Saturday, May 18, 2024
Homeनगरनिळवंडेचे पाणी पेटले! पोलीस व आंदोलकांत संघर्ष, परिसरात तणाव

निळवंडेचे पाणी पेटले! पोलीस व आंदोलकांत संघर्ष, परिसरात तणाव

अकोले (प्रतिनिधी)

निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्यातून पाणी सोडण्यास विरोध असणाऱ्या कार्यकर्त्यांना धरणाकडे जात असताना पोलिसांनी रोखले. मात्र पोलिसांनी लावलेला अडथळा तोडून आंदोलक धरणाकडे गेले. पाणी सोडण्यावरून धरण स्थळावर मोठा संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे. यावेळी निळवंडे धरण परिसरातील वातावरण तणावपूर्ण बनले आहे. उजव्या कालव्याचे काम पूर्ण करून त्यात पाणी सोडा, तो पर्यंत डाव्या कालव्यातून पाणी सोडू देण्यास या आंदोलकांचा विरोध आहे.

- Advertisement -

राज्याचे महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत आज सकाळी निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्यातून पाणी सोडण्यात येणार आहे. दरम्यान उजव्या कालव्याचे काम पूर्ण करून त्यात पाणी सोडा, तोपर्यंत डाव्या कालव्यातून पाणी सोडू देण्यास धामणगाव आवारी व अन्य परिसरातील 8 गावांचे शेतकऱ्यांनी आज पालकमंत्री विखे पाटील यांच्या निळवंडे धरणावरील कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर आंदोलनाचा इशारा काल शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन दिला होता. त्यानुसार आज सकाळी आंदोलनकर्त्यांनी निळवंडे धरणाकडे झेप घेतली. या पार्श्वभूमीवर निळवंडे धरण स्थळ परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. माकप व शेतकरी नेते डॉ अजित नवले, अगस्ति करखान्याच्या व्हा. चेअरमन सुनीताताई भांगरे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मिनानाथ पांडे, जिल्हा बँकेचे संचालक अमित भांगरे, शिवसेनेचे उप जिल्हाप्रमुख महेशराव नवले, तालुकाप्रमुख डॉ मनोज मोरे, प्रदिप हासे, सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांच्यासह अमृतसागर दूध संघाचे संचालक आप्पासाहेब आवारी, अगस्ति पतसंस्थेचे माजी अध्यक्ष बाळासाहेब भोर, ज्येष्ठ नेते माधवराव भोर,नामदेव जाधव, धामणगाव आवारी चे उपसरपंच गणेश पापळ, विकास बंगाळ यांचेसह प्रमुख कार्यकर्ते व आंदोलकांना पोलिसांनी धरण स्थळाकडे कूच करत असतांना रोखले. यावेळी पोलीस व आंदोलनकर्ते यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली. शेवटी आक्रमक झालेले आंदोलनकर्त्यांनी पोलिसांनी लावलेले गेट व पोलिसांचे कडे तोडून आंदोलन कर्ते डाव्या कालव्याकडे निघाले. पाणी आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं, कोण म्हणत देत नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही. अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. या आंदोलनात महिला आंदोलकांचाही समावेश आहे.

यावेळी आंदोलनाचे नेते डॉ अजित नवले यांनी पोलिसांकडून विखे पाटील यांचे आगमनाच्या पार्श्वभूमीवर आंदोलकांना झालेला रोखण्याचा प्रयत्न हा संपूर्ण अकोले तालुक्यातील शेतकऱ्यांचा अपमान आहे. पाणी नेण्यास आमचा कोणताही विरोध नाही पण आमच्या मागण्या मान्य झाल्या पाहिजेत असा आग्रह त्यांनी पत्रकारांशी बोलतांना धरला. पोलिसांच्या आंदोलन कर्त्यांना रोखण्याच्या केलेल्या प्रयत्ना बद्दल डॉ नवले यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली . दरम्यान पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्याच्या प्रवेशद्वाराजवळ आगमन झाले.यावेळी माजी आमदार वैभवराव पिचड यांचेसह सर्वपक्षीय कार्यकर्ते उपस्थित आहेत.आंदोलन कर्त्यांशी ना. विखे पाटील यांची चर्चा सुरू आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या