Thursday, May 21, 2026
Homeराजकीयरोहित पवारांच्या आरोपानंतर प्रफुल्ल पटेल यांचा मोठा खुलासा; म्हणाले…

रोहित पवारांच्या आरोपानंतर प्रफुल्ल पटेल यांचा मोठा खुलासा; म्हणाले…

मुंबई । Mumbai

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताने संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झाला असतानाच, आता या प्रकरणावरून राजकीय वादळ उठले आहे. आमदार रोहित पवार यांनी या अपघातात घातपाताचा संशय व्यक्त करत अनेक खळबळजनक आरोप केले आहेत. या आरोपांना आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी प्रत्युत्तर दिले असून, त्यांनी अजितदादांशी झालेल्या शेवटच्या संवादाचा उलगडा केला आहे.

- Advertisement -

रोहित पवार यांनी दावा केला होता की, २७ जानेवारी रोजी पूर्व विदर्भातील एका बड्या नेत्याचा अजितदादांना फोन आला होता. एका महत्त्वाच्या फाईलवर स्वाक्षरी हवी असल्यामुळे दादांना निघायला उशीर झाला आणि त्यामुळे त्यांनी दुसऱ्या दिवशी विमानाने जाण्याचा निर्णय घेतला. यावर प्रफुल्ल पटेल यांनी आपली बाजू स्पष्ट केली. “मी त्यावेळी दिल्लीत होतो आणि शेतकर्‍यांच्या धानाच्या चुकारासंदर्भात मी दादांना फोन केला होता. दादांनी त्यावर तत्परतेने ‘चुकाऱ्यांची व्यवस्था करतो’ असे उत्तर दिले होते,” असे पटेल यांनी सांगितले.

रोहित पवार यांनी आपल्या पत्रकार परिषदेत पायलटवरही गंभीर संशय व्यक्त केला होता. पायलटने विमान मुद्दाम खाली आपटले आणि स्फोट घडवला, असा हादरवणारा दावा त्यांनी केला. यावर प्रफुल्ल पटेल यांनी अत्यंत सावध प्रतिक्रिया दिली. “मी अनेक वर्षांपासून राजकारणात सक्रिय असून एक जबाबदार व्यक्ती आहे. त्यामुळे जोपर्यंत माझ्याकडे ठोस पुरावे येत नाहीत, तोपर्यंत मी या विषयावर कोणतेही भाष्य करणार नाही,” असे म्हणत त्यांनी संयमी भूमिका मांडली.

विमान अपघाताबाबत सर्वत्र शंका-कुशंका व्यक्त केल्या जात असल्यामुळे, राष्ट्रवादी काँग्रेसने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन या प्रकरणाची सीबीआय (CBI) चौकशी करण्याची मागणी केली आहे. “एवढी मोठी दुर्घटना अचानक कशी घडू शकते? एएआयबी आणि राज्य सरकार तपास करत असले तरी, या प्रकरणातील गूढ उकलण्यासाठी सीबीआय चौकशी होणे आवश्यक आहे,” असे पटेल म्हणाले. दरम्यान, ब्लॅक बॉक्स डॅमेज झाल्याची प्राथमिक माहिती असून त्याबाबत एएआयबी तपास करत असल्याचेही त्यांनी नमूद केले.

अजित पवारांच्या पश्चात राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणावर चर्चा रंगली होती. मात्र, प्रफुल्ल पटेल यांनी या चर्चा फेटाळून लावल्या. “अजितदादांच्या जाण्याने बसलेल्या धक्क्यातून आम्हाला सावरायचे आहे. सध्या विलीनीकरणावर कोणतीही चर्चा नाही. येणाऱ्या २६ तारखेला विधीमंडळ नेते आणि राष्ट्रवादीच्या अध्यक्ष म्हणून सुनेत्रा वहिनीच जबाबदारी सांभाळतील,” असे त्यांनी स्पष्ट केले.

ताज्या बातम्या

Onion : कांदा दर घसरणीची केंद्राकडून गंभीर दखल; उच्चस्तरीय केंद्रीय पथक...

0
नाशिक | प्रतिनिधी Nashik विक्रमी उत्पादनानंतर कांद्याचे दर अक्षरशः कोसळल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले असताना अखेर केंद्र सरकारने या परिस्थितीची गंभीर दखल घेतली आहे. ग्राहक...