Wednesday, January 7, 2026
HomeनगरAkole : अकोले ते संगमनेर रस्त्यावर मोठमोठे खड्डे

Akole : अकोले ते संगमनेर रस्त्यावर मोठमोठे खड्डे

गतिरोधकही ठरत आहे वाहनचालकांसाठी डोकेदुखी

अकोले |प्रतिनिधी| Akole

कोल्हार-घोटी राज्य मार्गावरील संगमनेर ते अकोले रस्त्यावर ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणावर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. हे खड्डे छोट्या-मोठ्या अपघाताला निमंत्रण ठरू पाहत आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाने संबंधित ठेकेदाराकडून तातडीने या रस्त्यावरील खड्ड्यांची दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे. विशेष म्हणजे सुमारे 22 किलोमीटर अंतरात तब्बल 25 ठिकाणी अनधिकृतपणे गतिरोधक टाकल्याने वाहनचालकांच्या दृष्टीने या रस्त्यावरून प्रवास करणे म्हणजे तारेवरची कसरत ठरत आहे.

- Advertisement -

गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या बारी ते संगमनेरपर्यंतच्या रस्त्याचे रुंदीकरण व डांबरीकरणाचे काम तीन वर्षापूर्वी पूर्ण करण्यात आले. रस्ता चांगला झाला आणि रस्त्यावरून वाहने सुसाट धावू लागली.काही बेदरकार वाहन चालविणार्‍यांमुळे रस्त्यावर वाढत्या संख्येने अपघात झाले. त्यात काहींना जीवही गमवावे लागले. या रस्त्यावर ज्याठिकाणी हे अपघात झाले त्या संबंधित गावच्या ग्रामस्थांनी त्या-त्या ठिकाणी गतिरोधक टाकून घेतले. मात्र दिवसेंदिवस या गतिरोधकांची संख्या वाढत चालली आहे. शिवाय हे गतिरोधक टाकताना त्याविषयीच्या नियमांचे पालन झाल्याचे दिसत नाही. गतिरोधकांच्या दोन्ही बाजूंना पांढरे पट्टे दिसत नसल्याने या रस्त्यावर गतिरोधकांमुळेच अनेक छोटे-मोठे अपघात ही नित्याचीच बाब ठरू लागली आहे.

YouTube video player

रस्ता चांगला झाल्यामुळे प्रवास सुखकर झाला. पण वाढत्या गतिरोधकांमुळे त्यात व्यत्यय येऊ लागला आहे. जेथे शाळा, महाविद्यालये आहेत किंवा जेथे अपघातांची शक्यता आहे तेथे गतिरोधक आवश्यकच आहे. पण जेथे गरज नाही तेथे नियमांचे कोणतेही पालन न करता ते टाकण्यात आले आहेत.त्यामुळे प्रवास करताना नागरिकांसह वाहनचालकांना पुन्हा हे गतिरोधक त्रासदायक ठरू लागले आहे. या गतिरोधकांवर कोणतेही पांढरे पट्टे न मारल्याने अपघाताचे प्रमाण वाढू लागले आहे. वेळेचा व इंधनाचा अपव्यय वाढू लागला आहे. नवीन वाहनचालक असल्यास त्याच्या हे गतिरोधक लक्षात येत नसल्याने अपघाताचे प्रमाण वाढलेले दिसत आहे. त्यामुळे छोठे-मोठे अपघात होत आहे. राज्यमार्गावर गतिरोधक टाकू नये असा न्यायालयाचा आदेश असताना अकोले – संगमनेर या रस्त्यावर या नियमाची पायमल्ली झाली आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाचा गलथानपणा याला कारणीभूत आहे. या रस्त्यावरील फारच आवश्यकता असलेले गतिरोधक ठेऊन अन्य कमी करावेत, जेथे आहेत ते लक्षात येण्यासाठी त्यावर पांढरे पट्टे मारावेत, उंची कमी करावी, मुख्य रस्त्याबरोबरच जोडरस्त्यांवर टाकून मुख्य रस्त्यावरील गतिरोधकांची संख्या मर्यादित करावी, आवश्यक तेथे वेग मर्यादेचे फलक लावावेत अशी मागणी अकोले नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष शरद नवले यांनी केली आहे.

येथे आहेत गतिरोधक…
नवलेवाडी फाटा, कॉलेज परिसर, सार्वजनिक बांधकाम कार्यालय समोर, गाजरीचा ओढा, सुगाव बुद्रुक फाटा, मनोहरपूर, कळस बुद्रुक, कळस खुर्द, बहिरोबा मंदिर-पिंपळगाव कोंझिरा, कोकणेवाडी, धांदरफळ, श्रमिक पेट्रोल पंपासमोर, राजापूर, चिखली, मंगळापूर आदी ठिकाणच्या फाट्यावर पोहोच रत्याच्या दुतर्फा मोठे गतिरोधक टाकण्यात आले आहे.

ताज्या बातम्या

AMC Election : पैसे वाटपाचा संशय, विनानंबर दुचाकीतून लाखाची रोकड पकडली

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांना पैसे वाटप केले जात असल्याच्या संशयावरून एका पक्षाच्या उमेदवारांच्या कार्यकर्त्यांनी दोन दुचाकी अडवून त्या तोफखाना पोलिसांच्या ताब्यात दिल्या....