चिंचखेड । वार्ताहर
जपानमधील क्योटो शहरात आयोजित सहाव्या आशियाई कॅनोइंग अँड कयाकिंग मॅरेथॉन चॅम्पियनशिप स्पर्धेत नाशिक जिल्ह्यातील चिंचखेड येथील युवा खेळाडू अक्षय शांताराम लिलके याने कॅनोइंग प्रकारात उत्कृष्ट कामगिरी करत कांस्यपदक पटकावले. या आंतरराष्ट्रीय यशामुळे चिंचखेडसह संपूर्ण नाशिक जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
अक्षयने स्पर्धेत २२ मिनिटे ४५ सेकंद ४३ मायक्रोसेकंद अशी वेळ नोंदवत कांस्यपदकावर आपले नाव कोरले. अत्यंत प्रतिष्ठेच्या या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत त्याने दाखविलेली जिद्द, कठोर परिश्रम आणि सातत्यपूर्ण सराव यांचे हे फलित मानले जात आहे.
अक्षय शांताराम लिलके हा मविप्र समाजाच्या पिंपळगाव बसवंत येथील कर्मवीर काकासाहेब वाघ महाविद्यालयाचा राष्ट्रीय सुवर्णपदक विजेता नौकानयनपटू आहे. ग्रामीण भागातून क्रीडा क्षेत्रात वाटचाल करत त्याने राष्ट्रीय स्तरावर आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली असून, आता आंतरराष्ट्रीय स्तरावर कांस्यपदक मिळवत त्याने आपल्या क्रीडा कारकिर्दीत आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे.
या स्पर्धेसाठी अक्षयच्या संघासोबत केटीएचएम महाविद्यालयाचे क्रीडा संचालक व उत्कृष्ट क्रीडा प्रशिक्षक प्रा. हेमंत पाटील हे प्रशिक्षक म्हणून सहभागी झाले होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अक्षयने स्पर्धेची सखोल तयारी केली. योग्य प्रशिक्षण, नियोजनबद्ध सराव आणि सातत्यपूर्ण मेहनतीमुळे त्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी करता आली. जपान मधील स्पर्धेत कांस्यपदकाची कमाई करून मायदेशी परतल्यानंतर अक्षय लिलके आणि उत्कृष्ट क्रीडा शिक्षक प्रा.हेमंत पाटील यांचा भव्य सत्कार करण्यात आला.




