शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi
स्वतःला दैवी शक्तीचा अवतार भासवून महिलांचे लैंगिक शोषण आणि सर्वसामान्यांची फसवणूक करणार्या भोंदू अशोक खरात याच्या कृत्यांविरुद्ध विशेष तपास पथकाने आतापर्यंतची सर्वात मोठी तांत्रिक कारवाई केली आहे. सायबर गुन्हेगारीचा आधार घेत पीडितांची बदनामी करणार्या 13 हजार 175 सोशल मीडिया लिंक्स एसआयटीने शोधून काढून त्या हटवल्या आहेत. तसेच आक्षेपार्ह मजकूर सातत्याने प्रसारित करणारी 451 फेसबुक व इंस्टाग्राम खाती कायमस्वरूपी बंद करण्यात आली असून या कारवाईमुळे खळबळ उडाली आहे.
20 मार्च 2026 पासून या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी 24 पोलीस अधिकारी व अंमलदारांचे एसआयटी पथक अहोरात्र काम करत आहे. तपासादरम्यान खरातने ईशानेश्वर मंदिर परिसरात हातचलाखीने चमत्कार दाखवून, मृत्यूची भीती घालून आणि खडे-चिंचुक्यांच्या नावाखाली लोकांकडून कोट्यवधी रुपये उकळल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी आतापर्यंत 105 हून अधिक साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आले असून मौखिक, भौतिक आणि इलेक्ट्रॉनिक पुराव्यांचा डोंगर पोलिसांनी उभा केला आहे.
अशोक खरातवर नाशिक आणि नगर जिल्ह्यात एकूण 17 गुन्हे दाखल आहेत. त्यापैकी 8 गुन्हे हे महिलांवरील लैंगिक अत्याचाराचे आहेत. कायद्याच्या चौकटीत राहून लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यांमध्ये 60 दिवसांच्या आत दोषारोपपत्र दाखल करणे अनिवार्य असल्याने एसआयटीने दोन मुख्य गुन्ह्यांचे दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले आहे. उर्वरित 9 गुन्ह्यांमध्येही लवकरच दोषारोपपत्र दाखल होणार आहे.
खरातने पीडित महिलांचे आक्षेपार्ह व्हिडिओ प्रसारित करून त्यांना धमकावण्याचा प्रयत्न केला होता. मात्र महाराष्ट्र सायबर पथकाच्या मदतीने एसआयटीने डिजिटल प्लॅटफॉर्मवरील हा सर्व कचरा साफ केला आहे. आक्षेपार्ह व्हिडिओ पसरवणार्या दोन गुन्हेगारांवर स्वतंत्र गुन्हेही दाखल करण्यात आले आहेत. आरोपी खरात सध्या न्यायालयीन कोठडीत असून पोलीस अधिकचे पुरावे गोळा करत आहेत. लवकरच न्यायालयात पुरवणी दोषारोपपत्र दाखल केले जाईल, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.




