नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
राष्ट्रवादी काँग्रेस(अप) पक्षाचे प्रमुख आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आज(दि.28) सकाळी बारामती येथे विमानअपघातात दुःखद निधन झाले. बारामतीविमानतळावर लँडिंगदरम्यान हा भीषण अपघात झाला. यात अजितदादांसह, विमानातील सर्व पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातानंतर अपघातग्रस्त विमान कंपनीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. विमान कंपनीच्या मालकाची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त विमान व्हीएसआर व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेड (VSR Aviation) या कंपनीचे होते. अपघातानंतर कंपनीचे संचालक विजय कुमार सिंह यांनी सांगितले की, ‘विमान उतरवण्याचा निर्णय पूर्णतः वैमानिकाचा होता. त्यांनी आधी रनवे 29 वर विमान उतरवण्याचा प्रयत्न केला, मात्र काही तांत्रिक अडचण आली. त्यानंतर रनवे 11 वर पुन्हा लँडिंगचा प्रयत्न केला आणि त्याचवेळी हा दुर्दैवी अपघात घडला.’
Ajit Pawar Death: अजितचे विमान कसे, कुठे कोसळले? बारामतीत पोहोचताच शरद पवारांनी घेतली माहिती
विजय कुमार सिंह पुढे म्हणाले, ‘विमानाची देखभाल अत्यंत चांगल्या पद्धतीने करण्यात आली होती. आमच्या माहितीनुसार विमानात कोणताही तांत्रिक बिघाड नव्हता. कोणतीही यांत्रिक अडचण आढळलेली नाही.
ते पुढे म्हणाले, ‘प्राथमिकदृष्ट्या असे दिसते की, वैमानिकाला रनवे स्पष्टपणे दिसत नव्हता. दृश्यता कमी होती. आम्ही सध्या मृतांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी उभे राहण्याचा प्रयत्न करत आहोत. ही आमच्यासाठी खूप मोठी शोकांतिका आहे.’ 2023 मध्ये झालेल्या अपघाताबाबत बोलताना ते म्हणाले, ‘तो अपघात मुंबई विमानतळावर झाला होता. त्यावेळीही पाऊस होता आणि दृश्यता कमी होती. लँडिंगनंतर विमान रनवेवरून घसरले होते. ती वेगळी घटना होती.’
विमान चालवणारे मुख्य वैमानिक कॅप्टन सुमित कपूर यांच्याकडे १६ हजारांहून अधिक उड्डाण तासांचा अनुभव होता. त्यांनी यापूर्वी मोठ्या कंपन्यांमध्ये काम केले होते. को-पायलट कॅप्टन शांभवी पाठक यांच्याकडे सुमारे 1500 तासांचा अनुभव होता. सिंह यांनी दोघांनाही खूप चांगले वैमानिक आणि उत्तम माणसे असल्याचे सांगितले. कंपनी मृतांच्या कुटुंबीयांना मदत करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी व्यक्त केले.
‘कॅप्टन सुमित कपूर माझे खूप चांगले मित्र होते; ते मला भावासारखे होते. त्यांचा मुलगाही आमच्याच कंपनीत पायलट आहे. कॅप्टन शांभवी पाठक माझ्यासाठी मुलीसारख्या होत्या. दोघेही उत्कृष्ट वैमानिक आणि अत्यंत चांगले माणसे होती,’ अशी प्रतिक्रिया विजय कुमार सिंह यांनी दिली. दरम्यान, या अपघाताबाबत नागरी विमान वाहतूक यंत्रणांकडून चौकशी सुरू असून, ब्लॅक बॉक्स व तांत्रिक तपासणीनंतरच अपघाताचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.




