Monday, July 27, 2026
Homeक्राईमCrime News : एक कोटींच्या लुटीच्या कटात दोन पोलिसांसह तोतया पत्रकाराचा सहभाग;...

Crime News : एक कोटींच्या लुटीच्या कटात दोन पोलिसांसह तोतया पत्रकाराचा सहभाग; १० जणांवर गुन्हा दाखल

पुणे | प्रतिनिधी | Pune

पुण्यातील (Pune) सिंहगड रस्ता परिसरातील नवले पुलावर भरदिवसा एका मोठ्या व्यावसायिकाला लुटण्याचा चित्रपटालाही लाजवेल असा थरार घडला असून, याप्रकरणी पुणे ग्रामीण पोलीस दलातील (Pune Rural Force) दोन पोलीस कर्मचारी आणि  तोतया पत्रकारासह १० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  या प्रकरणात पोलिसांनी मुख्य सूत्रधार मानल्या जाणारा तोतया पत्रकार आशिष तिवारी याला अटक (Arrested) केली आहे. तर दोन पोलिसांसह इतर सहा आरोपी अद्याप फरार आहेत. तळेगाव दाभाडे येथील व्यावसायिक हर्षवर्धन पवार यांच्याकडून १ कोटी रुपयांची रोकड लुटण्याचा हा कट चक्क कायद्याच्या रक्षकांनीच रचल्याचे समोर आल्याने संपूर्ण पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे.  

- Advertisement -

याबाबत सविस्तर माहिती अशी की, १८ जुलै २०२६ रोजी व्यावसायिक हर्षवर्धन पवार हे त्यांचे सहकारी किरण आपटे यांच्यासह १ कोटी रुपयांची रोकड बँकेत भरण्यासाठी कारने निघाले होते. ही रोकड घेऊन ते नऱ्हे येथील एचडीएफसी बँकेच्या शाखेकडे (Bank Account) जात असताना, सिंहगड रस्त्यावरील हॉटेल ब्रह्मा येथून त्यांचा पाठलाग सुरू झाला. कार नवले पुलाजवळ पोहोचली असता, दुचाकीवरून आलेल्या आरोपींनी कारसमोर आडवी गाडी लावून ती थांबवली. “आम्ही पोलीस आहोत, तुमच्याकडे बेनामी रोकड असल्याची आम्हाला माहिती मिळाली आहे,” अशी बतावणी करून आरोपींनी पवार यांना धमकावण्यास सुरुवात केली. पवार यांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता, दरोडेखोरांनी त्यांच्या डोळ्यात मिरचीची पूड टाकली आणि १ कोटी रुपये असलेली बॅग हिसकावण्याचा प्रयत्न केला. पवार यांनी दाखवलेल्या प्रचंड धाडसामुळे दरोडेखोरांना पूर्ण रक्कम लंपास करता आली नाही; पवार यांनी एक बॅग स्वतःकडे घट्ट पकडून ठेवली होती.

या प्रकरणातील (Case) सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, या लुटीचा पुढचा अंक थेट पोलीस चौकीतच पार पडला. आरोपींनी हर्षवर्धन पवार आणि त्यांची कार खेड शिवापूर पोलीस चौकीत नेली. त्यादिवशी राजगड पोलीस ठाण्यातील महिला पोलीस हवालदार प्रमिला शरद निकम या सुट्टीवर होत्या, तरीही त्या पोलीस वर्दीमध्ये चौकीत उपस्थित होत्या. प्रमिला निकम आणि पोलीस नाईक अजिज जब्बार इसुब मेस्त्री यांनी तोतया पत्रकार आशिष तिवारी याच्या मदतीने व्यापाऱ्याच्या बॅगेतील २० लाख रुपये परस्पर लांबवण्याचा आणि उर्वरित साडेसहा लाख रुपये मुद्देमाल म्हणून दाखवण्याचा मोठा डाव आखला होता.

मात्र, या सर्व गैरप्रकाराची कुणकुण राजगड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष जाधव यांना लागली. जाधव यांनी तातडीने खेड शिवापूर चौकीत धाव घेत हस्तक्षेप केल्यामुळे या भ्रष्ट पोलीस कर्मचाऱ्यांचा आणि पत्रकाराचा बिंग फुटले आणि व्यापाऱ्याला त्याची रक्कम परत मिळण्यास मदत झाली. नऱ्हे पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केल्यानंतर सीसीटीव्ही फुटेजमधून अनेक धक्कादायक पुरावे समोर आले आहेत. मुख्य संशयित आशिष तिवारी हा त्याच्या दुचाकीवरून व्यापाऱ्याच्या कारचा पाठलाग करताना आणि लुटलेली रक्कम स्वतःच्या दुचाकीत ठेवताना स्पष्टपणे दिसून आला आहे. पोलिसांनी आशिष तिवारीला अटक केली असून पोलिसांनी या गुन्ह्यात सहभागी असलेले विक्रम चाकणकर, अमेय अरविंद कार्ले आणि गणेश रमेश कदम या तिघांना यापूर्वीच बेड्या ठोकल्या आहेत.

सध्या या गुन्ह्यातील दोन मुख्य आरोपी पोलीस कर्मचारी प्रमिला निकम आणि अजिज मेस्त्री हे फरार असून, त्यांच्यासोबतच अभिजीत ऊर्फ बटऱ्या बाळासाहेब गाडे, दाऊद सय्यद नदाफ, आकाश ऊर्फ मुन्ना संजय गायकवाड आणि प्रमोद विजयकुमार यादव यांचा पोलीस शोध घेत आहेत. सुरुवातीला नऱ्हे पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआरमध्ये पोलीस आणि पत्रकाराची नावे जाणीवपूर्वक वगळण्यात आल्याचा आरोप झाला होता, मात्र प्रसारमाध्यमांच्या दबावामुळे अखेर पोलिसांनी (Police) पुरवणी एफआयआर दाखल करून या सर्वांचा आरोपी म्हणून समावेश केला आहे. 

ताज्या बातम्या

default-featured-image

0
जलसंधारण सचिवांकडून सिन्नर तालुक्यातील पुराचाऱ्यांची पाहणी नाशिक, दि. 27 जुलै, 2026 (जिमाका वृत्तसेवा) : शासनाच्या मृद व जलसंधारण विभागाचे सचिव जितेंद्र पापळकर आणि मुख्य अभियंता...