अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
महापालिकेच्या निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) युतीने झेंडा फडकावला. या दोन्ही पक्षाने 52 जागा जिंकल्या असून यात राष्ट्रवादी अजित पवार गटाकडे सर्वाधिक 27 जागा आहेत. तर भाजपने 25 जागा जिंकल्या आहेत. महायुतीमधील घटक पक्ष असणार्या शिवसेना (शिंदे गट) स्वतंत्र लढत 10 जागांवर विजय मिळवत अस्तित्व सिद्ध केले आहे. दरम्यान, महाविकास आघाडीतील काँग्रेसला दोन जागांवर, तर शिवसेना (ठाकरे गट) ला एका जागेवर समाधान मानावे लागले. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) ला खातेही उघडता आले नाही. दुसरीकडे एमआयएम पक्षाने दोन जागा जिंकल्या असून बसपाला एक जागा मिळाली आहे.
यंदाच्या महापालिका निवडणुकीत 68 नगरसेवकांच्या जागांपैकी 5 जागा बिनविरोध निवडून आल्या होत्या. उर्वरित 63 जागांसाठी 283 उमेदवार रिंगणात होते. गुरूवारी (15 जानेवारी) शहरातील 345 मतदान केंद्रांवर 65 टक्के मतदान झाले. त्याची मतमोजणी शुक्रवारी एमआयडीसीतील वखार महामंडळाच्या गोदामात पार पडली. प्रथम टपाली मतदानाची मोजणी करण्यात आली, त्यानंतर प्रभागनिहाय इव्हीएम मशीनवरील मतदानाची मोजणी सुरू झाली. दुपारी साडेबारा वाजता प्रभाग क्रमांक सातचा अधिकृत निकाल जाहीर करण्यात आला. त्यानंतर तासाभरात टप्प्याटप्प्याने प्रत्येक प्रभागाचा निकाल जाहीर होत गेला. मात्र, मतमोजणी केंद्रात उपस्थित असलेल्या उमेदवारांच्या प्रतिनिधींमार्फत प्रत्येक प्रभागाचा फेरीनिहाय निकाल आधीच बाहेर येत होता. त्यामुळे शहरात उत्सुकता शिगेला पोहोचली होती. आपला उमेदवार आघाडीवर असल्याचे कळताच समर्थकांनी मतमोजणी केंद्राच्या परिसरात गर्दी करण्यास सुरूवात केली. काही वेळातच अधिकृत निकाल जाहीर होताच विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी गुलाल उधळत जल्लोष केला.
अहिल्यानगर महापालिकेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर महायुती होणार की नाही, यावर अनेक बैठका आणि चर्चा झाल्या. मात्र, अर्ज भरण्यासाठी अवघा एक दिवस बाकी असताना शिंदे सेना महायुतीतून बाहेर पडली आणि त्यांनी स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला. अर्ज दाखल केल्यानंतर माघारीच्या वेळी भाजपच्या सोन्याबाई शिंदे, करण कराळे आणि पुष्पा बोरूडे हे तिघे बिनविरोध निवडून आले, तर राष्ट्रवादीचे कुमार वाकळे आणि प्रकाश भागानगरे यांनी बिनविरोध विजय मिळवला. युतीतील पाच उमेदवार बिनविरोध निवडून आल्याने सत्तेत येण्याचे इरादे अधिक ठाम झाले होते. युतीमध्ये राष्ट्रवादीने सर्वाधिक 32 जागा लढविल्या होत्या, त्यापैकी 27 जागांवर विजय मिळवला.
भाजपने 29 जागा लढविल्या असून 25 जागा जिंकल्या. दुसरीकडे, ऐनवेळी स्वतंत्र लढलेल्या शिंदे सेनेने 39 उमेदवार रिंगणात उतरवले होते. त्यांचे 10 उमेदवार विजयी झाले. मात्र, शिवसेना जिल्हाप्रमुख अनिल शिंदे, शहरप्रमुख सचिन जाधव व त्यांच्या पत्नी अश्विनी जाधव यांना पराभवाचा सामना करावा लागला. तसेच केडगावातून दिलीप सातपुते यांचे चिरंजीव ओंकार सातपुते यांचा देखील पराभव झाला. महाविकास आघाडीचे नेतृत्व खा. निलेश लंके यांनी केले होते. विशेष म्हणजे, त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) ने 29 जागा लढविल्या होत्या, मात्र त्यांचा एकही उमेदवार विजयी झाला नाही. त्यामुळे नगरकरांनी खा. लंके यांच्यासह त्यांच्या पक्षाला स्पष्ट नकार दिल्याचे चित्र समोर आले आहे. काँग्रेसने 11 जागा लढवून मुकुंदनगर भागात दोन जागांवर विजय मिळवला. उध्दव ठाकरे यांच्या शिवसेनेने 11 जागा लढविल्या; मात्र केवळ एका जागेवर यश मिळवता आले. ठाकरे सेनेचे ज्येष्ठ नेते शशिकांत गाडे यांचे चिरंजीव योगिराज गाडे यांनी प्रभाग क्रमांक तीनमधून विजय मिळवला असून त्यांनी भाजपच्या उषा नलावडे यांचा पराभव केला.
पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी अहिल्यानगर महापालिका निवडणुकीत विशेष लक्ष घातले होते. डॉ. सुजय विखे पाटील यांनी देखील ठाण मांडले होते. भाजपने तीन जागांवर बिनविरोध विजय मिळवला. प्रभाग क्रमांक एकमध्ये मैत्रीपूर्ण लढतीत राष्ट्रवादीच्या ज्योती ढवण यांचा भाजपच्या शारदा ढवण यांनी पराभव केला. विखे घराण्याशी एकनिष्ठ असलेले निखिल वारे हे प्रभाग क्रमांक दोनमधून विजयी झाले. भाजपचे सरचिटणीस महेंद्र गंधे यांचे चिरंजीव ऋग्वेद गंधे यांनी प्रभाग क्रमांक तीनमधून विजय मिळवला. ऐनवेळी भाजपचे धनंजय जाधव यांनी प्रभाग बदलून प्रभाग क्रमांक पाचमधून उमेदवारी केली आणि तेथे विजय मिळवला.
प्रभाग क्रमांक सातमध्ये भाजपच्या पुष्पा बोरूडे बिनविरोध निवडून आल्या होत्या. त्या प्रभागातील उर्वरित तीन जागांवरही भाजपचे उमेदवार विजयी झाले असून त्यामध्ये माजी महापौर बाबासाहेब वाकळे यांचा समावेश आहे. प्रभाग क्रमांक दहामध्ये शिंदे गटाचे शहरप्रमुख सचिन जाधव यांचा पराभव झाला असून भाजपचे सागर मुर्तडकर विजयी झाले आहेत. प्रभाग क्रमांक पंधरामध्ये मतदानाच्या आदल्या दिवशी मारहाणीची घटना घडली होती. त्या ठिकाणी भाजपचे दत्तात्रय गाडळकर यांनी शिंदे सेनेच्या सुवर्णा जाधव यांचा पराभव केला. केडगावमध्ये शिवसेनेतील विजय पठारे व ज्ञानेश्वर येवले यांना निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये प्रवेश देऊन उमेदवारी देण्यात आली होती. त्या दोघांनीही विजय मिळवून केडगावमध्ये भाजपचे वर्चस्व सिध्द केले आहे.
दुसरीकडे, आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीने जोरदार मुसंडी मारली असून ‘सब कुछ संग्राम जगताप’ असे चित्र दिसून आले. राष्ट्रवादीने 32 जागा लढविल्या होत्या. त्यापैकी दोन जागा बिनविरोध निवडून आल्या होत्या, तर 25 जागांवर पक्षाचे उमेदवार विजयी झाले. प्रभाग क्रमांक एकमधून माजी नगरसेवक संपत बारस्कर व डॉ. सागर बोरूडे, प्रभाग क्रमांक दोनमधून माजी नगरसेवक महेश तवले व संध्या पवार विजयी झाले. प्रभाग क्रमांक 13 मध्ये राष्ट्रवादीचे चार उमेदवार निवडून आले असून त्यामध्ये माजी नगरसेवक अविनाश घुले यांचा समावेश आहे. प्रभाग क्रमांक 14 मधून माजी महापौर गणेश भोसले विजयी झाले. केडगावमध्येही राष्ट्रवादीचे दोन उमेदवार निवडून आले आहेत.
महाविकास आघाडीने महायुतीच्या जागा वाटपाकडे लक्ष ठेवत शेवटपर्यंत जागा वाटप जाहीर केले नाही. मात्र त्यांनी आघाडी करत सर्व जागांवर उमेदवार दिले. सर्वांधिक जागा राष्ट्रवादी शरद पवार गटाने लढविल्या मात्र त्यांच्या प्रचारासाठी फक्त खा. नीलेश लंके सक्रिय दिसले. एकत्रित राष्ट्रवादी असताना आमदार जगताप यांच्या नेतृत्वाखाली शहरात पक्षाचे वर्चस्व होते. मात्र राष्ट्रवादीत फुट पडल्यानंतर आ. जगताप यांनी अजित पवार यांना साथ देण्याचा निर्णय घेतला. शरदचंद्र पवार पक्षाकडून खा. लंके यांच्यासह माजी आमदार दादाभाऊ कळमकर, त्यांचे पुतणे अभिषेक कळमकर असतानाही त्यांना एकही जागा मिळविता आली नाही हे विशेष.
ठाकरे सेनेने किरण काळे यांना शहर प्रमुख केल्याने त्यांच्यावर अनेकांची नाराजी होती. तिकीटावरूनही नाराजी व्यक्त करत ऐनवेळी पक्षाचे गिरीष जाधव राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून लढले. तसेच माजी आमदार स्व. अनिल राठोड यांचे चिरंजीव विक्रम राठोड यांनी देखील आरोप करत शिंदे सेनेत प्रवेश केला. ठाकरे सेनाला आपले वर्चस्व दाखविता आले नाही. एक जागेवर विजय मिळवित त्यांनी आपली पत राखली. दुसरीकडे काँग्रेस पक्षाने 11 जागा लढवून दोन जागेवर विजयी मिळविला. त्यांनी मुकुंदनगर भागात लक्ष केंद्रीत केले होते. त्यांच्या प्रचारासाठी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासह खासदार इमरान प्रतापगडी आले होते. तेथे काँग्रेस पक्षाने दोन जागेवर विजय मिळविला आहे. युती व शिंदे सेनेने तेथे उमेवार दिला नसल्याने त्यांची लढत एमआयएम पक्षाची होती. एमआयएम पक्षाने दोन जागेवर विजय मिळविला आहे. मात्र माजी नगरसेवक समद खान यांचा पराभव झाला आहे.
महापालिकेतील 32 नवे चेहरे
रोशनी त्रिंबके (अजितदादा राष्ट्रवादी), गौरी बोरकर (अजितदादा राष्ट्रवादी), ऋग्वेद गंधे (भाजप), शहेनाज शेख (एमआयएम), शहाबाज सय्यद (एमआयएम), मीनाज खान (काँग्रेस) व शम्स खान (काँग्रेस), काजल भोसले (अजितदादा राष्ट्रवादी), गंभीर हरप्रित कौर (अजितदादा राष्ट्रवादी), मोहीत पंजाबी (अजितदादा राष्ट्रवादी), सुनीता कुलकर्णी (भाजप), करण कराळे (भाजप), वर्षा सानप (भाजप), आशाबाई कातोरे (भाजप), नवनाथ कातोरे (भाजप), रुपाली दातरंगे (शिंदे सेना), वैशाली नळकांडे (शिंदेसेना), मयुरी जाधव (भाजप), सागर मुर्तडकर (भाजप), शीतल ढोणे (भाजप), आशा डागवाले (अजितदादा राष्ट्रवादी), सुनीता गेनप्पा (शिंदेसेना), सुरेश बनसोडे (अजितदादा राष्ट्रवादी), सुजाता पडोळे (अजितदादा राष्ट्रवादी), अनिता शेटिया (अजितदादा राष्ट्रवादी), पौर्णिमा गव्हाळे (अजितदादा राष्ट्रवादी), दत्ता गाडळकर (भाजप), सुजय मोहिते (भाजप) वर्षा काकडे (अजितदादा राष्ट्रवादी), मयुर बांगरे (अजितदादा राष्ट्रवादी), अश्विनी लोंढे (अजितदादा राष्ट्रवादी) व कमल कोतकर (भाजप).
प्रमुख पराभूत…
नगरपालिका व महापालिका मिळून तब्बल नऊ वेळा नगरसेवक झालेले व आता दहाव्यांदा यश मिळवून नगरसेवकपदाचा सुवर्ण महोत्सव साजरा करण्याची आशा बाळगणारे नज्जू पहेलवान उर्फ नजीर अहमद शेख पराभूत झाले. याशिवाय शिंदे सेनेचे जिल्हा प्रमुख अनिल शिंदे, शिंदे सेनेचे संपर्क प्रमुख सचिन जाधव व त्यांच्या पत्नी अश्विनी जाधव, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष दीप चव्हाण, भाजपचे माजी खासदार (स्व.) दिलीप गांधी यांच्या सूनबाई दीप्ती सुवेंद्र गांधी, शिंदे सेनेचे नेते व माजी नगरसेवक दिलीप सातपुते यांचे चिरंजीव ओंकार सातपुते, समद खान, मनपा स्थायी समितीच्या माजी सभापती सुवर्णा जाधव यांचा प्रमुख पराभुतांमध्ये समावेश आहे.
नगरचे नवे कारभारी
प्रभाग क्रमांक 01 : सागर बोरूडे, दीपाली बारस्कर, संपत बारस्कर (अजित पवार राष्ट्रवादी), शारदा ढवण (भाजप).
प्रभाग क्रमांक 02 : निखील वारे, रोशनी त्र्यंबके (भाजप), संध्या पवार, महेश तवले (अजित पवार राष्ट्रवादी)
प्रभाग क्रमांक 03 : योगीराज गाडे (शिवसेना ठाकरे पक्ष), गौरी बोरकर, ज्योती गाडे (अजित पवार राष्ट्रवादी), ऋग्वेद गंधे (भाजप)
प्रभाग क्रमांक 04 : खान मीनाज, शम्स खान (काँग्रेस), शहेबाज शेख, सय्यद शहाबाज (एमआयएम)
प्रभाग क्रमांक 05 : धनंजय जाधव (भाजप), हरप्रीतकौर गंभीर, मोहीत पंजाबी, काजल भोसले (अजित पवार राष्ट्रवादी)
प्रभाग क्रमांक 06 : मनोज दुल्लम (भाजप), सोनाबाई शिंदे (भाजप-बिनविरोध), करण कराळे (भाजप-बिनविरोध) आणि सुनीता कुलकर्णी (भाजप)
प्रभाग क्रमांक 07 : पुष्पा बोरूडे (भाजप, बिनविरोध), बाबासाहेब वाकळे, वंदना साठे, वर्षा सानप (भाजप)
प्रभाग क्रमांक 08 : कुमारसिंह वाकळे (अजित पवार राष्ट्रवादी-बिनविरोध), सुनीता भिंगारदिवे (अजित पवार राष्ट्रवादी), नवनाथ कातोरे (शिवसेना शिंदे गट), आशा कातोरे (भाजप)
प्रभाग क्रमांक 09 : संजय शेंडगे, रूपाली दातरंगे, वैशाली नळकांडे (शिवसेना शिंदे गट), महेश लोंढे (भाजप)
प्रभाग क्रमांक 10 : श्रीपाद छिंदम (बसपा), सागर मुर्तडकर, मुयरी जाधव, शीतल ढोणे (भाजप)
प्रभाग क्रमांक 11 : गणेश कवडे, सुनीता गेनप्पा (शिवसेना शिंदे गट), आशा डागवाले (अजित पवार राष्ट्रवादी), सुभाष लोंढे (भाजप)
प्रभाग क्रमांक 12 : चंद्रशेखर उर्फ बाळासाहेब बोराटे, दत्ता कावरे, मंगल लोखंडे, सुरेखा कदम (शिवसेना शिंदे गट)
प्रभाग क्रमांक 13 : अविनाश घुले, सुरेश बनसोडे, सुजाता पडोळे, अनिता शेटिया (अजित पवार राष्ट्रवादी)
प्रभाग क्रमांक 14 : प्रकाश भागानगरे (अजित पवार राष्ट्रवादी- बिनविरोध), सुनीता फुलसौंदर, मीना चोपडा, गणेश भोसले (अजित पवार राष्ट्रवादी)
प्रभाग क्रमांक 15 : सुजय मोहिते, दत्ता गाडळकर (भाजप), गीतांजली काळे, पौर्णिमा गव्हाळे (अजित पवार राष्ट्रवादी)
प्रभाग क्रमांक 16 : अमोल उर्फ ज्ञानेश्वर येवले, विजय पठारे (भाजप), सुनीता कांबळे, वर्षा काकडे (अजित पवार राष्ट्रवादी).
प्रभाग क्रमांक 17 : मनोज कोतकर, कमल कोतकर (भाजप), अश्विनी लोंढे, मयूर बांगरे (अजित पवार राष्ट्रवादी).




