मुंबई । Mumbai
एअर इंडियाच्या बोईंग 787 ड्रीमलायनर AI-171 या विमानाचा भीषण अपघात गुरुवारी अहमदाबादमध्ये झाला. लंडनकडे जाणाऱ्या या विमानात एकूण २४२ प्रवासी होते. उड्डाण घेतल्यानंतर काही सेकंदातच हे विमान कोसळले. या घटनेने संपूर्ण देशाला हादरवून सोडलं असून, याप्रकरणी विविध यंत्रणांकडून चौकशी सुरू झाली आहे.
या पार्श्वभूमीवर शिवसेना (ठाकरे गट) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधताना गंभीर प्रश्न उपस्थित केले. त्यांनी अपघातासंदर्भात सायबर हल्ला किंवा हायजॅकची शक्यता व्यक्त केली असून, सुरक्षा यंत्रणांच्या कार्यक्षमतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
“ड्रीमलायनर विमानाच्या अपघाताने अनेक शंका निर्माण केल्या आहेत. एकाचवेळी दोन्ही इंजिन कशी बंद पडली? ३० सेकंदात एवढं मोठं विमान कोसळणं हे सामान्य प्रकरण नाही. सायबर हल्ला झाला का? विमान हायजॅक केलं गेलं का? हे गंभीर प्रश्न आहेत,” असं राऊत यांनी सांगितलं.
संजय राऊत यांनी यावेळी UPA सरकारच्या काळात खरेदी करण्यात आलेल्या ड्रीमलायनरच्या व्यवहाराकडे लक्ष वेधले. “या व्यवहारावर भाजपानेही पूर्वी शंका उपस्थित केल्या होत्या. प्रफुल्ल पटेल नागरी उड्डाण मंत्री असताना त्यांनी अनेकदा खुलासे केले होते. आता जेव्हा अपघात झाला आहे, तेव्हा त्याचा सखोल तपास गरजेचा आहे,” असे त्यांनी नमूद केले.
“आपल्या देशावर वारंवार सायबर हल्ले होत आहेत. यंत्रणा ठप्प करण्याचा प्रयत्न केला जातो. अशा हल्ल्यांतूनच हे घडलं असेल का, हे तपासणं आवश्यक आहे. सध्या विविध एजन्सी एकत्रितपणे चौकशी करत आहेत, त्यामुळे सखोल माहिती मिळेपर्यंत चर्चा टाळणं योग्य ठरेल,” असं मत त्यांनी व्यक्त केलं.
राऊत यांनी अहमदाबाद विमानतळावरील मेंटेनन्स आणि मनुष्यबळाच्या कमतरतेवरही प्रश्न उपस्थित केले. “ज्या एटीसीमध्ये काम होतं, तिथे क्षमतेपेक्षा ५६ टक्के कमी कर्मचारी आहेत. एवढ्या महत्त्वाच्या सुरक्षेच्या जबाबदाऱ्या पार पाडताना ही कमतरता का आहे? विमानाच्या उड्डाणाची परवानगी देणाऱ्या यंत्रणांमध्ये जर इतकी झोपडपट्टी असेल, तर हे गंभीर आहे,” असं ते म्हणाले.
“आज प्रवाशांच्या मनात संशय आहे. जर अशा शंका कायम राहिल्या, तर भविष्यात विमान प्रवास करणाऱ्यांची संख्या कमी होण्याची शक्यता आहे. म्हणूनच या अपघाताचं मूळ कारण शोधणं अत्यंत आवश्यक आहे,” असं राऊत यांनी स्पष्ट केलं.
यावेळी त्यांनी थेट विचारलं, “अहमदाबाद एअरपोर्ट कोणाच्या ताब्यात आहे? तिथे मेंटेनन्सची जबाबदारी कोणावर आहे? या सगळ्या गोष्टी तपासणं गरजेचं आहे. माझ्याही मनात काही शंका आहेत, पण त्या उघडपणे मांडून गोंधळ वाढवण्यात अर्थ नाही.”




