Friday, May 3, 2024
Homeमहाराष्ट्र‘निसर्ग’बाधितांना जास्तीत जास्त मदत करणार – अजित पवार

‘निसर्ग’बाधितांना जास्तीत जास्त मदत करणार – अजित पवार

सार्वमत

नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश
पुणे (प्रतिनिधी) – निसर्ग चक्रीवादळामुळे बाधित झालेल्या नागरिकांना लवकरात लवकर मदत देता यावी यासाठी नुकसानीचे पंचनामे तातडीने करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत. पुण्यासह राज्यातील सर्व बधितांना जास्तीत जास्त मदत केली जाईल, असा विश्वास उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज दिला.

- Advertisement -

मनिसर्गफ चक्रीवादळामुळे पुणे जिल्ह्यात झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत ते बोलत होते. पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित या बैठकीला कामगार मंत्री दिलीप वळसे-पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे, खासदार श्रीरंग बारणे, खासदार डॉ. अमोल कोल्हे, आमदार दिलीप मोहिते-पाटील, आमदार अशोक पवार, आमदार सुनील शेळके, आमदार अतुल बेनके, आमदार संग्राम थोपटे, आमदार सुनील टिंगरे आदी लोकप्रतिनिधी व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उपस्थित लोकप्रतिनिधींनी केलेल्या सूचना ऐकून घेतल्या व मंत्रीमंडळ बैठकीत याबाबत योग्य निर्णय घेतला जाईल, असे सांगितले. पाणीपुरवठा योजनांचा वीजपुरवठा तात्काळ सुरू करणे, वीजेचे खांब उभे करणे, गरज भासल्यास दुसर्‍या जिल्ह्यातील मनुष्यबळाची मदत घेणे, आदिवासी-बिगर आदिवासी भागातील लोकांना तातडीने मदत देणे, घर, शाळा, अंगणवाडी दुरूस्तीची कामे तातडीने सुरू करणे, नुकसानीचे पंचनामे तात्काळ पूर्ण करून अहवाल सादर करणे आदी सूचना त्यांनी केल्या. दि. 13 मे 2015 च्या शासन निर्णयानुसार देण्यात येणार्‍या मदतीच्या रकमेत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात येणार असल्याचेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आदिवासी भागातील बाळहिरड्याचे प्रचंड नुकसान झाल्याचे सांगितले. आदिवासी भागातील हे प्रमुख उत्पन्नाचे साधन आहे. बाळहिरड्याचे प्रति किलो 240 रूपये इतका भाव आहे. या आदिवासी भागातील शेतकर्‍यांना वेगळा मापदंड लावून नुकसान भरपाई देण्याचा विचार व्हावा. आदिवासी भागात घरांचेही मोठे नुकसान झाले, त्यासाठी तातडीने मदत व्हावी, असेही ते म्हणाले.

जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी संगणकीय सादरीकरण केले. निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे सुरू करण्यात आले आहेत. नजरअंदाज अहवालानुसार बाधित झालेल्या गावांची संख्या 371 असून शेतकर्‍यांची संख्या 28 हजार 496 आहे. एकूण बाधित क्षेत्र सुमारे 7 हजार 874 हेक्टर आहे. पॉलीहाऊस व शेडनेटचे नुकसान झाले असून हे 100.53 हेक्टर इतके बाधित क्षेत्र आहे. 87 गावातील 317 पॉलीहाऊस व शेडनेट चे नुकसान झाल्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या