बीड | Beed
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्या प्रकरणामुळे सध्या बीडमधील राजकीय आणि सामाजिक वातावरण चांगलेच तापले आहे. या पार्श्वभूमीवर आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे बीडच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर पहिल्यांदाच जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले आहेत. त्यांच्या उपस्थितीत आज (गुरुवारी) बीडमध्ये जिल्हा नियोजन समितीच्या बैठक पार पडणार आहे. मात्र, बैठकीआधीच अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात पक्षाच्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा दिला.
यावेळी अजित पवार म्हणाले की,” बीड जिल्ह्यात (Beed District) कोणी कुठल्या गोष्टीसाठी जबाबदार असेल, जर कोणी वेडेवाकडे प्रकार करणार असेल किंवा कोणी विकासकामांच्या आड येत असेल तर मी ते खपवून घेणार नाही. वेळ पडल्यास अशा लोकांवर मकोका लावायलाही मागेपुढे पाहणार नाही. जिथे तथ्य असेल तिथे कारवाई केली जाईल, पण जिथे तथ्य नसेल त्यावेळी कारवाई केली जाणार नाही. तसेच यापुढे बीडमध्ये गुन्हेगारी प्रवृत्ती आणि कृत्यांना थारा दिला जाणार नाही”, असे म्हणत त्यांनी एकप्रकारे नेत्यांनी पोसलेल्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना सज्जड दम दिला.
पुढे ते म्हणाले की, “मी राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते आणि कार्यकर्त्यांना सांगतो की, आपले चारित्र्य आणि प्रतिमा स्वच्छ ठेवा. चुकीच्या प्रवृत्तीची लोकं आपल्या आजुबाजूला राहता कामा नये, याची काळजी घ्या. यापुढे पोलिसांच्या कारवाईत राजकीय हस्तक्षेप चालणार नाही. मी कोणावरही अन्याय होऊ देणार नाही. हे नव्याचे नऊ दिवस समजू नका. काहीजण मला इकडे आल्यावर भलामोठा हार, बुके किंवा पांडुरंगाची मूर्ती देतात. पण या लोकांना साधुसंतांचे विचारही लक्षात घेतले पाहिजेत. दादा आला तर आता काही काळजी नाही, असा विचार करत असाल तर तो मनातून काढून टाका.मी तुमच्या जवळचा असलो तरी चुकीचे वागू नका”, असेही अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना खडसावून सांगितले.
तसेच “मी बीडचे पालकमंत्रीपद (Guardianship) स्वीकारत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सांगितले होते, याठिकाणी चांगले अधिकारी पाहिजे, मी आता बीडमधील अधिकाऱ्यांकडे बघणार आहे. काही अधिकारी बरीच वर्षे याठिकाणी आहेत. मी त्यामध्ये दुरुस्ती करणार आहे. मी काम करताना भेदभाव करत नाही. बीड कष्टकरी समाज मोठ्याप्रमाणावर राहतो. मी काम करताना जातीपाती नात्यागोत्याचा विचार केलेला नाही. बीड जिल्ह्यात जातीय सलोखा कायम राहिला पाहिजे. जिल्ह्यात चुकीच्या गोष्टी पूर्वापार चालत आल्या असतील तर त्याला आळा घातला पाहिजे. मी बीडमधील काही लोकांचे रिव्हॉल्व्हर हवेत उंचावून, कंबरेला लावून फिरतानाचे रील सोशल मीडियावर पाहिले आहेत. पुन्हा अशा गोष्टी दिसल्या तर खपवून घेतले जाणार नाही, संबंधितांचे लायसन्स रद्द केले जातील. मी सगळ्यांना सारखा नियम लावणार. बीड जिल्ह्यात बदल झाला पाहिजे, तो मला आणि नागरिकांना जाणवला पाहिजे”, असेही अजित पवार म्हणाले.