मुंबई । Mumbai
मुंबईतील मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात आज राजकीय वातावरण तापलेले पाहायला मिळाले. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे आमदार रोहित पवार आणि आमदार अमोल मिटकरी यांनी पोलिस ठाण्यात थेट जाऊन आक्रमक भूमिका घेतली. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाप्रकरणी स्पष्ट पुरावे समोर आले असतानाही अद्याप गुन्हा दाखल का केला जात नाही, असा थेट सवाल त्यांनी पोलिसांना केला. यावेळी पोलिस ठाण्यात जोरदार बाचाबाची झाल्याचे व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाले आहेत.
मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात दाखल होताच रोहित पवार आणि अमोल मिटकरी यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या. या प्रकरणात अनेक तथ्ये, तांत्रिक अहवाल आणि माध्यमांमधून समोर आलेली माहिती असताना केवळ चौकशीचे आश्वासन देऊन वेळकाढूपणा केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला. “इतके पुरावे उपलब्ध असताना पोलिसांकडून ठोस कारवाई का केली जात नाही?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
या वेळी रोहित पवार, अमोल मिटकरी यांच्यासह आमदार संदीप क्षीरसागरही उपस्थित होते. या नेत्यांनी नागरी विमान वाहतूक संचालनालय म्हणजेच DGCA आणि संबंधित व्हीएसआर कंपनीविरोधात तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. अजित पवार यांच्या अपघाती निधनाप्रकरणी केवळ “चौकशी करू” अशी भूमिका नको, तर त्वरित एफआयआर दाखल करून जबाबदारी निश्चित करावी, अशी स्पष्ट भूमिका आमदारांनी मांडली.
नेत्यांचा दावा आहे की डीजीसीएच्या अहवालातूनही संबंधित विमान कंपनीचा निष्काळजीपणा समोर आला आहे. विमानाची नियमित देखभाल आणि मेंटेनन्स योग्य पद्धतीने न झाल्याचे पुरावे उपलब्ध आहेत. त्यामुळे हा अपघात केवळ दुर्दैवी नसून, गंभीर निष्काळजीपणामुळे घडलेला प्रकार असल्याचा आरोप त्यांनी केला. या पार्श्वभूमीवर डीजीसीए आणि व्हीएसआर कंपनीच्या संबंधित अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी ठाम मागणी रोहित पवार यांनी केली.
या गदारोळानंतर पोलिसांनी कार्यकर्त्यांना पोलिस केबिनबाहेर काढले. केबिनमध्ये फक्त रोहित पवार, अमोल मिटकरी, संदीप क्षीरसागर आणि त्यांचे वकील उपस्थित होते. यावेळी पोलिस उपायुक्त प्रवीण मुंढे हेही पोलिस ठाण्यात दाखल झाले. त्यांनी आमदारांशी चर्चा करत कायदेशीर प्रक्रियेनुसार कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले.
मात्र, केवळ तक्रार अर्ज स्वीकारून भागणार नाही, तर तात्काळ गुन्हा दाखल करावा, या मुद्द्यावर आमदार अधिक आक्रमक झाल्याचे दिसून आले. रोहित पवार आणि पोलिस अधिकाऱ्यांमध्ये यावेळी शाब्दिक वादही झाला. “राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांचा मृत्यू होतो आणि तरीही एफआयआर दाखल होत नाही, हे गंभीर आहे,” असे रोहित पवार म्हणाले. विमान कंपनीला वाचवण्यासाठी पोलिसांवर दबाव टाकला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.
आमदार अमोल मिटकरी यांनीही पोलिसांच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली. “एवढ्या मोठ्या नेत्याचा मृत्यू झाल्यानंतरही पोलीस केवळ चौकशीची भाषा करत आहेत. ही बाब अत्यंत दुर्दैवी आहे,” असे त्यांनी सांगितले. आंदोलनाची तीव्रता लक्षात घेता पोलिसांकडून परिस्थिती नियंत्रणात ठेवण्याचे प्रयत्न सुरू होते.
एकीकडे पोलिसांकडून कायद्याच्या चौकटीत योग्य कारवाई केली जाईल, असे सांगितले जात असले तरी दुसरीकडे आमदारांचा तात्काळ एफआयआरचा आग्रह कायम आहे. त्यामुळे अजित पवार यांच्या अपघाती निधनाप्रकरणी पुढील काळात कायदेशीर आणि राजकीय पातळीवर मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.





