Tuesday, August 18, 2026
HomeनगरShirdi : अजितदादांच्या अकाली एक्झिटने साईंची शिर्डी सुन्न

Shirdi : अजितदादांच्या अकाली एक्झिटने साईंची शिर्डी सुन्न

कार्यकर्त्यांच्या डब्यापासून ते प्रोटोकॉल मोडण्यापर्यंतच्या आठवणींना उजाळा

शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi

सकाळी नऊचा दर्शनाचा वेळ असताना, पहाटे सात वाजताच साधेपणाने रांगेत उभे राहून साईंचे दर्शन घेणारा एक व्हीआयपी साईभक्त आज काळाच्या पडद्याआड गेला. राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या विमान अपघातातील निधनाची वार्ता शिर्डीत समजताच संपूर्ण शहरासह अहिल्यानगर जिल्ह्यावर दुःखाचे सावट पसरले आहे. शिर्डी आणि अजितदादांचे नाते केवळ राजकारणापुरते मर्यादित नव्हते, तर ते भक्ती आणि आपुलकीचे एक अतूट नाते होते.
अजितदादा शिर्डीत आले की केवळ सरकारी कामात अडकून न पडता, राष्ट्रवादीच्या सामान्य कार्यकर्त्यांच्या घरी जाऊन त्यांची आस्थेवाईकपणे चौकशी करायचे. त्यांच्या जाण्याने शिर्डीतील राजकीय आणि सामाजिक वर्तुळात कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली आहे.

- Advertisement -

डब्यासाठी हट्ट धरणारे दादा
दादा शिर्डीत आले की आमच्या घरी हक्काने यायचे आणि जेवणासाठी डबा मागून घ्यायचे. कामे नीटनेटकी आणि वेळेतच झाली पाहिजेत, हा त्यांचा आग्रह असायचा. आनंदाची बातमी असो की कार्यकर्त्याचे अडकलेले काम, दादा नेहमीच धावून यायचे. त्यांच्या अचानक जाण्याने काय बोलावे हेच सुचत नाही.
-संग्राम कोते (राष्ट्रवादी प्रदेश संघटक)

प्रोटोकॉल तोडून दर्शन
दादांचे दर्शन 10 वाजता नियोजित असताना ते सकाळी 7 वाजताच हजर व्हायचे, त्यामुळे अनेकदा आमची आणि प्रशासनाची धांदल उडायची. माझ्या मातोश्रींच्या निधनानंतर त्यांनी घरी येऊन सांत्वन केले होते. शिर्डीतून कोणीही गेले की ते तात्काळ भेटायचे आणि काय काम आहे? असे आपुलकीने विचारायचे.
-रमेशभाऊ गोंदकर (राष्ट्रवादी नेते)

दुष्काळी परिषदेचा दिलेला शब्द पाळला
2003 मध्ये काही नेत्यांचा विरोध असतानाही दादांनी राहात्यातील दुष्काळी परिषदेला दिलेला शब्द पाळला. सकाळी 8:30 वाजताच हजर राहून त्यांनी कामाचा धडाका लावला होता. उद्घाटनाच्या वेळी कामात त्रुटी असेल तर ती रोखठोकपणे मांडणारा असा नेता पुन्हा होणे नाही.

– डॉ. राजेंद्र पिपाडा, ज्येष्ठ नेते

सामान्य कार्यकर्त्याची मोठी ओळख
एका शासकीय कार्यक्रमात दादांनी चक्क मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे माझी ओळख करून दिली. मी दिलेली संभाजी महाराजांची मूर्ती त्यांनी अत्यंत आदराने स्वीकारून ती आपल्यासोबत बारामतीला नेली. सामान्य कार्यकर्त्याला बळ देणारा तो स्पर्श आता उरला नाही.

– दशरथ गव्हाणे (संभाजी ब्रिगेड)

कौटुंबिक नाते अन् पाठबळ
निलेश कोते (नगरसेवक)- दादांच्या निधनाने आमची वैयक्तिक हानी झाली आहे. राष्ट्रवादीच्या मेळाव्यानिमित्त आमच्या साई संगमम हॉटेलवर त्यांनी कार्यकर्त्यांशी जो संवाद साधला, तो आजही आमच्या मनात जिवंत आहे. त्यांच्या रोखठोक बोलण्यामागे कार्यकर्त्याबद्दलचे प्रेम लपलेले असायचे. साईबाबांच्या चरणी या मनिस्सीम साईभक्ताला संपूर्ण शिर्डीच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
-संदीप सोनवणे (तालुकाध्यक्ष)
-निलेश कोते (नगरसेवक)

ताज्या बातम्या

Bhandardara : भंडारदरा पाणलोटात श्रावणसरींचा जोर

0
भंडारदरा, कोतूळ |वार्ताहर| Bhandardara उत्तर नगर जिल्ह्याचे जिवनदायिनी भंडारदरा आणि निळवंडे धरण तुडूंब असून काल सोमवारी श्रावणसरींचा जोर वाढल्याने धरणातून पाणी आणखी सोडण्यात येण्याची शक्यता...