Tuesday, September 17, 2024
Homeनगरदारूबंदी आणि उत्पादन शुल्कच्या छाप्यानंतरही उक्कलगावात दारूचा वास

दारूबंदी आणि उत्पादन शुल्कच्या छाप्यानंतरही उक्कलगावात दारूचा वास

‘त्या’ विषारी गोळ्यांचे गौडबंगाल कायम अन् कारवाईही नाही

श्रीरामपूर | प्रतिनिधी| Shrirampur

- Advertisement -

उक्कलगावातील ज्ञानेश्वर मोढे नामक व्यक्तीचा मागील महिन्यात मृत्यू झाला. सदरचा मृत्यू विषारी दारूचे सेवन केल्याने झाला असून त्याला गावातील अवैध दारूअड्डे जबाबदार असल्याचा ठपका ठेवत गावातील महिलांनी दारूअड्ड्यांची जाळपोळ करून ते उद्ध्वस्त केले होते. सदर घटना घडल्यानंतर गावातील वातावरण तणावपूर्ण होऊन दोन दिवसांत विशेष ग्रामसभा बोलावून गावात संपूर्ण दारूबंदीचा ठराव करू, असे आश्वासन दिल्यानंतर मयत मोढे यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले होते. त्या पार्श्वभूमीवर ग्रामसभाही पार पडली पण ग्रामसभेत झालेल्या ठरावाचे पुढे काय झाले?, दारू खरच बंद झाली की आपल्याला नादी लावले? अशा एक ना अनेक प्रश्नांनी ग्रामस्थांच्या मनात कहर केला असून ‘चोरी-चोरी छुपके-छुपके’ होत असलेल्या दारु विक्रीने त्याला पुष्टी मिळत आहे.

प्रभारी ग्रामसेवक श्री. कांदळकर यांनी चार्ज स्विकारला असला तरी ते सह्यांचा अधिकार घ्यायला तयार नाहीत. आपल्याला लवकरच मेमो मिळेल या आशेवर ते थांबून असून कायदेशीरदृष्ट्या उक्कलगावच्या कोणत्याही प्रश्नात अडकायला ते तयार नाहीत. त्यामुळेच दारूबंदीचा ठराव ग्रामविकास अधिकार्‍यांनी पाठवला का? याबाबत ग्रामस्थांमध्ये दबक्या आवाजात चर्चा सुरू असून दारूबंदीविषयी ग्रामस्थांपुढे जे चित्र स्पष्ट व्हायला हवे होते ते अद्यापही झालेले नाही. गावात सात ते आठ जणांचे मृत्यू झाले, महिलांनी दारूअड्डे उद्ध्वस्त केले, दारूबंदी आणि उत्पादन शुल्क खात्याचा छापा पडला पण छाप्यानंतरही दारू विक्रेते काही घडलचं नाही अशा अविर्भावात वावरत असून सदर दारू विक्रेत्यांवर ठोस कारवाई व्हावी अशी ग्रामस्थांची अपेक्षा होती.

मात्र गुन्हेगारांना शिक्षा करणे हे न्यायालयाचे काम असून आम्ही फक्त मुद्देमाल ताब्यात घेऊन गुन्हा सिध्द करू शकतो. ते काम आम्ही केले असल्याचे सांगून दारूबंदी व उत्पादन शुल्क खात्याच्या अधिकार्‍यांनी हात झटकले आहेत. उलट ग्रामस्थांमधून ग्रामरक्षक दल स्थापन करून तुम्हीच अवैध धंद्यांवर लक्ष ठेवा. आमच्यापेक्षा स्थानिक वचक महत्त्वाचा असून आम्ही तुम्हाला त्याची नियमावली देतो, अशी बोळवण करून ते निघून गेले. दरम्यान, या दारू विक्रेत्यांना किती दंड झाला? झाला असल्यास तो त्यांनी भरला का? आणि दंड भरल्यानंतर ते कायमस्वरुपी हे अवैध धंदे बंद करणार का? या सार्‍या प्रश्नांची उत्तरे सध्यातरी नकारात्मक येतात. वास्तविक पाहाता विषारी गोळ्यांपासून बनवलेल्या दारू सेवनाने उक्कलगावात मृत्यूकांड घडले ही वस्तुस्थिती असली तरी अन्न व औषध भेसळ प्रतिबंधक पथकाने या प्रकाराकडे कानाडोळा कसा केला? हाही प्रश्न उपस्थित होत आहे.

सद्यस्थितीत महिलांच्या आक्रमक पवित्र्यामुळे उक्कलगावात दारूची तिव्रता कमी असली तरी याकडे डोळेझाक झाल्यास ही दारू हळूहळू पुन्हा आपले पाय पसरू शकते. हा आजवरचा अनुभव आहे. दारू सुरू झाल्यास आम्हाला ताबडतोब फोन करा, आम्ही दुसर्‍या मिनिटाला हजर राहतो, असे बेलापूर औट पोस्टच्या पोलिसांनी सांगितले असले तरी अद्याप तरी असा एखादा योध्दा याबाबतीत पुढे आल्याचे ऐकिवात नाही.

- Advertisment -

ताज्या बातम्या