अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
शहरातील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी कुत्रे पकडून व त्यांचे निर्बीजीकरण करण्यासाठी प्रत्येक प्रभाग समिती कार्यालयाच्या हद्दीसाठी एक वाहन व कर्मचारी अशा चार प्रभागात समिती कार्यालयात पथके नियुक्त करून कारवाई केली जाईल. तसेच, शहरात कुत्र्यांसाठी फिडिंग पॉईंट तयार करण्यासाठी सर्वेक्षण करण्यात येईल. हॉटेल व स्लॉटर हाऊसमधील वेस्ट रस्त्यावर किंवा कचरा कुंडीवर येणार नाही, यासाठी घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत उपाययोजना केल्या जातील, अशी माहिती आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी दिली. प्राण्यांसह नागरिकांची सुरक्षाही महत्त्वाची आहे. कोणत्याही परिस्थितीत नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य राहील, असेही डांगे यांनी स्पष्ट केले.
मागील काही दिवसांत अहिल्यानगर शहरात काही नागरिकांवर मोकाट कुत्र्यांनी हल्ला केल्याच्या घटना घडल्या. या पार्श्वभूमीवर नागरिक व प्राणी मित्राच्या सूचना जाणून घेत, कायमस्वरूपी उपाययोजना करण्याच्या दृष्टीने चर्चा करण्यासाठी डांगे यांनी महानगरपालिकेत बैठक बोलावली होती. यावेळी वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. सतीश राजूरकर, माजी नगरसेवक निखिल वारे, मनोज कोतकर, विनीत पाऊलबुध्दे, बाळासाहेब पवार, प्रकाश भागानगरे, काका शेळके, कोंडवाडा विभाग प्रमुख दुष्यंत बत्तुल, प्राणी मित्र संघटनेचे सुमित वर्मा आदींसह इतर प्रतिनिधी व नागरिक उपस्थित होते. या प्रतिनिधींनी काही सूचना मांडल्या. निर्बिजीकरण शस्त्रक्रियेबाबत काही शंका उपस्थित केल्या. माजी नगरसेवकांनी मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, एखादी दुर्घटना घडल्यास प्राणी मित्र संघटना जबाबदारी घेणार का, असा जाब विचारला.
डांगे म्हणाले की, महानगरपालिकेने पिंपळगाव माळवी येथे 100 ते 150 कुत्र्यांना ठेवता येईल एवढ्या क्षमतेचे शेल्टर हाऊस उभारले आहे.
शहरात सुमारे 25 हजार कुत्री असून मागील वर्षभरात 5 हजार 41 शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. ठेकेदार संस्थेला कुत्री पकडण्यासाठी केवळ 10.59 लाखांचे देयक दिले आहे. अद्याप 29 लाखांची देयके थकीत आहेत. कुत्र्यांच्या निर्बीजीकरणाच्या शस्त्रक्रिया इन कॅमेरा केल्या जात आहेत. त्यामुळे केलेले आरोप मोघम आहेत. प्राण्यांच्या सुरक्षेबाबत प्राणी मित्र संघटना काम करत आहेत. मात्र, शहरातील नागरिकांवर होणारे कुत्र्यांचे हल्ले दुर्लक्षित करता येणार नाहीत. हिंस्त्र व पिसाळलेल्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी व त्यांच्यावर उपचार करण्यासाठी स्वतंत्र उपाययोजा केल्या जातील. फिडिंग पॉईंटसाठी प्राणी मित्र संघटनांनी शहरात सर्वेक्षण करून कुठे कुठे पॉईंट करता येतील, त्याबाबत पाहणी करून अहवाल द्यावा. या संदर्भात पुन्हा महिनाभराने एकत्रित बैठक घेऊन काही उपाययोजना केल्या जातील, असे त्यांनी सांगितले.
हल्ल्यात जखमींना उपचारासाठी मदत
मोकाट कुत्र्यांसाठी शेल्टर हाऊस व निर्बीजीकरण शस्त्रक्रियेसाठी काही कंपन्यांच्या सीएसआरमधून मदत उपलब्ध करून घेण्यासाठी प्रयत्न केले जातील. मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्यांना उपचारासाठी 10 हजारांपर्यंत आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेण्यात येईल. मोकाट कुत्र्यांबाबत काम करण्यासाठी आम्ही काम करू, असे संघटना सांगतात. प्रत्यक्षात काम करायची वेळ आल्यावर, आम्ही संपर्क केल्यावर प्रतिसाद मिळत नाही, ही वस्तुस्थिती आहे. येथे प्राण्यांच्या विरोधात कुणीही नाही, सर्व प्राणी प्रेमीच आहेत. मात्र, मागील काही दिवसातील घटनेचे गांभीर्य पाहता नागरिकांची सुरक्षा हेच महानगरपालिकेचे प्राधान्य असेल, असे डांगे यांनी स्पष्ट केले.




