Thursday, April 9, 2026
HomeनगरAMC : महापालिका निवडणुकीची तयारी पूर्ण; सहा निवडणूक अधिकार्‍यांची नियुक्ती

AMC : महापालिका निवडणुकीची तयारी पूर्ण; सहा निवडणूक अधिकार्‍यांची नियुक्ती

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

महापालिका निवडणुकीसाठी विभागीय आयुक्तांनी शनिवारी सहा निवडणूक निर्णय अधिकारी व सहा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकार्‍यांची नियुक्ती केली. निवडणुकीच्या घोषणेची ही पूर्वतयारी असून आता निवडणूक कार्यक्रम कधी जाहीर होणार याची प्रतीक्षा लागली आहे.सोमवारनंतर कोणत्याही क्षणी निवडणुकीचा बिगुल वाजणार, असेच स्पष्ट होत आहे.
दरम्यान, महापालिका अधिकार्‍यांनी निवडणूक कार्यालयांच्या ठिकाणांची पाहणी केली.

- Advertisement -

आज सोमवारी दि. 15 डिसेंबर रोजी अंतिम मतदारयादीही प्रसिद्ध केली जाईल. महापालिकेची निवडणूक घेण्यासाठी आयोगाकडून तयारी सुरू केली आहे. त्यातून निवडणूक निर्णय अधिकारी नेमण्याचे पत्र विभागीय आयुक्तांना दिले होते.त्याप्रमाणे सहा अधिकार्‍यांची व त्यांच्या सहाय्यक अधिकार्‍यांच्या नियुक्त्या केल्या आहेत. निवडणूक निर्णय अधिकार्‍यांमध्ये जिल्हा पुरवठा अधिकारी, जिल्हा पुनर्वसन अधिकारी उपजिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तर सहाय्यक अधिकार्‍यामध्ये तहसीलदार यांचा समावेश आहे.

निवडणूक निर्णय अधिकारी सहा असून त्यात जिल्हा पुरवठा अधिकारी हेमा बडे, जिल्हा पुनर्वसन अधिकारी वर्षा पवार, उपजिल्हाधिकारी अतुल चोरमारे, उपजिल्हाधिकारी सुभाष दळवी, उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील, उपजिल्हाधिकारी सायली सोळंके यांची तर सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तहसीलदार नागेश गायकवाड, तहसीलदार शोभा पुजारी, तहसीलदार योगेश शिंदे, तहसीलदार शीतल साळवे, तहसीलदार हिमालय घोरपडे व तहसीलदार संजय शिंदे यांची विभागीय आयुक्तांनी नियुक्ती केली आहे. चार सदस्यांच्या प्रत्येकी तीन प्रभागांसाठी एक निवडणूक अधिकारी व सहाय्यक अधिकारी नियुक्त करण्यात आला आहे.

महापालिकेचे 17 प्रभाग असून 68 सदस्य संख्या आहे. प्रारूप मतदार यादीतील हरकतींवर निर्णय घेऊन सोमवारी अंतिम यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. तसेच मतदान केंद्रेही निश्चित करण्यात येणार आहेत. त्यांच्या निवडणूक कार्यालयांची ठिकाणे निश्चित करण्यासाठी पाहणी केली. कामकाज सुरळीत करण्यासाठी तेथील मूलभूत सुविधा, जागेची उपलब्धता, आवश्यक तांत्रिक बाबी, सुरक्षेच्या आवश्यक उपाययोजनांचा आढावा घेतला. तिथे कार्यालये स्थापन करण्यासाठी आवश्यक जागा, सोयीसुविधा, व्यवस्था करण्याबाबत संबंधित अधिकार्‍यांना सूचना दिल्या आहेत.

महापालिका निवडणुकीची तयारी पूर्ण झाली असून प्रशासकीय पातळीवर आता निवडणूक कार्यक्रम कधी जाहीर होणार याची प्रतीक्षा लागली आहे. अर्थात राजकीय पक्षांनी देखील आपल्या स्तरावर निवडणुकीचे नियोजन सुरू केले आहे. पक्षीयपातळी नेते व प्रमुख कार्यकर्त्यांची बैठका सुरू झाल्या आहेत. या बैठकांमधून प्रभागनिहाय उमेदवारांची चाचपणी करून कोणाला उमेदवारी द्यायची हे निश्चित करण्याचे काम सुरू आहे.

ताज्या बातम्या

Shirdi : भोंदू खरातच्या ताब्यासाठी शिर्डी पोलिसांची न्यायालयात धाव

0
शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi शिर्डी आणि सिन्नर येथील पतसंस्थांमध्ये शेकडो बोगस खाती उघडून कोट्यवधी रुपयांचा काळा पैसा पांढरा करणार्‍या भोंदूबाबा अशोक खरात च्या मुसक्या आवळण्यासाठी शिर्डी...