अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
अहिल्यानगर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी (मंगळवार) शहराच्या राजकारणात मोठी उलथापालथ पाहायला मिळाली. सोमवारी महायुतीतून शिवसेना (शिंदे गट) बाहेर पडल्याने पक्षांतर, बंडखोरी आणि ऐनवेळी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या घडामोडींनी निवडणूक अधिकच रंगतदार बनली. आता या निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) युती, शिवसेना (शिंदे गट) आणि महाविकास आघाडी (काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गट) अशी तिरंगी लढत होणार आहे.
दरम्यान, भाजप-राष्ट्रवादी युतीकडून 66, शिवसेना (शिंदे गट) कडून 54 तर महाविकास आघाडीकडून 68 जागांवर उमेदवार देण्यात आले आहेत. बुधवारी उमेदवारी अर्जांची छाननी होणार असून 1 व 2 जानेवारी रोजी माघारीची मुदत आहे. माघारीनंतर अंतिम राजकीय चित्र स्पष्ट होणार आहे. भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये इच्छुकांची संख्या मोठी असल्याने अनेकांना उमेदवारी नाकारण्यात आली. भाजपने 32 तर राष्ट्रवादी काँग्रेसने 34 जागांवर उमेदवार दिले आहेत. तिकीट मिळेल या आशेवर अनेक दिवसांपासून तयारी केलेल्या अनेक इच्छुकांना उमेदवारी न मिळाल्याने नाराजी पसरली. याच नाराज इच्छुकांपैकी अनेकांनी शेवटच्या दिवशी शिवसेना (शिंदे गट) मध्ये प्रवेश करून उमेदवारी अर्ज दाखल केले.
दुसरीकडे शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने देखील काही पदाधिकार्यांना उमेदवारी नाकारल्याने त्यांनी ऐनवेळी इतर पक्षांकडून उमेदवारी घेत अर्ज दाखल केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी तसेच आमदार संग्राम जगताप यांचे समर्थक असलेल्या काही इच्छुकांनी शिंदे गटात प्रवेश करून शेवटच्या क्षणी अर्ज भरल्याने राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात आहे. काही माजी नगरसेवकांनी स्वतः उमेदवारी अर्ज न भरता नव्या उमेदवारांना संधी देत निवडणुकीतून माघार घेतली. भाजप व राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून संधी न मिळाल्याने इतर पक्षांकडून उमेदवारी मिळविण्यासाठी अनेक इच्छुकांनी प्रयत्न केले.
मात्र, उमेदवारी अर्ज भरण्यासाठी एकच दिवस उपलब्ध असल्याने अनेकांचे अर्ज अपक्ष म्हणून दाखल झाले असून त्यांच्या माघारीसाठी प्रयत्न सुरू असल्याचे समजते. महाविकास आघाडीतून मनसे बाहेर पडत स्वबळावर आठ जागांवर निवडणूक लढवणार आहे. महाविकास आघाडी 17 प्रभागांत एकत्रितपणे निवडणूक लढवत असून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) व शिवसेना (उबाठा) यांनी अधिकृत एबी फॉर्म वितरित केल्याची माहितीही त्यांनी दिली. केडगाव परिसरात कोतकर समर्थकांनी अपक्ष अर्ज दाखल केल्याने कोतकर गटाचे राजकीय विसर्जन झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
दरम्यान, भाजप शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते यांनी मंगळवारी सायंकाळी आयोजित पत्रकार परिषदेत बंडखोरांवर पक्षशिस्त भंगाची कारवाई करण्याचा इशारा दिला. भाजप-राष्ट्रवादी युतीत भाजप 32 तर राष्ट्रवादी 34 जागा लढवणार असून काही जागांवर उमेदवार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.




