अकोले |प्रतिनिधी| Akole
पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे (SP Somnath Gharge) यांच्या विशेष पोलीस पथकाने रविवारी (दि.13) कोतूळ (ता.अकोले) येथील गुटखा तस्करांवर छापेमारी (Gutkha Raid) करुन 1 कोटी 1 लाख 74 हजार 750 रुपयांचा मुद्देमाल जप्त (Seized) करत बारा जणांना ताब्यात घेतले आहे. यामुळे अवैध धंदे चालकांत एकच खळबळ उडाली आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यातील अवैध धंद्यांचा बिमोड करण्यासाठी पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी विशेष पोलीस पथकाची स्थापना केली आहे. या पथकाचे प्रमुख परिविक्षाधीन पोलीस उपाधीक्षक संतोष खाडे यांनी धडक कारवायांचा सिलसिला सुरूच ठेवला आहे. कोतूळ येथे केळी रस्त्याच्या कडेला शेडमध्ये अवैधरित्या गुटखा (Gutkha) साठवून ठेवला असल्याची गोपनीय माहिती त्यांना मिळाली. त्यानुसार विशेष पथकाने रविवारी छापेमारी (Raid) करुन भागीदारीमध्ये गुटख्याची साठवणूक करुन विक्री करणारे शोएब शाविद काजी व शाहिद हुसेन लतीफ पटेल या दोघांना ताब्यात घेतले.
या कारवाईत त्यांच्यासह इतर दहा जणांनाही ताब्यात घेतले असून, गुटखा (Gutkha), वाहने आणि रोख रक्कम असा एकूण 1 कोटी 1 लाख 74 हजार 750 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी अकोले पोलिसांत रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. या धडक कारवाईने अवैध धंदे चालकांत एकच खळबळ उडाली आहे.




