Sunday, May 19, 2024
Homeनगरअनधिकृत फलकांसह टपर्‍यांवर हातोडा

अनधिकृत फलकांसह टपर्‍यांवर हातोडा

अहमदनगर (प्रतिनिधी)

नगर शहर व उपनगर परिसरात महापालिकेने गुरूवारी व शुक्रवारी अनधिकृत फलकांवर कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. दोन दिवसात महापालिकेने छोटे मोठे 72 फलक कारवाई करून जप्त केले आहेत. तसेच, दुकानांचे अडथळा ठरणारे 17 फलकही कारवाई करून जप्त केले आहेत. विविध पक्ष व इतरांनी लावलेले 15 झेंडेही काढून घेण्यात आले आहेत. कारवाईत चित्रा टॉकीज परिसर व तारकपूर येथील दोन मटक्याच्या टपर्‍या महापालिकेने कारवाई करून हटवल्या आहेत.

- Advertisement -

गेल्या अनेक महिन्यांपासून शहर व उपनगर परिसरात मोठ्या प्रमाणात अनधिकृत फ्लेक्स बोर्ड लावण्यात आले होते. आयुक्त पंकज जावळे यांच्या आदेशानुसार अतिक्रमण निर्मूलन विभाग व प्रभाग समिती कार्यालयामार्फत गुरूवारपासून मोहीम राबवण्यात आली. मध्य शहर, सावेडी उपनगर, कोठला परिसर, डीएसपी चौक, पत्रकार चौक, प्रोफेसर चौक, दिल्लीगेट अशा विविध ठिकाणी पथकांनी अनधिकृत फ्लेक्स बोर्ड, दुकानांचे फलक, झेंडे कारवाई करून हटवले. अतिक्रमण निर्मूलन विभाग प्रमुख अनिकेत बल्लाळ, क्षेत्रीय अधिकारी रिझवान शेख, प्रभाग अधिकारी राकेश कोतकर, मेहेर लहारे, संजय उमाप, क्षेत्रीय अधिकारी अर्जुन जाधव, देवीदास बिज्जा, नितीन इंगळे यांनी पथकासह कारवाई करून साहित्य जप्त केले. मोहीम सुरूच राहणार असल्याचे आयुक्त पंकज जावळे यांनी सांगितले.

दरम्यान, सामाजिक कार्यकर्ते व मुख्याध्यापक हेरंब कुलकर्णी यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर सीताराम सारडा विद्यालय येथील हनुमान पान स्टॉल या दुकानाचा परवाना रद्द करण्याचे पत्र महापालिकेला दिले आहे. अक्षय सब्बन याच्या मालकीची असलेली ही टपरी महापालिकेने कारवाई करून हटवली होती. मात्र, हीच टपरी जवळच असलेल्या एका इमारतीच्या गाळ्यात ठेवून व्यवसाय सुरू आहे व तोही शाळेपासून शंभर मीटर अंतराच्या आत असल्याचे हेरंब कुलकर्णी यांनी निदर्शनास आणले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या