अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
विधान परिषदेचे सभापती राम शिंदे हे अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आगामी निवडणुकीसाठी नेत्यांच्या गाठीभेटी घेत असले तरी, मुळात त्यांना ही निवडणूक लढवताच येणार नाही, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी बुधवारी (23 सप्टेंबर) केला. एवढे मोठे पद असताना आणखी पदांची गरज काय, असा सवाल करत पदाचा उपयोग जनतेच्या कामासाठी करायला हवा, असा टोलाही त्यांनी लगावला. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत लोक राम शिंदेंची जिरवतील, अशी टीकाही पवार यांनी केली.
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विविध मागण्यांसाठी आ. पवार व खासदार नीलेश लंके यांनी जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांची भेट घेतली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना पवार यांनी जिल्हा बँकेच्या निवडणुकीसह दुष्काळ, पीकविमा आणि डिंभे-माणिकडोह बोगद्याच्या प्रश्नावरून सरकारवर टीका केली. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक लवकरच जाहीर होण्याची शक्यता असून सभापती शिंदे उमेदवारीसाठी नेत्यांच्या भेटीगाठी घेत आहेत, याबाबत विचारले असता पवार म्हणाले, कर्जत-जामखेड मतदारसंघातील जनतेने मला ताकद दिली. त्यामुळेच भाजपने राम शिंदे यांना सभापतीपद दिले. माझ्यामुळेच भाजप त्यांना महत्त्व देत आहे. सभापतीपद मिळाल्यानंतरही मतदारसंघासाठी त्यांना फारसे काम करता आले नाही. त्यामुळे निवडणुकीचे कारण पुढे करून ते गाठीभेटी घेत असतील, अशी टीका त्यांनी केली.
राम शिंदे यांना जिल्हा बँकेची निवडणूक लढवता येणारच नाही, असा दावा करताना रोहित पवार यांनी मात्र त्यामागील नेमके कारण स्पष्ट केले नाही. जिल्हा बँकेपेक्षा मोठे पद त्यांच्याकडे आहे. त्या पदाचा उपयोग जनतेच्या प्रश्नांसाठी करण्याऐवजी आणखी पद मिळविण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज काय, असा सवाल त्यांनी केला. मलाच सगळे मिळाले पाहिजे, या भूमिकेतून गाठीभेटी सुरू असतील, अशी टीकाही त्यांनी केली. कांद्याला पाच रूपये भाव मिळत असताना राम शिंदे हेलिकॉप्टर आणि विमानातून फिरत होते, अशी टीका पवार यांनी केली. कर्जमुक्ती योजनेतील अन्यायकारक अटींविरोधात आम्ही उपोषण केले होते. त्यावेळी आमची चेष्टामस्करी केली जात होती. मात्र, मुख्यमंत्री यांच्यावर दबाव आल्यानंतर कर्जमुक्तीच्या अटी शिथिल कराव्या लागल्या. त्यातून त्यांचे वजन किती होते, हे स्पष्ट होते, असा दावा पवार यांनी केला.
दुष्काळाच्या पाहणीवरून मुख्यमंत्र्यांवर टीका
शेतकर्यांमध्ये निर्माण झालेला रोष, शरद पवार यांनी दिलेले पत्र आणि आम्ही शेतकर्यांमध्ये मिसळण्यास सुरूवात केल्यामुळे मुख्यमंत्र्यांवर दबाव निर्माण झाला. त्यामुळे ते दुष्काळी भागाच्या पाहणीसाठी बाहेर पडले, असा आरोप रोहित पवार यांनी केला. मुख्यमंत्री दुष्काळी भागाची पाहणी करताना बॅरिकेड्स आणि मेटल डिटेक्टर लावले जात आहेत. शेतकरी शेतात काही बॉम्ब लावणार आहेत का? असा सवाल करत त्यांनी या व्यवस्थेवर टीका केली.
पीक कापणी प्रयोगात गल्लत केल्याचा आरोप
काही अधिकारी पीकविमा कंपन्यांना फायदा मिळवून देण्यासाठी ज्या ठिकाणी चांगले पीक आले आहे, तेथेच पीक कापणीचे प्रयोग करीत असल्याचा आरोप पवार यांनी केला. त्यामुळे शेतकर्यांचे नुकसान कमी झाल्याचे दाखविण्याचा प्रयत्न होत असल्याचे ते म्हणाले. अधिकार्यांनी अशा प्रकारे गल्लत करू नये, अन्यथा त्यांना सोडणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
डिंभे-माणिकडोह बोगद्याला 5 ऑक्टोबरची मुदत
डिंभे-माणिकडोह बोगद्याच्या मंजुरीचा आदेश 5 ऑक्टोबरपर्यंत काढला नाही, तर शेतकरी आंदोलन उभारू, असा इशारा आ. पवार व खा. लंके यांनी दिला. सरकार या प्रश्नावर कमजोर दिसत आहे. बोगद्याला 2022 मध्येच तत्कालीन मंत्री जयंत पाटील यांच्या काळात मंजुरी मिळाल्याचा दावा त्यांनी केला. सध्याच्या सरकारची मंजुरी अद्याप कागदावर आलेली नसल्याचेही ते म्हणाले. बोगद्यामुळे जुन्नर, पारनेर, कर्जत, जामखेड व करमाळा तालुक्यांना लाभ मिळणार असल्याचे पवार यांनी सांगितले.




