अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
देशभरात गाजत असलेल्या नीट (नॅशनल एलिजिबिलिटी कम एंट्रन्स टेस्ट) पेपरफुटी प्रकरणाचे धागेदोरे आता अहिल्यानगर जिल्ह्यापर्यंत पोहोचले आहेत. सीबीआयच्या पथकाने नाशिक येथील शुभम खैरनार या संशयिताला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्या चौकशीत राहुरी तालुक्यातील एका तरूणाचे नाव समोर आले. त्यानुसार बुधवारी (13 मे) पहाटे सीबीआयच्या पथकाने स्थानिक पोलिसांच्या मदतीने धनंजय निवृत्ती लोखंडे (वय 26, रा. मालुंजे, ता. राहुरी) याला चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्याची बुधवारी दिवसभर येथील पोलीस अधीक्षक कार्यालयात चौकशी करण्यात आली.
नीट पेपरफुटी प्रकरणी धनंजय लोखंडे याचा सहभाग असल्याचे समोर आले. सीबीआयच्या मुंबई युनिटने त्याचा शोध सुरू केला असता तो अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यात असल्याची माहिती पथकाला मिळाली. पथकाने जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्याशी संपर्क साधून स्थानिक मदत मागितली होती. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखा (एलसीबी) आणि राहुरी पोलिसांचे दोन पथक सीबीआय पथकाच्या मदतीसाठी देण्यात आले. या पथकाने देवळाली प्रवरा-बाभळेश्वर परिसरातून धनंजय लोखंडे याला ताब्यात घेतले. त्याच्यासोबत आणखी दोन जण होते. मात्र, प्राथमिक चौकशीत त्यांचा या प्रकरणाशी थेट संबंध नसल्याचे सूत्रांनी सांगितले. मात्र, पथकाने त्या दोघांनाही ताब्यात घेतले होते.
ताब्यात घेतल्यानंतर धनंजय लोखंडे याला थेट पोलीस अधीक्षक कार्यालयात आणण्यात आले. बुधवारी दिवसभर सीबीआयच्या अधिकार्यांनी त्याची कसून चौकशी केली. या प्रकरणात काही लाख रूपयांमध्ये नीट परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेचा सौदा झाल्याची माहिती तपासातून पुढे येत असल्याने सीबीआयने विविध राज्यांमध्ये तपासाची व्याप्ती वाढवली आहे. देशभरात सुरू असलेल्या तपास मोहिमेअंतर्गत सीबीआयने अनेक शहरांमध्ये छापे टाकून संशयितांना ताब्यात घेतले असून, आता या प्रकरणाची धग अहिल्यानगर जिल्ह्यापर्यंत पोहोचल्याने खळबळ उडाली आहे.
धनंजय लोखंडे कोण?
धनंजय निवृत्ती लोखंडे हा मालुंजा, महाडुक सेंटर येथील रहिवासी आहे. त्याने बंगळुरू येथील प्रसन्ना आयुर्वेद मेडिकल कॉलेजमध्ये ‘बीएएमएस’ शिक्षणासाठी प्रवेश घेतला होता. मात्र, द्वितीय वर्षात काही विषयांत अनुत्तीर्ण झाल्याने त्याने नंतर शिक्षण अर्धवट सोडले असल्याची माहिती आहे. गेल्या काही दिवसांपासून तो वाघोली (पुणे) येथे वास्तवास होता. तेथे तो वैद्यकीय क्षेत्रात प्रवेश घेऊ इच्छिणार्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत होता. त्याचे वडील खासगी शिक्षण संस्थेत लिपिक, तर आई गृहिणी असून त्याचा भाऊ डॉक्टर असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
विद्यार्थ्यांना करायचा मार्गदर्शन
धनंजय लोखंडे मुळचा राहुरी तालुक्यातील असला तरी तो वाघोली (जि. पुणे) येथे वैद्यकीय शिक्षण घेऊ इच्छिणार्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत होता. नीट परीक्षेशी संबंधित काही व्यक्तींशी त्याचे संपर्क असल्याचा संशय तपास यंत्रणेला आहे. नाशिकमधील संशयिताच्या चौकशीतून मिळालेल्या माहितीनंतरच सीबीआयने लोखंडे याला ताब्यात घेतले. त्याच्या चौकशीतून धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.
लोखंडेला दिल्लीला नेणार
दरम्यान, पेपर फुटी प्रकरणी दिल्लीला दाखल असलेल्या गुन्ह्यात धनंजय लोखंडे याला हस्तांतरीत केले जाणार आहे. सीबीआयचे मुंबई विभागाचे पोलीस उपअधीक्षक सत्य प्रकाश यांनी लोखंडे याला दिल्लीच्या गुन्ह्यात हस्तांतरीत करण्यासाठी दोन दिवसांच्या प्रवासासाठी कोठडीची मागणी अहिल्यानगर येथील न्यायालयात केली होती. न्यायालयाने ही मागणी मान्य केली आहे. या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन सीबीआयचे उपअधीक्षक सत्य प्रकाश यांनी त्याला रात्री आठ वाजता अहिल्यानगर येथील जिल्हा सत्र न्यायाधीश ए. एम. पाटील यांच्यासमोर हजर केले. जिल्हा सरकारी वकील सतीश पाटील, अतिरिक्त सरकारी वकील मंगेश दिवाणे आणि सीबीआयचे वकील सोनी यांनी नीट परीक्षेच्या पेपर फुटीचे गांभीर्याकडे लक्ष वेधले. नीट पेपरफुटी प्रकरणी नवी दिल्लीच्या गुन्ह्यात लोखंडे याला हजर करायचे आहे. अहिल्यानगर ते नवी दिल्ली प्रवासासाठी दोन दिवस लागत आहेत. त्यामुळे दोन दिवसांचे हस्तांतर कोठडी देण्याची मागणी केली. न्यायालयाने ही मागणी मान्य केली.
लोखंडेने दिलेल्या महितीवरून पुण्याची महिला गजाआड
पुणे |प्रतिनिधी| Pune
नीट 2026 परीक्षा पेपर फुटी प्रकरणाने संपूर्ण देशात खळबळ उडवून दिली असताना या प्रकरणाचे धागेदोरे आता पुण्यापर्यंत पोहोचले आहेत. पुणे पोलीस आणि सीबीआयने केलेल्या संयुक्त कारवाईत एका 46 वषीय महिलेसह चौघांना ताब्यात घेतल्याने या रॅकेटचे मोठे जाळे उघड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या प्रकरणात सीबीआयकडून मिळालेल्या माहितीनुसार वेगवगेळी पथके तयार करून तांत्रिक माहिती आधारे तपास सुरू करण्यात आला. पुण्यातील सुखसागरनगर परिसरातून मनीषा संजय वाघमारे (46 ) या महिलेला ताब्यात घेण्यात आले आहे.
मनीषा वाघमारे या व्यवसायाने ब्युटीशियन असून त्यांचे स्वत:चे ब्युटी पार्लर आहे. तर त्यांचे पती डेंटिस्ट असून त्यांचे क्लिनिक आहे. राहुरी येथून अटक करण्यात आलेला या प्रकरणातील मुख्य एजंट धनंजय लोखंडे याच्या चौकशीतून मनीषाचे नाव समोर आले होते. मनीषा ही विद्यार्थ्यांना हेरून त्यांना मुख्य एजंट धनंजय लोखंडेपर्यंत पोहोचवण्याचे काम करत असल्याचा संशय तपास यंत्रणांना आहे. बुधवारी पहाटे करण्यात आलेल्या या अत्यंत गोपनीय कारवाईत पोलिसांनी मनीषाच्या घरून तिचा मोबाईल फोन आणि लॅपटॉप जप्त केला आहे. या तांत्रिक पुराव्यांच्या प्राथमिक तपासणीत धनंजय लोखंडे आणि मनीषा वाघमारे यांच्यात अनेक संशयास्पद व्हॉट्सअॅप कॉल्स आणि टेलिग्राम मेसेजेसची देवाणघेवाण झाल्याचे रेकॉर्ड पोलिसांच्या हाती लागले आहेत.
या रॅकेटमधील महत्त्वाचा दुवा असलेला धनंजय लोखंडे (वय 26 ) हा मूळचा राहुरी तालुक्मयातील माहेगावचा रहिवासी असून, तो गेल्या चार वर्षांपासून पुण्याच्या वाघोली परिसरात वास्तव्यास होता. त्याने दोन वर्षांपूर्वी मंगळूरमधून बीएएमएसचे शिक्षण पूर्ण केले असून, मेडिकल प्रॅक्टिसच्या नावाखाली तो अॅडमिशन कन्सल्टिंगचे काम करत असल्याचे तपासात उघड झाले आहे. नाशिकच्या शुभम खैरनार याने दिलेल्या जबाबामुळे धनंजयचे नाव समोर आले होते आणि सीबीआयने त्याला राहुरीतून अटक केली होती. तर जुन्नर येथील आयुर्वेदिक डॉक्टर (बीएएमएस) ओंकार शिंगोटे याच्या या प्रकरणातील सहभागाबाबतही तपास करण्यात येत आहे.
पालक व विद्यार्थ्यांना दाखवायचे आमिष
पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे संशयित प्रामुख्याने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर करून वैद्यकीय शिक्षणासाठी इच्छुक असलेल्या विद्यार्थ्यांशी आणि त्यांच्या पालकांशी संपर्क साधत होते. आमच्याकडे नीट परीक्षेचा पेपर असून, तो आम्ही तुम्हाला विकू शकतो, असे आमिष हे आरोपी परीक्षार्थींना दाखवत असत. सोशल मीडियाच्या माध्यमातून या टोळीने अनेक विद्यार्थ्यांचे जाळे विणले होते.
मनीषा वाघमारेच्या खात्यावर दहा लाख रूपये
तपासादरम्यान मनीषा वाघमारे यांच्यासंदर्भात अत्यंत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. नीट परीक्षेच्या प्रक्रियेदरम्यान वाघमारे यांच्याकडे तब्बल 21 वेगवेगळ्या बँक खात्यांतून 10 लाख ऊपये जमा झाल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे. ही रक्कम पेपर विक्रीसाठी किंवा त्यासंबंधित व्यवहारांसाठी आगाऊ म्हणून घेण्यात आल्याचा संशय आहे. या 21 खात्यांचा मालक कोण आहे आणि हा पैसा नेमका कोठून आला, याचा तपास आता सीबीआय करत आहे. मागील तीन वर्षापासून वाघमारे ही आरोपींच्या संपर्कात असल्याचे स्पष्ट झाले आहे अशी माहिती गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त विवेक मासाळ यांनी दिली.
आणखी काही डॉक्टरांच्या सहभागाची शक्यता
पुणे पोलिसांची गुन्हे शाखा सध्या यातील आर्थिक व्यवहारांची बारकाईने चौकशी करत आहे. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता मनीषा वाघमारेला पुढील तपासासाठी सीबीआयच्या ताब्यात दिले जाण्याची शक्मयता आहे. पश्चिम महाराष्ट्रात या पेपरफुटीचे मोठे जाळे पसरले असून, यामध्ये आणखी काही डॉक्टर आणि मोठ्या एजंटांचा समावेश असण्याची दाट शक्मयता तपास यंत्रणांनी व्यक्त केली आहे. सीबीआयच्या पुढील चौकशीत या घोटाळ्याचे ङ्गमास्टरमाईंडफ आणि इतर ‘बड्या माशांची’ नावे समोर येण्याची शक्यता असल्याने लाखो विद्यार्थ्यांचे आणि पालकांचे लक्ष या तपासाकडे लागले आहे.





