Thursday, January 29, 2026
HomeनगरAhilyanagar : अजितदादांची अकाली एक्झिट!; जिल्ह्यातील नेत्यांनी व्यक्त केला शोक

Ahilyanagar : अजितदादांची अकाली एक्झिट!; जिल्ह्यातील नेत्यांनी व्यक्त केला शोक

अजितदादांच्या निधनाने महाराष्ट्राचा विकासाचा कणा हरपला – विवेक कोल्हे

कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav

महाराष्ट्राच्या राजकारणातील एक धगधगते नेतृत्व, शिस्तीचा भोक्ता आणि विकासाचा ध्यास घेतलेले उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या आकस्मिक निधनाने संपूर्ण राज्यावर शोककळा पसरली आहे. राजकीय पटलावरून एक दादा माणूस हरपला, अशा शब्दांत युवानेते विवेक कोल्हे यांनी आपल्या भावना व्यक्त करत दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. ही बातमी केवळ दुर्दैवीच नव्हे, तर मनाला चटका लावणारी आणि अकल्पित असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे.

- Advertisement -

विशेष म्हणजे, अवघ्या चोवीस तासांपूर्वीच म्हणजेच मंगळवारी (दि. 27 जानेवारी) विवेक कोल्हे यांनी मुख्यमंत्री दालनात अजितदादांची भेट घेतली होती. या शेवटच्या भेटीतही दादांनी नेहमीच्या आपुलकीने कारखानदारीपासून ते विविध विकासकामांपर्यंत सविस्तर चर्चा केली होती. कामात कमालीची शिस्त, स्पष्टवक्तेपणा आणि कार्यकर्त्यांना बळ देण्याची वृत्ती हीच दादांची खरी ओळख होती. समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत विकासाची गंगा पोहोचवण्यासाठी झटणारा हा लोकनेता एवढ्या लवकर एकाकी सोडून जाईल, याची कल्पनाही कोणाला नव्हती.

YouTube video player

माझ्यासाठी ते केवळ एक नेते नव्हते, तर एक खंबीर मार्गदर्शक आणि प्रेरणास्थान होते. चोवीस तासांत नियतीने असा घाला घातला की, आता दादांचे मार्गदर्शन पुन्हा लाभणार नाही, ही जाणीव अत्यंत वेदनादायी आहे, असे विवेक कोल्हे यांनी म्हटले आहे. कोल्हे परिवार आणि संजीवनी उद्योग समूहाच्या वतीने या लोकनेत्याला आदरांजली वाहण्यात आली असून, महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात निर्माण झालेली ही पोकळी कधीही भरून न निघणारी असल्याचे त्यांनी नमूद केले.

अजितदादांच्या आठवणींनी आ. आशुतोष काळे भावुक

कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav

दुर्दैवी विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे निधन झाल्याची बातमी केवळ राज्याला सुन्न करणारी नसून, माझ्या आयुष्यातील ही सर्वात मोठी वैयक्तिक हानी आहे. अजितदादा केवळ नेते नव्हते, तर त्यांनी मला मुलाप्रमाणे जीव लावून माझे पालकत्व स्वीकारले होते. आज त्यांच्या जाण्याने माझ्या डोक्यावरील मायेचे छत्र कायमचे हरपले आहे, अशा शब्दांत आमदार आशुतोष काळे यांनी आपल्या अश्रूंना वाट करून दिली.

अजितदादांच्या अकाली निधनाने संपूर्ण कोपरगाव विधानसभा मतदारसंघ शोकसागरात बुडाला आहे. दादांचे कोपरगाववर असलेले विशेष प्रेम आणि जिव्हाळा याबद्दल बोलताना आ. काळे म्हणाले की, आमच्या मतदारसंघातील रस्ते, पाणी, शिक्षण, आरोग्य आणि शेतीसाठी त्यांनी दिलेला अमाप निधी ही केवळ राजकीय मदत नव्हती, तर ते दादांच्या जीवापाड प्रेमाचा ठसा होता. मी जेव्हा जेव्हा त्यांच्याकडे विकासाची मागणी घेऊन गेलो, तेव्हा त्यांनी ती शब्दापलीकडे जाऊन पूर्ण केली.

एक कार्यकर्ता आणि नेता यापलीकडे असलेले हे नाते अत्यंत घट्ट होते. अजितदादांची कार्यपद्धती, त्यांचा सडेतोडपणा आणि तरीही मनात असलेली माणुसकी याबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना आ. काळे यांनी सांगितले की, दादांच्या शब्दांनी मनाला नेहमीच नवी उभारी मिळायची. त्यांच्यासारखा स्पष्ट, निर्भीड आणि विकासाभिमुख नेता आजच्या राजकारणात दुर्मीळ होता. दादांच्या जाण्याने महाराष्ट्राच्या राजकारणात निर्माण झालेली पोकळी कधीही भरून न निघणारी आहे. माझ्यासारख्या हजारो कार्यकर्त्यांना घडवणारा आणि विकासाची दिशा देणारा आधारवड कोसळल्याची भावना व्यक्त करत आ. आशुतोष काळे यांनी या महान लोकनेत्याला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

दादांच्या जाण्याने देवळालीचा आधारवड गेला – माजी आ. चंद्रशेखर कदम

माझ्यापेक्षा वयाने लहान पण कर्माने मोठे असलेले अजितदादा जाणे हे मोठे दुर्दैव आहे. माझी आमदारकी दादांमुळे खुलून आली. त्यांनी राहुरी तालुका विशेषतः देवळालीसाठी नेहमी भरभरुन मदत केली. त्यांचे जाण्याने देवळाली शहराचा आधारवड गेला. मी त्यांच्या पक्षात नव्हतो, तरी कधीच कोणत्याच कामाला कधी नाही म्हणाले नाही. जुलै महिन्यात खास मला भेटण्यासाठी देवळाली प्रवराला आले होते. तीच शेवटची भेट ठरली.

महाराष्ट्राचा लाडका नेता हरपला – आ. डॉ. लहामटे

महाराष्ट्राचा एक लाडका गतिमान नेता हरपला. ज्यांच्यात समयसूचकता, शिस्त, प्रशासनातला प्रदीर्घ अनुभव होता, तो नेता आज अचानक एक्झिट घेतोय ही महाराष्ट्रासाठी मोठी हानी आहे ती कधीही भरून येणार नाही. दादांनी मला जे प्रेम दिले, ताकद दिली त्यावरच माझे राजकारण, समाजकारण उभे राहिले. माझ्यावर त्यांचा मोठा विश्वास होता. राजकारणातले ते माझे ‘गॉडफादर’ होते. ते गेल्याचे मोठे दुःख मला असल्याची भावनिक प्रतिक्रिया अकोल्याचे आमदार डॉ. किरण लहामटे यांनी दिली.

महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली – डॉ. अजित नवले

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बारामती याठिकाणी विमान अपघातामध्ये दुःखद निधन झाले. याबद्दल मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्यावतीने राज्य सचिव डॉ. अजित नवले यांनी श्रद्धांजली अर्पण केली. त्यांचे अशाप्रकारे जाणे त्यांच्या चाहत्यांना आणि महाराष्ट्राच्या जनतेला अत्यंत वेदना देणारी गोष्ट आहे. वेळेबद्दल अत्यंत काटेकोर आणि प्रचंड कष्ट घेण्याची कार्यपद्धती यामुळे ते कार्यक्षमपणे राज्याचा कारभार करत असत. श्रमिक चळवळीमध्ये योग्य ते सहकार्य ते नेहमी करत असत. महाविकास आघाडीच्या काळात श्रमिकांचे अनेक प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतल्याचा अनुभव जनतेने घेतला आहे. त्यांच्या जाण्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्यावतीने त्यांना आम्ही सर्वजण श्रद्धांजली अर्पण करत आहोत, अशा भावना डॉ. अजित नवले यांनी व्यक्त केल्या.

ग्रामीण जनतेचा खरा आधार हरपला : माजी मंत्री प्राजक्त तनपुरे

ग्रामीण भागातील एक मोठे, विश्वासार्ह आणि जनतेचा आधार असलेले नेतृत्व आपण गमावले असून हा धक्का अजूनही पचनी पडत नाही. स्व. दादांचे नेतृत्व ग्रामीण जनतेसाठी नेहमीच प्रेरणादायी होते. शेतकरी, कष्टकरी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठी ते सातत्याने संघर्ष करत होते. त्यांच्या जाण्याने केवळ एक राजकीय नेता नाही, तर ग्रामीण भागातील जनतेचा खरा आधार हरपल्याची भावना सर्वत्र निर्माण झाली आहे. विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर दुसर्‍याच दिवशी सकाळी स्व. दादांचा मला फोन आला होता. त्या एका फोनने मला मोठा मानसिक आधार मिळाला. त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक प्रश्न मार्गी लागले. त्यांच्या निधनाने ग्रामीण भागात मोठी पोकळी निर्माण झाली असल्याची भावना सर्वसामान्य जनतेत आहे.

महाराष्ट्राने उमदा नेता गमावला – माजी मंत्री बाळासाहेब थोरात

स्पष्ट बोलणे, कामाची मोठी उरक आणि प्रशासनावर पकड असल्याबरोबर कठोर निर्णय घेण्याची क्षमता असलेले अजित पवार यांच्या अपघाती निधनाची बातमी ही संपूर्ण महाराष्ट्रासाठी अत्यंत दुःखदायक असून त्यांच्या निधनाने राज्याने उमदा नेता गमावला असल्याची भावना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेची बातमी समजताच संपूर्ण महाराष्ट्र हळहळला असून माजी मंत्री थोरात भावना व्यक्त करताना म्हणाले, अनेक वर्ष अजित पवार आणि आम्ही एकत्र काम केले आहे. स्पष्ट बोलण्याबरोबर कठोर निर्णय घेण्याची त्यांची क्षमता होती. विविध खात्यांची जबाबदारी त्यांनी अत्यंत सक्षमपणे सांभाळून सर्वांना भावणारी त्यांची वक्तृत्वशैली होती. राजकीय कारकीर्द अत्यंत मोठी असताना अचानकपणे काळाने घातलेला घाला हा अत्यंत दुर्दैवी आहे. त्यांच्या जाण्याने प्रशासनावर पकड असलेला लोकप्रिय उमदा नेता गमावला असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली.

अजितदादांच्या निधनाने महाराष्ट्र पोरका झाला – आ. अमोल खताळ

माझ्यासारख्या एका सर्वसामान्य कार्यकर्त्याला घडवणारे मार्गदर्शक नेते अजितदादा पवार आपल्यात नाहीत, यावर अजूनही माझा विश्वास बसत नाही. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राची मोठी हानी झाली असून महाराष्ट्र पोरका झाला आहे, अशा शब्दांत संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. आमदार खताळ म्हणाले, चांदा ते बांद्यापर्यंत अजितदादा पवार यांनी कार्यकर्त्यांना विविध पदांवर काम करण्याची संधी देऊन त्यांना नेते केले अशा राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बारामती येथे विमान लँडिंगदरम्यान अपघात झाला, त्यामध्ये त्यांचे निधन झाले ही बातमी अत्यंत धक्कादायक आहे. ते आपल्यात नाहीत यावर विश्वासच बसत नाही. हा दिवस महाराष्ट्राच्या इतिहासात काळा दिवस म्हणून नोंदला जाईल. मी स्वतः राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसमध्ये कार्यरत होतो तेव्हा त्यांच्याशी माझा जवळून संपर्क आला. त्यांचा जनता दरबार मी प्रत्यक्ष पाहिला आहे. प्रशासनावर त्यांची जबरदस्त पकड होती. कार्यकर्त्यांकडून काम करून घेण्याची त्यांची वेगळी पद्धत होती. संगमनेर तालुक्याचा एक सर्वसामान्य कार्यकर्ता आमदार झाला, हे ऐकून त्यांना मनापासून आनंद झाला होता. विधिमंडळाच्या अधिवेशनातही मी नेहमी त्यांचे मार्गदर्शन घेत होतो. अशा या माझ्या मार्गदर्शक नेत्याला मी जड अंतःकरणाने भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो, अशी प्रतिक्रिया आमदार खताळ यांनी दिली.

महाराष्ट्राचा लढवय्या नेता हरपला- आ. सत्यजीत तांबे

‘लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा वाचला पाहिजे’ असे बाजीप्रभू देशपांडे बोलल्याची इतिहासात नोंद आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने कर्ता व्यक्ती गेली आहे. फटकळ बोलणारा स्पष्टवक्ता, पण तेवढ्याच तत्परतेने चूक मान्य करून सॉरी बोलणारे अजित पवार हे अत्यंत लोकप्रिय होते. सकाळी लवकर उठून कामाची उरक असणारा आणि प्रशासनावर जरब असणारा एक कुशल राजकारणी, मनमोकळा स्वभाव असलेले अजितदादा यांच्या निधनाने महाराष्ट्राचा लढवय्या नेता हरपला असल्याची भावना नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजीत तांबे यांनी व्यक्त केली आहे.

जनतेच्या मनावर अधिराज्य गाजवणारा नेता हरपला – आ.हेमंत ओगले

आपल्या मतदारसंघातील देवळाली प्रवरा हे दादाचं जन्म गाव आणि आजोळ असल्यामुळे त्याचे विशेष प्रेम श्रीरामपूरवर होते.जनतेच्या मनावर अधिराज्य गाजवणारा असा नेता पुन्हा होणे नाही. मला त्यांच्यासोबत विधिमंडळामध्ये काम करण्याची संधी मिळाली. जेव्हा जेव्हा दादांना भेटायला गेलो की, म्हणायचे श्रीरामपूर जिल्हा टोपी कुठे आहे, माझ्या आजोळचा आमदार आहे. तू काही लागलं तर सांग. चांगल्या कामाची प्रशंसा करून कायम पाठीवर हात ठेवणारे दादा आज आपल्यातून गेले. मी, माझ्या श्रीरामपूर-राहुरी विधानसभा मतदारसंघाच्या वतीने दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.

राज्याचे अभ्यासू नेतृत्व हरपले – माजी मंत्री शंकरराव गडाख

राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी अहोरात्र कार्यरत, जनतेशी थेट संपर्क, कामाचा मोठा आवाका, अतिशय शिस्तप्रिय, प्रशासनावर मजबुत पकड असणारे व अभ्यासू नेतृत्व राज्याचे उपमुख्यमंत्री स्व. अजित पवार यांच्या निधनाने राज्य एका दुरदृष्टीच्या नेतृत्वाला मुकले आहे. पुन्हा असे नेतृत्व होणे नाही, अशा शब्दात माजी मंत्री शंकरराव गडाख यांनी श्रध्दांजली अर्पण केली. गडाख कुटूंबियांचा स्व. अजित पवार यांच्याशी कौटुंबिक ऋणानुबंध होता, असेही ते म्हणाले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निधन झाले आहे. शब्दात सांगता येणार नाही अशी ही अतिशय दुर्दैवी घटना आहे. अचानकपणे ही दुर्दैवी बातमी सकाळी येऊन धडकली. दुर्दैवाने या देशाची जनसंख्या ही समुद्राला आलेल्या भरतीप्रमाणे वाढत चालली आहे, त्यातील अजित पवार सारखी माणसं, अशी जाणं ही देशाची आणि समाजाची फार मोठी हानी आहे. अजित दादांच्या आत्म्यास ईश्वराने चिरशांती देवो.
– अण्णा हजारे, ज्येष्ठ समाजसेवक.

दिलेला वेळ आणि शब्द पाळणारे, अशी ख्याती असलेले उपमुख्यमंत्री अचानक आपल्याला सोडून गेले. अजितदादा आपल्यात नाहीत हे स्वीकारायला मन अजूनही तयार नाही. त्यांच्या विलक्षण कार्यकर्तृत्वाचे योगदान महाराष्ट्र सदैव स्मरणात ठेवेल. पवार कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सर्व सहभागी आहोत. अजितदादा यांच्यासह दुर्दैवी विमान अपघातात प्राण गमवावे लागलेल्या सर्वांना भावपूर्ण श्रद्धांजली.
– राम शिंदे, सभापती, विधानपरिषद.

अजितदादांनी माझ्यावर कधीच प्रेम कमी केलं नाही. शरद पवारसाहेबांबरोबर असलो, तरी त्यांनी माझ्यावर प्रेम करत राहिले. अजितदादांचं असं जाणं सर्वांसाठी वाईट आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीतील कार्यक्रमात आम्ही शेवटचो भेटलो होतो. ती आमची शेवटची भेट ठरली. मी त्यांचा जवळचा आमदार म्हणून होतो. दादांनी खूप मदत केली. माझ्या प्रत्येक कामाला अजितदादांची ताकद होती. राजकीय मतप्रवाह वेगळे झाले, तरी अजितदादांचे प्रेम आजपर्यंत कायम होते.
खा. नीलेश लंके.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाच्या बातमीवर विश्वासच बसत नाहीये. ही अत्यंत दु:खदायी व धक्कादायक घटना आहे. त्यांच्या निधनाने नगरचा पाठीराखा हरपला आहे. एक कतर्व्यदक्ष, शिस्तप्रिय, विकासाचा दृष्टिकोन असलेला तसेच दूरदृष्टी, धाडसी आणि प्रशासनाला योग्य दिशा देणारा लोकनेता आज आपल्यातून गेला आहे. राज्याच्या विकासासाठी त्यांनी जे योगदान दिले, ते अत्यंत मौलिक व महत्त्वपूर्ण होते. प्रचंड निर्णय क्षमता आणि निर्भीड असलेल्या अजितदादांनी महाराष्ट्राला दिशा देताना राजकारणापलीकडे जात सर्वसामन्य नागरिक, शेतकर्‍यांसाठी मोठी कामे केली. लोकहितासाठी घेतलेले कठोर निर्णय आणि निर्भीड भूमिका हीच त्यांची खरी ओळख होती.
आ. संग्राम जगताप.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अकाली निधनाने राज्यासह देशाची मोठी हानी झाली आहे. स्व. राजीव राजळे व अजितदादा यांचे अत्यंत घनिष्ठ व मैत्रीचे संबंध होते. राजीवजींच्या निधन झाल्यानंतर दादांनी राजळे कुटुंबाशी असलेले घनिष्ठ नाते टिकवून ठेवले होते. माझी व त्यांची ज्या-ज्या वेळेस विधानभवनात भेट होत होती. त्या प्रत्येक वेळेस ते आपुलकीने माझी विचारपूस करत. काही कामे असतील तर सांगा, असे ते मला हक्काने म्हणायचे. त्यांच्या अकाली निधनाने राज्याच्या राजकारणातील एका दादा माणसाला आपण गमावले असून त्यांच्या जाण्याने महाराष्ट्राच्या राजकारणात जी मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
– आमदार मोनिकाताई राजळे.

महाराष्ट्राच्या राजकारण व समाजकारणातील परीस असलेले सर्वसामान्यांचा असामान्य असा नेता असा अचानक जाणे हे मन सुन्न करणारी घटना आहे. जबरदस्त पकड असलेले, शब्दाचे पक्के असणारे दादा लोकप्रियतेच्या शिखरावर असताना जाणे मनाला निशब्द करणारे आहे. माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला आमदार होण्याची संधी केवळ आणि केवळ त्यांच्यामुळेच मिळाली. असा नेता पुन्हा होणे नाही. दादा तुम्ही नाहीत तर समोर सर्व काही अंधारमय झाले आहे. प्रिय दादांना भावपूर्ण श्रद्धांजली
– आमदार काशिनाथ दाते.

राजकारणातील दादा माणूस आज आपल्यातून अचानक हरवला आहे. अजितदादांसारखा ठाम निर्णय घेणारा, स्पष्ट विचार करणारा आणि लोकांसाठी नेहमीच समर्पित राहणारा नेता पुन्हा दिसणार नाही, ही विचार न करण्यासारखी दुःखद गोष्ट आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याचा अनुभव मला आयुष्यात नेहमीच प्रेरणादायी राहील. त्यांच्या आत्म्यास ईश्वर शांती देवो, आणि पवार कुटुंबियांना या दुःखद प्रसंगातून सावरण्याची ताकद देवो, हीच प्रार्थना!
– आमदार विक्रम पाचपुते.

ग्रामीण भागाची माहिती असणारे, प्रशासनावर पकड असणारे, सहकार चळवळीला बळ देणारे, शेतकरी व सर्वसामान्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी सातत्याने कार्य करणारे, दुरदृष्टी असणारा नेता, महाराष्ट्राचे धडाडीचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जाण्याने महाराष्ट्राची प्रचंड हानी झाली असून ही पोकळी भरणे अशक्य आहे. निशब्द भावपुर्ण श्रद्धांजली!
चंद्रशेखर घुले, चेअरमन, जिल्हा सहकारी बँक.

अजित दादा हे खरेच दादा होते. आज त्यांच्या जाण्याने मन सुन्न झाले आहे. राजकारणात अनेक नेते पाहिले, अनेकांशी काम केले; पण अजित पवार यांच्यासारखा माणूस पुन्हा होणे नाही, याची तीव्र जाणीव आज प्रकर्षाने होत आहे.
राजेंद्र फाळके, माजी जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी.

ताज्या बातम्या

Crime News : ट्रान्सफॉर्मर देण्याच्या बहाण्याने 84.58 लाखांची फसवणूक

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar क्रॉम्प्टन कंपनीचे डीलर असल्याचे भासवून एका कंपनीची तब्बल 84 लाख 58 हजार 430 रूपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार येथील नागापूर एमआयडीसीत उघडकीस...