Saturday, June 13, 2026
HomeनगरAMC : 28 कोटींची भर घालून मनपा बजेट 1738 कोटींवर

AMC : 28 कोटींची भर घालून मनपा बजेट 1738 कोटींवर

स्थायी समितीकडून वाढ

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

महापालिकेचे आयुक्त यशवंत डांगे यांनी यंदा सादर केलेल्या 1710 कोटींच्या बजेटची फुगीर बजेट म्हणून संभावना करणार्‍या स्थायी समितीने या बजेटमध्ये आता आणखी 28 कोटींची भर घालून ते 1738 कोटींचे केले आहे. मनपाच्या उत्पन्न स्त्रोतांतून अधिकाधिक वसुली करून त्यातून विविध योजनांसाठी खर्च सुचवले आहेत. हे बजेट बुधवारी (25 मार्च) स्थायी समितीचे सभापती सुभाष लोंढे यांनी महापौर ज्योती गाडे यांना सादर केले. त्यानंतर सभा तहकूब करण्यात आली. आता या बजेटवर महासभेत शुक्रवारपासून (27 मार्च) चर्चा केली जाणार आहे व त्यानंतर अंतिम केलेले बजेट अंमलबजावणीसाठी प्रशासनाकडे सुपूर्द केले जाणार आहे.

- Advertisement -

मनपाचे यंदाचे बजेट आयुक्त डांगे यांनी तयार करून स्थायी समितीकडे सादर केले होते. समितीने यावर चर्चा करून त्यांच्या शिफारशींसह ते महासभेला सादर केले आहे. सामान्य नागरिकांच्या गरजेनुसार आवश्यक सुधारणा करून यंदाचे बजेट अधिक लोकाभिमुख करण्याचा प्रयत्न समितीने केल्याचा दावा सभापती लोंढे यांनी मनोगतात व्यक्त केला. मालमत्ता हस्तांतरण फी, अनधिकृत बांधकाम नियमित करणे, मालमत्ता नाव नोंदणी फी, गुंठेवारी विकास नियमित करणे, मनपाच्या शाळा भाडेपासून उत्पन्न, रस्ता फोडणे-जोडणे वसुली व बांधकाम, अतिरिक्त चटई क्षेत्र व पाणीपुरवठा मीटरव्दारे उत्पन्न यावर स्थायी समितीने वाढ सुचवली आहे.

तसेच वाढलेली पाणीपट्टी 25 टक्के कमी करणे आणि भाडेकरू दराप्रमाणे आकारलेली घरपट्टी रद्द करून महापालिकेने ठरवलेल्या दराप्रमाणे आकारणी केली जावी, अशा केलेल्या दोन ठरावांसह खर्चाच्या शिफारशीही समितीने केल्या आहेत. विधान परिषदेचे माजी आमदार (स्व.) अरूण जगताप यांच्या जयंतीनिमित्त सभागृहात त्यांना अभिवादन करण्यात आले. वाडिया पार्क येथे स्व.जगताप यांचा पूर्णाकृती पुतळा उभारावा व शहरात चार ते पाच एकरमध्ये स्व.जगताप यांच्या नावाने उद्यान उभारावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

कुत्र्यांचा प्रश्न गाजला
बजेट महासभा उशिरा सुरू झाल्याने नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली. मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याचा विषय गाजला. माजी महापौर सुरेखा कदम यांनी मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची गरज मांडली. नगरसेवकांनी फोन केला तरच ठेकेदार कुत्री पकडणार का? मागच्या सभेतही विषय झाला, प्रशासन काहीच दखल घेत नाही. सर्वसामान्यांना खर्चही परवडत नाही. ठोस कारवाई होतच नाही, ठेकेदार संस्था रोज काय काम करते? संपूर्ण शहरात मोकाट कुत्र्यांचा प्रश्न आहे, असा दावा त्यांनी केला. महिला व बालकल्याण समितीच्या सभापती दीपाली बारस्कर यांनीही या समस्येला दुजोरा देताना प्रशासनाला पत्र दिल्याचे स्पष्ट केले. यावर आयुक्त डांगे यांनी, आवश्यक कार्यवाहीची ग्वाही दिली.

ताज्या बातम्या

लेफ्टनंट जनरल धीरज सेठ भारताचे नवे लष्करप्रमुख; ३० जूनपासून स्वीकारणार पदभार

0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था New Delhi केंद्र सरकारने सध्या उपलष्करप्रमुख (Vice Chief of Army Staff) म्हणून कार्यरत असलेल्या लेफ्टनंट जनरल धीरज सेठ यांची भारताच्या पुढील...