने गौरवले होते. वैज्ञानिक शिस्त, निसर्गसंवर्धन आणि सर्वसामान्य माणसाचा विकास यांचा समतोल साधण्याचा आदर्श त्यांनी आपल्या कार्यातून घालून दिला.

दरम्यान, डॉ. माधव गाडगीळ यांच्या निधनाने भारतीय पर्यावरण चळवळीतील एका सुवर्णकाळाचा अंत झाला असून, त्यांचे विचार आणि कार्य पुढील पिढ्यांना मार्गदर्शक ठरणार आहेत. त्यांचे पार्थिव ‘ए-१८, स्प्रिंग फ्लॉवर अपार्टमेंट, पंचवटी, पाषाण’ येथील निवासस्थानी अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आले आहे.

ताज्या बातम्या

Cabinet Decision: मोदी कॅबिनेटचा मोठा निर्णय! 13041 कोटींचे रेल्वे-रस्ते प्रोजेक्ट मंजूर,...

0
दिल्ली | Delhi देशातील रस्ते आणि रेल्वे पायाभूत सुविधांना नवी गती देण्याच्या दिशेने केंद्र सरकारने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या...