Wednesday, February 4, 2026
Homeब्रेकिंग न्यूजAironomics 2025 : नाशिकची पर्यावरण समृद्धी जपणे सर्वांची एकत्रित जबाबदारी - पर्यावरण...

Aironomics 2025 : नाशिकची पर्यावरण समृद्धी जपणे सर्वांची एकत्रित जबाबदारी – पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे

क्रेडाई नाशिक मेट्रोच्या ‘एअरोनॉमिक्स 2025’ मोहिमेचा शुभारंभ

नाशिक | प्रतिनिधी Nashik

नैसर्गिक सौंदर्याने समृद्ध असलेल्या नाशिक शहराच्या पर्यावरणाचा ठेवा जपणे आपल्या सर्वांची एकत्रित जबाबदारी असून, सर्व घटकांनी शाश्वत प्रगतीकडे लक्ष द्यावे असे आवाहन महाराष्ट्र राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांनी केले.

- Advertisement -

शहराच्या प्रदूषणमुक्त, पर्यावरणपूरक व दीर्घकालीन आर्थिक विकासासाठी कटिबद्ध असलेल्या क्रेडाई नाशिक मेट्रोतर्फे ‘एअरोनॉमिक्स 2025’ या नाविन्यपूर्ण मोहिमेचा प्रारंभ करण्यात आला. त्यावेळी त्या बोलत होत्या. व्यासपीठावर आ.देवयानी फरांदे,आ.सीमा हिरे,आ.राहुल आहेर, नाशिक महापालिका आयुक्त मनिषा खत्री , महाराष्ट्र प्रदूषण नियामक मंडळाचे सदस्य सचिव अविनाश ढाकणे , क्रेडाई नाशिक मेट्रोचे अध्यक्ष गौरव ठक्कर, मानद सचिव तुषार संकलेचा, उपाध्यक्ष व मोहिमेचे समन्वयक उदय घुगे व माजी अध्यक्ष कृणाल पाटील हे उपस्थित होते.

YouTube video player

मंत्री पंकजा मुंडे पुढे म्हणाल्या की, अनेक शहरात बहुमजली इमारती झाल्या आहेत परंतु त्या इमारतींमधील रहिवाशांना भविष्यात पाण्याचा पुरवठा कसा होईल याचे नियोजन आज करणे गरजेचे आहे. शहरात येणारे लोंढे थांबवण्यासाठी ग्रामीण भागातील संधी वाढवण्याच्या आवश्यकतेवर त्यांनी भर दिला. राज्यातील 52% सांडपाणी आजही थेट नदीपात्रात सोडले जात असल्याबाबत त्यांनी चिंता व्यक्त केली. यासाठी शासनातर्फे युद्ध पातळीवर सांडपाणी प्रक्रिया केंद्र सुरू करण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.

स्वच्छ हवा, शून्य कचरा, सशक्त नाशिक हा मोहिमेचा उद्देश असल्याचे असल्याचे देखील उदय घुगे यांनी नमूद केले. गौरव ठक्कर म्हणाले की, एअरोनॉमिक्स ही मोहीम म्हणजे स्वतःमध्ये बदल करून आपल्या येणाऱ्या पिढीला स्वच्छ निसर्ग देणे. शासन ,प्रशासन आणि नागरिक यांची एकत्रित जबाबदारी आहे. स्वच्छ हवा आणि कार्यक्षम कचरा व्यवस्थापनावर आधारित ही मोहीम नाशिकला वेगळी ओळख देईल. हवेचा दर्जा व कचरा व्यवस्थापन यावर आधारित श्वेतपत्रिकेचे प्रकाशन करण्यात आले. पंकजा मुंडे यांनी आगामी कुंभमेळ्याचे पर्यावरण ब्रँड अ‍ॅम्बेसेडर व्हावे असे आवाहन ठक्कर यांनी केले. सहभागी संस्थांकडून पर्यावरण साक्षरतेची शपथ घेण्यात आली. आ. सीमा हिरे , आ. देवयानी फरांदे व आ. राहुल आहेर यांनीही मनोगत व्यक्त केले.

चर्चासत्रात महापालिका आयुक्त मनिषा खत्री , महाराष्ट्र प्रदूषण नियामक मंडळाचे सदस्य सचिव अविनाश ढाकणे यांनी घनकचरा व्यवस्थापन आणि प्रदूषण नियंत्रण याबाबत भविष्यातील योजनांची माहिती दिली. तुषार संकलेचा यांनी आभार मानले. याप्रसंगी माजी अध्यक्ष जितुभाई ठक्कर ,सुरेश पाटील,अनंत राजेगावकर, किरण चव्हाण ,सुनील भायभंग,जयेश ठक्कर ,सुनील कोतवाल ,उमेश वानखेडे, रवी महाजन, क्रेडाई मॅनेजिंग कमिटी सदस्य , विविध संस्थांचे अध्यक्ष ,प्रतिनिधी उपस्थित होते.

‘एअरोनॉमिक्स’ची उद्दिष्टे
हवेचा दर्जा सुधारणा
स्वच्छ इंधनावर आधारित वाहतूक
औद्योगिक प्रदूषण नियंत्रण
वृक्षारोपण आणि हरित क्षेत्र वाढवणे
कचरा व्यवस्थापन: रिसायकलिंग व कम्पोस्टिंग
जनजागृती आणि लोकसहभाग

अनेक संस्थांचा सक्रिय सहभाग

नाशिक सिटीजन फोरम, नाशिक इंजिनिअरिंग क्लस्टर, नाईस, निमा, आयमा, इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनियर्स, नरेडको, असोसिएशन ऑफ नाशिक स्कूल्स, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक, आर्किटेक आणि इंजीनियरिंग असोसिएशन, बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इंटिरियर डिझायनर्स, इंडियन मेडिकल असोसिएशन, नाशिक बार असोसिएशन, ट्रॅव्हल्स एजंट असोसिएशन ऑफ नाशिक, नाशिक आयटी असोसिएशन, लघुउद्योग भारती, इंडियन प्लंबिंग असोसिएशन, फायर सेफ्टी असोसिएशन ऑफ इंडिया, इत्यादी.

एमपीसीबीचे नियम आणखी कडक करणार
राज्य शासनाने प्रदूषणबाबत लॉंग टर्म प्लॅनिंग केला आहे. एअरनॉमिक्स आज इथे संकल्पना मांडली. एमपीसीबी चे नियम माझ्या खात्याकडून कडक करण्याचा प्रयत्न असल्याची माहिती पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना दिली.त्या म्हणाल्या की , मुंबईत बिल्डिंग बांधतात तिथं नियम पाळायला सांगितले. हायवे होतात तिथंही नियम पाळले जातात. नदीत पाणी सोडतात हे गंभीर आहे. शासन योजना आणत आहेत, परंतु लोकसहभाग असल्याशिवाय त्या यशस्वी होऊ शकत नाही. सिंहस्थ कुंभमेळा येतोय ,भरपूर विषय पर्यावरणाशी संबंधित आहे. मुख्यमंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यावरणासह सर्व प्रश्न मार्गी लावणार असल्याचा विश्वास मंत्री पंकजा मुंडे यांनी व्यक्त केला.

ताज्या बातम्या

Rahata : लोणीचे हवालदार साळवी निलंबित; काय आहे कारण?

0
राहाता |प्रतिनिधी| Rahata राहाता तालुक्यातील ममदापूर येथे सुरू असलेल्या अवैध कत्तलखान्यांवर कारवाई करण्यास टाळाटाळ करणे आणि आरोपींशी आर्थिक हितसंबंध जोपासल्याचा ठपका ठेवत, लोणी पोलीस...