अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
महापालिकेच्या आरोग्य विभागात 16 लाख 50 हजार रूपयांचा अपहार उघड झालेला आहे. या प्रकारामुळे खळबळ उडाली असतानाच आता सन 2022-23 चा पीएफएमएस प्रणालीचा डाटाच डिलिट केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. त्यामुळे 15 व्या वित्त आयोग खात्यातून वर्ग करण्यात आलेल्या अनेक रक्कमांचा ताळमेळ लागत नसल्याचे महापालिका प्रशासनाने शासनाच्या आरोग्य विभागाला कळवले आहे. आरोग्य विभागाने याची गंभीर दखल घेत सखोल चौकशी करण्यासाठी तातडीने समिती गठीत केली आहे.
नाशिक परिमंडळ आरोग्य सेवा उपसंचालक कार्यालयाचे सहाय्यक अधीक्षक (लेखा) गणेश चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती नियुक्त करण्यात आली आहे. यात उपसंचालक कार्यालयातील परिमंडळ कार्यक्रम व्यवस्थापक पंकज चव्हाण, अहिल्यानगर जिल्हा परिषदेचे जिल्हा लेखा व्यवस्थापक उदय देशपांडे, आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र, नाशिक येथील वरिष्ठ लिपीक विजय बहिरम यांचा सदस्य म्हणून समावेश आहे. मनपाच्या आरोग्य विभागामध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता तसेच शासकीय निधीचा अपहार झाल्याबाबतची तक्रार मनपा प्रशासनाने केली होती. 15 व्या वित्त आयोगाच्या स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेतील बँक खात्यातून 7 फेब्रुवारी 2023 रोजी 15 लाख व 9 फेब्रुवारी 2023 रोजी 16 लाख 50 हजार इतकी रक्कम वैयक्तीक बँक खात्यात पीएफएमएस प्रणालीचा वापर करून शहर लेखा व्यवस्थापक विजयकुमार रणदिवे व वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे यांचा लॉगीन वापरून अपहार केला आहे.
सदरील रक्कमा एटीएममधून काढून काही अन्य व्यक्तींच्या बँक खात्यात वर्ग केली असल्याचे, तसेच पेटीएम, युपीआय, फोन पे इत्यादी माध्यमांमधून खासगी व वैयक्तीक स्वरूपाची खरेदी केल्याचे पत्रात म्हटले आहे. शासकीय निधीचा अपहार करून स्वतःच्या खासगी कामासाठी ती रक्कम वापरल्याचे आढळून आले आहे. तसेच सन 2022-23 चा पीएफएमएस प्रणालीचा डाटा डीलीट करण्यात आला आहे. त्यामुळे 15 व्या वित्त आयोग खात्यातून वर्ग करण्यात आलेल्या अनेक रक्कमांचा ताळमेळ लागत नाही, असेही महापालिकेने पत्रात म्हटले आहे. महापालिकेने दिलेल्या पत्राच्या पार्श्वभूमीवर या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी चौकशी समिती नियुक्त करण्यात आली आहे.
समितीने सखोल चौकशी करून वस्तुनिष्ठ अहवाल आपल्या स्वयंस्पष्ट अभिप्रायासह व आवश्यक दस्तावेजासह आठ दिवसांच्या आत आरोग्य सेवा नाशिक उपसंचालक कार्यालयास सादर करावा, असे आदेश उपसंचालक डॉ. कमल आहेर यांनी दिले आहेत. दरम्यान, अपहार प्रकरणी पोलीस कोठडीची मुदत संपल्यामुळे डॉ. अनिल बोरगे व विजयकुमार रणदिवे यांना कोतवाली पोलिसांनी सोमवारी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने दोघांची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली. डॉ. बोरगे यांच्यावतीने जामिनासाठी अर्ज करण्यात आला. न्यायालयाने दोन लाखांच्या जातमुचलक्यावर त्यांना जमीन मंजूर केल्याचे सरकारी अभियोक्ता अमित यादव यांनी सांगितले.