पुणे | Pune
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीमधील माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणूक लढवली आणि जिंकून सुद्धा दाखवली. अखेरीस आज माळेगाव कारखान्याच्या अध्यक्षपदी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपाध्यक्षपदी संगीता कोकरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
अजित पवार यांची ब वर्ग संस्था मतदार संघातून १०१ पैकी ९१ मतांनी निवड झाली आहे. कोकरे या नीरावागज गटातून ८ हजार चारशे चाळीस मतांनी निवडून आल्या आहेत. संगीता कोकरे यांनी माळेगावचे संचालिक म्हणून २५ वर्ष जबाबदारी पेलली आहे. माळेगाव पंचवार्षिक निवडणूक २५ जूनला झाली होती. अजित पवार यांच्या नेतृत्त्वाखाली निळकंठेश्वर पॅनेलने २१ पैकी २० जागा जिंकल्या आहेत. अशाप्रकारे त्यांनी माळेगावची सत्ता पुन्हा खेचून आणण्यात यश मिळाले आहे.
विरोधकांचा निवडीवर आक्षेप
या निवडीवर विरोधी गटातील संचालक चंद्रराव तावरे यांनी आक्षेप घेतला. तावरे यांनी संभाजीनगर खंडपीठाच्या निर्णयाची प्रत देत अजित पवार हे ब वर्गातून निवडून आल्यामुळे त्यांची चेअरमन पदी निवड बेकायदेशीर असल्याचा आरोप केला. तसेच अजित पवारांची नियुक्ती केल्याने चंद्रराव तावरे यांनी नियमाप्रमाणे कामकाज करावे असे म्हणत बैठकीतून काढता पाय घेतला. तर रंजन तावरे यांनी माळेगाव कारखान्यासाठी अजित पवार यांनी एकदाही ऊस गाळपासाठी घातला नाही असा आरोप केला.
तसेच अजित पवारांच्या निवडीवरती हरकत घेतली असता निवडणूक निर्णय अधिकारी यांनी वेळ संपली, असे उत्तर दिल्याचाही विरोधकांनी आरोप केला आहे. विरोधकांचे एकमेव निवडून आलेले संचालक चंद्रराव तावरे यांनीच अजित पवारांच्या निवडीवर आक्षेप घेतला.
माळेगाव सहकारी कारखान्यासाठी २२ जून रोजी मतदान पार पडले. त्यानंतर झालेल्या मतमोजणीत अजित पवार यांच्या निळकंठेश्वर पॅनेलने विरोधकांचा धुव्वा उडवत २१ पैकी २० जागांवर यश मिळवले. तर सहकार बचाव पॅनेलचे चंद्रराव तावरे एक एकमेव उमेदवार निवडून आले. शरद पवार गटाच्या बळीराजा पॅनेलचा मात्र एकही उमेदवार निवडून आला नाही.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा




