नाशिक | Nashik
विधानसभेचे कामकाज सुरू असताना पत्त्यांचा गेम खेळत बसलेल्या कॅबिनेट मंत्री माणिकराव कोकाटे यांच्याकडील कृषि खाते काढून घेण्यात आले. अजित पवारांनी पक्षातीलच दत्ता भरणे यांच्याकडे या खात्याची जबाबदारी दिली, तर कोकाटेंकडे आता क्रीडा खाते देण्यात आले आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या फेरबदलानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. ‘कृषिमंत्रिपदाची पहिली ऑफर मलाच दिली होती.’, असे छगन भुजबळ यांनी सांगितले.
राज्याचे पावसाळी अधिवेशन सुरू असतानाच विधिमंडळामध्ये माणिकराव कोकाटे रमी खेळत असल्याचा आरोप झाला. याचा व्हिडिओही समोर आला. विरोधकांनी या मुद्यावर आक्रमक होत अजित पवारांच्या राष्ट्रवादीला आणि महायुतीला घेरण्याचा प्रयत्न केला. कोकाटे यांची मंत्रिमंडळातून गच्छंती होणार असल्याची चर्चा सुरू झाली होती. मात्र, कोकाटे यांना कॅबिनेटमध्ये कायम ठेवत त्यांच्याकडील खाते बदलण्यात आले.
भुजबळ यांनी म्हटले की, आम्ही पहिल्यांदा भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्यासोबत सरकारमध्ये आलो, त्यावेळेला अजितदादांनी अर्थ खाते घेतले. त्यानंतर बाकीचे खाते माझ्यासमोर ठेवले. तुम्हाला जे खाते पाहिजे आहे ते घ्या. त्यावेळी आम्ही चर्चा केली. मात्र, माझे राजकारण मुंबईत झाले आहे. त्यामुळे ग्रामीण भागाची जाण असलेल्या नेत्याला हे खाते देण्याची विनंती केली होती, असे भुजबळांनी सांगितले. अजित पवारांनी आपण कृषी खात्याचा पदभार घ्यावा, यासाठी आग्रह केला. मात्र, मी भूमिकेवर ठाम राहिलो असल्याचे भुजबळांनी सांगितले.
भुजबळ पुढे म्हणाले, “मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हा निर्णय घेतात. मी अधिक बोलणे योग्य राहणार नाही. याआधी देखील अनेक कृषिमंत्री राहिले आहेत. शरद पवारांनी देशाचे कृषिमंत्री म्हणून काम केले आहे. त्यामुळे कोणत्याही खात्यात काही अडचण राहत नाही. विरोधकांचे काम आहे आणि त्यामुळे ते राजीनामा मागतात.”
दादा भरणे यांच्याकडे कृषी खात्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना छगन भुजबळ यांनी सांगितले की, ‘दत्ता मामा भरणे देखील ग्रामीण भागातून आलेले आहेत. या खात्याला न्याय देऊ शकतील. ज्यावेळी आम्ही भाजप- शिंदे गटासोबत सरकारमध्ये आलो त्यावेळी अजित पवारांनी अर्थ खाते घेतले. त्यावेळी माझ्या पुढे सर्व खाते ठेवले. मला कृषी खाते घेण्यासाठी आग्रह केला. मोठे खाते घेण्यासाठी खूप आग्रह केला गेला. पण ग्रामीण भागातील लोकांना द्या हे मी सांगितले. माझे राजकारण मुंबई झाले आहे. आम्ही शेतकरी प्रश्नावर मागे उभे राहतो पण त्याची बारीक सारीक माहिती देणारे माणसे ग्रामीण भागात असतात. त्यामुळे भरणे मामा न्याय देतील. बालपणापासून जो ग्रामीण भागात राहिलेला आहे तो जास्त न्याय देऊ शकतो. भरणे मामा यांना अडचण येईल असं वाटत नाही.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा





