Monday, May 6, 2024
Homeनगरसलग तिसर्‍या दिवशीही अकोलेत मुसळधार पाऊस

सलग तिसर्‍या दिवशीही अकोलेत मुसळधार पाऊस

अकोले |प्रतिनिधी| Akole

अकोले शहर व परिसरात सलग तिसर्‍या दिवशी दुपारी मुसळधार पाऊस झाला. या पावसाने काही वेळातच रस्त्यावर, शेतात पाणीच पाणी झाले. यंदा पावसाला उशिरा सुरुवात झाली. त्यामुळे शेतकर्‍यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले होते.रविवारी भंडारदरा पाणलोट क्षेत्रातही मान्सून सक्रिय झाला आहे.

- Advertisement -

शुक्रवारी व शनिवारी दुपारच्या सुमारास अकोले शहर व परिसरात विविध ठिकाणी जोरदार पावसास सुरुवात झाली. सुमारे अर्धा तास धो धो पाऊस बरसला. काही वेळेतच शहरातील गटारी ओसंडून वाहू लागल्या. रस्त्यावर, शेतात, मैदानावर या जोरदार पावसामुळे पाणीच पाणी साठले होते. या जोरदार पावसामुळे वातावरणातील उकाडा काहीसा कमी होऊन आल्हाददायक गारवा निर्माण झाला आहे.

तर जोरदार पावसामुळे छोटया-मोठ्या व्यापार्‍यांबरोबर शेतकर्‍यांची तारांबळ उडाल्याची चित्र पाहावयास मिळत आहे.शेतकर्‍यांनी कांदा व शेतातील पिकांचे नुकसान होऊ नये म्हणून प्लॅस्टिक कागद खरेदीसाठी गर्दी केली होती. अखेर नेहमीच्या तुलनेत उशिरा का होईना वरूणराजा बरसु लागल्याने लाभक्षेत्रात आनंदाचे वातावरण पसरले आहे.

आढळा परिसरात आर्द्राची जोरदार हजेरी

वीरगाव येथील वार्ताहराने दिलेल्या माहितीनुसार रोहिणी आणि मृगाच्या हुलकावणीनंतर अकोले तालुक्यातील आढळेत आर्द्राची जोरदार हजेरी सुरू झाली. पावसाने समाधानकारक पायाभरणी केल्याने खरिपाच्या उभारणीसाठी शेतशिवार आता तयार होणार असल्याने शेतकर्‍यांच्या चेहर्‍यावर समाधान आहे. शनिवारी वीरगाव परिसरात आर्द्रा नक्षत्राच्या जोरदार सरी कोसळल्या. साधारण तासभर हा पाऊस सुरू होता. अंदाजे 35-40 मिलीमीटर पावसाची नोंद पर्जन्यमापकावर झाली असावी. बाजरी, सोयाबीन, मका या खरीप पिकांसाठी काही दिवसांतच मशागत सुरू होईल. समशेरपूर परिसरातही टोमॅटो, वाटाणा, फरसवाल या नगदी भाजीपाला पिकांची लागवड सुरू आहे. सुरू झालेल्या पावसाने आढळा धरणातही आवक लवकर सुरू होईल ही अपेक्षा शेतकर्‍यांना आहे. खरीप उभा राहणार असल्याने सध्यातरी समाधानकारक वातावरण आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या