Monday, August 24, 2026
HomeनगरRahata : कुत्र्याने चावा घेतल्याने गाईसह बालकाचा मृत्यू

Rahata : कुत्र्याने चावा घेतल्याने गाईसह बालकाचा मृत्यू

गणेश कारखाना परिसरातील घटना

एकरूखे |वार्ताहर| Ekrukhe

राहाता तालुक्यातील गणेश सहकारी साखर कारखाना परिसरात एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतल्यामुळे एका नऊ वर्षांच्या निष्पाप बालकाला आपला जीव गमवावा लागला आहे. विशेष म्हणजे याच कुत्र्याने चावा घेतल्यामुळे एका गायीचाही मृत्यू झाला होता. त्यानंतर चारच दिवसांत या बालकाचाही मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार चाळीसगाव येथील काही ऊस तोड मजूर गणेश कारखान्याच्या गळीत हंगामासाठी गणेशनगर येथे आले आहेत. सुमारे 15 दिवसांपूर्वी कारखाना कार्यस्थळावर एका भटक्या कुत्र्याने प्रेमराज राठोड यांच्या रोहित (वय 9 वर्षे) या मुलाला आणि एका गायीला चावा घेतला होता. काही दिवसांपूर्वीच कुत्र्याने चावा घेतलेल्या त्या गाईचा मृत्यू झाला. त्यानंतर अवघ्या चार दिवसांत रोहितची प्रकृती खालावली. त्याला तातडीने राहाता येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.

राहाता येथील डॉक्टरांनी रोहितची तपासणी केली असता त्याला ‘रेबीज’ झाल्याचे स्पष्ट झाले. प्रकृती गंभीर असल्याने त्याला पुढील उपचारासाठी तातडीने नाशिक येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र रेबीजचा संसर्ग मेंदूपर्यंत पोहोचल्याने उपचारादरम्यान रोहितचा मृत्यू झाला. 15 डिसेंबर रोजी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास त्याने अखेरचा श्वास घेतला. एकाच कुत्र्याने चावा घेतल्यामुळे आधी गाय आणि नंतर लहान मुलाचा मृत्यू झाल्याने गणेश कारखाना परिसरातील ऊस तोड मजूर व वसाहतीमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी आता जोर धरत आहे. पोट भरण्यासाठी आलेल्या ऊस तोड कामगाराचा मुलगा अशा प्रकारे दगावल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

ताज्या बातम्या

Rahuri : मुळा धरणही ओव्हरफ्लोच्या मार्गावर, साठा 97 टक्क्यांवर

0
राहुरी |प्रतिनिधी| Rahuri जिल्ह्यात सर्वाधिक साठवण क्षमता असलेले मुळा धरणही आता ओव्हरफ्लोच्या मार्गावर आहे. 26000 दलघफू क्षमतेच्या या धरणात काल सायंकाळी 25261 दलघफू (97 टक्के)...