Saturday, May 30, 2026
HomeराजकीयParth Pawar News: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठ्या घडामोडी, पार्थ पवारांबाबत महत्त्वाचा निर्णय

Parth Pawar News: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठ्या घडामोडी, पार्थ पवारांबाबत महत्त्वाचा निर्णय

मुंबई । Mumbai

- Advertisement -

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. अजित पवारांनंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाची धुरा सांभाळली आहे. ३१ जानेवारी रोजी त्यांनी या पदाची शपथ घेतली.

मात्र, उपमुख्यमंत्रिपद स्वीकारण्यापूर्वी सुनेत्रा पवार या राज्यसभेच्या खासदार होत्या. या नव्या जबाबदारीमुळे त्यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा दिला असून, आता त्यांच्या रिक्त झालेल्या जागेवर अजित पवारांचे सुपुत्र पार्थ पवार यांना संधी मिळण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पार्थ पवार यांच्या राज्यसभेवर जाण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. सुनेत्रा पवार यांची राज्यसभेची मुदत ४ जुलै २०२८ पर्यंत, म्हणजेच अजून दोन वर्षे शिल्लक होती. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (अजित पवार गट) सध्या सुरू असलेल्या चर्चेनुसार, पार्थ पवार यांना केवळ दोन वर्षांच्या मुदतीऐवजी सहा वर्षांची पूर्ण टर्म असलेल्या राज्यसभेच्या जागेवर पाठवण्याचा विचार सुरू आहे. ही जागा लवकरच भरली जाणार असून, त्यासाठी पार्थ पवारांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केल्याचे समजते.

अजित पवारांच्या निधनानंतर पार्थ पवार आणि जय पवार हे दोन्ही बंधू राजकारणात अधिक सक्रिय होतील, असा राजकीय जाणकारांचा अंदाज होता. यापूर्वी बारामती लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या प्रचारात या दोघांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. आता बदललेल्या परिस्थितीत त्यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी आली आहे.

सुनेत्रा पवार राज्यात उपमुख्यमंत्री म्हणून कारभार पाहतील, तर जय पवार दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रतिनिधित्व करतील, अशी चर्चा पक्षांतर्गत सुरू आहे. पार्थ पवारांनी या संदर्भात पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा केल्याचीही माहिती समोर आली आहे. पार्थ पवार यांनी २०१९ मध्ये मावळ मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवली होती, मात्र त्यात त्यांना यश आले नव्हते.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) अध्यक्ष शरद पवार यांचा प्रस्तावित दिल्ली दौरा अचानक रद्द झाला आहे. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी ते मंगळवारी दिल्लीला रवाना होणार होते. मात्र, ऐनवेळी हा दौरा स्थगित करण्यात आला. मुंबईला रवाना होण्यापूर्वी शरद पवार आणि प्रतिभा पवार यांनी बारामतीतील विद्या प्रतिष्ठान परिसराला भेट दिली.

याच ठिकाणी अजित पवार यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले होते. शरद पवारांनी तेथे विद्या प्रतिष्ठानचे विश्वस्त किरण गुजर यांच्याशी अजित पवारांच्या नियोजित स्मृतीस्थळाबाबत सविस्तर चर्चा केली. या भेटीनंतर ते मुंबईकडे रवाना झाले, मात्र त्यानंतर त्यांचा दिल्ली दौरा रद्द झाल्याचे सांगण्यात आले. पुढील काळात पवार कुटुंबातील ही नवी पिढी दिल्ली आणि महाराष्ट्राच्या राजकारणात कशा प्रकारे आपला प्रभाव पाडते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ताज्या बातम्या

IPL 2026 – RR VS GT : गिलच्या शतकाचा धमाका! गुजरात...

0
आयपीएल २०२६च्या दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात आज गुजरात ने राजस्थान वर दमदार विजय मिळवत अंतिम फेरीत धडक मारली. न्यू चंदीगडच्या मुल्लांपूर मैदानावर झालेल्या या हायव्होल्टेज...