Monday, September 16, 2024
HomeनगरGaneshotsav 2024 : बाप्पाच्या स्वागतासाठी नगरकर सज्ज! पावसाच्या शिडकाव्यामुळे वातावरणात चैतन्य

Ganeshotsav 2024 : बाप्पाच्या स्वागतासाठी नगरकर सज्ज! पावसाच्या शिडकाव्यामुळे वातावरणात चैतन्य

अहमदनगर | प्रतिनिधी

- Advertisement -

श्री गणेशाच्या स्वागतासाठी नगरकर सज्ज झाले आहेत. दहा दिवस चालणार्‍या या उत्सवासाठी सार्वजनिक तरुण मंडळासह घरोघरी तयारी पूर्ण झाली असून गणरायाच्या आगमनाच्या पूर्वसंध्येला शुक्रवारी जिल्ह्यात काही भागात पावसाने हजेरी लावली. यामुळे सर्वत्र चैतन्यांचे वातावरण आहे. शहरी भागात होणार्‍या गणेशोत्सवादरम्यान पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे.

नगरमध्ये आज सकाळी 9 वाजता ग्रामदैवत माळीवाडा विशाल गणेश मंदिरात जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा केली जाईल. याठिकाणी देवस्थानने दहाही दिवस विविध कार्यक्रम आयोजित केले आहेत. दुसरीकडे गणेशोत्सवाच्या खरेदीसाठी दोन दिवसांपासून नगरसह जिल्ह्यातील बाजारपेठा फुलल्या आहेत. यंदा गणेश मुर्तीच्या किंमतीत 25 टक्के वाढ झाली आहे.

हे ही वाचा : जेव्हा आमदार सत्यजीत तांबे शिक्षक होतात…

शहरातील माळीवाडा, गांधी मैदान, दिल्लीगेट, प्रोफेसर कॉलनी चौक, पाईपलाईन रस्ता, भिंगार येथेही मूर्तीचे स्टॉल लागले आहेत. याच परिसरात पूजेच्या साहित्य विक्रेत्यांनी पथारी मांडल्या आहेत. त्यामुळे या भागात गर्दी होती. उत्सवासाठी लागणार्‍या सजावटीच्या साहित्यांनाही मोठी मागणी आहे. दरवर्षीप्रमाणे विक्रांत मंडळ, जंगूभाई तालीम, जय महावीर, नेता सुभाष चौक आदींच्या मिरवणुकांचे आकर्षण राहील.

शहरातील काही प्रमुख मंडळांनी उत्सवाच्या पहिल्याच दिवशी देखावे नगरकरांना पाहण्यासाठी खुले करण्याची तयारी केली आहे. मंडळांनी अपापले चौक रोषणाईने झगमगाटून टाकले आहेत. आज शनिवार गौरींचे आगमन होणार आहे. त्यामुळे पूजेच्या साहित्याची दुकाने सजली आहेत. कापूर, कंठी, अगरबत्ती, धूप, लाकडी पाठ, समई, निरंजन, पितळेचे ताठ, हळद, कुंकू, अबीर, गुलाल, रांगोळी या साहित्याची खरेदी सुरू आहे. अगरबत्तीचे 50 रुपयांपासून एक हजार रुपयांपर्यंत भाव आहेत. तर, धूप 350 रुपये किलोप्रमाणे विक्रीसाठी आहे.

हे ही वाचा : धर्म आणि जातीच्या नावावर विष कालवणे सहन करणार नाही

10 दिवसांत कोट्यावधींची उलाढाल होणार

बाजारपेठेत आकर्षक मखर, विद्युत रोषणाई साहित्य खरेदीसाठी भक्तांची काही गर्दी दिसत आहे. गणेशमूर्तींसह सजावटीच्या विविध साहित्याचे आणि पूजा साहित्याचे स्टॉलही रस्तोरस्ती आणि चौकाचौकात सजले आहेत. एकंदरीतच बाप्पाच्या आगमनाआधीच बाजारपेठेत नवचैतन्य निर्माण झाले असून या मुहूर्तावर कोट्यवधींची उलाढाल होण्याची शक्यता व्यापारी वर्गाने वर्तविली आहे. त्यामुळे बाप्पांच्या मुक्कामाचे दहाही दिवस चैतन्याने, आनंदाने भारलेले असतील यात शंका नाही.

दरम्यान राहुरी शहरासह तालुक्यात गणरायाच्या उत्सवाची जय्यत तयारी झाली असून आज गणरायाच्या आगमनासाठी बालगोपालांसह अनेक तरूण मंडळे सज्ज झाली आहे.

हे ही वाचा : भंडारदरातून विसर्ग वाढला; मुळा नदीतही पाणी वाढले

राहुरी शहरातील आजाद तरूण मंडळ, माजी नगराध्यक्ष अनिल कासार व सौरभ उंडे यांचे श्रीरामदत्त गणेश मंडळ, पत्रकार सुनील भुजाडी यांचे बुवासिंद बाबा मित्र मंडळ, मंदार धुमाळ यांचे दत्तगणेश मित्र मंडळ, आ. प्राजक्त तनपुरे यांचे मळगंगा तरूण मंडळ, शिवाजीराव सोनवणे यांचे श्रीराम तरूण मंडळ, रावसाहेब चाचा तनपुरे यांचे व्यंकटेश तरूण मंडळ, राजेंद्र उंडे यांचे ज्ञानेश्‍वर मित्र मंडळ, गजानन सातभाई यांचे गजानन तरूण मंडळ, सागर तनपुरे यांचे केशर मित्र मंडळ, आर.आर. तनपुरे यांचे सातपीर बाबा मित्र मंडळ, वाल्मिक तरूण मंडळ, आदींसह लहान मोठ्या मंडळांनी सार्वजनिक गणेशाची स्थापना करण्यासाठी जय्यत तयारी केली असून मोठ-मोठी मंडपाची तयारी अंतिम टप्प्यात दिसत होती.

सर्वच मंडळांनी मोठ्या प्रमाणावर आकर्षक विद्यूत रोषणाई केलेली दिसत असून मंदार धुमाळ यांच्या दत्तगणेश मंडळाने गणेशाच्या आगमनानिमित्त झांज व ढोल पथकाची आज भव्य मिरवणूक आयोजित केली आहे. तसेच अनेक मंडळांनी देखाव्यासाठी वेगळे मंडपाची उभारणी केली आहे. देखाव्याचे काम ही काही ठिकाणी अंतिम टप्प्यात दिसून येत आहे. मुंबई, पुणे, नगर येथून गणेश भक्तांसाठी भव्य देखाव्यांचे नियोजन केलेले दिसून येत आहे.

हे ही वाचा : संगमनेर पोलीस उपविभागात ६२ जणांना प्रवेश बंदी!

गणरायाच्या आकर्षक मुर्तींचे राहुरी शहरात नविपेठ कॉलेज रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर दुकाने थाटली असून गणेशोत्साच्या सजावटीसाठी लागणार्‍या साहित्याने अनेक दुकाने सजलेली दिसत होती. आकर्षक मुर्ती व सजावटीचे व पुजेचे साहित्य खरेदी करण्यासाठी बाजारपेठे गणेश भक्तांची मोठी गर्दी झुंबड उडाली होती.

- Advertisment -

ताज्या बातम्या